"पोस्टाच्या पलीकडचा माणूस - दादासाहेब सुनीलजी पवार"


"पोस्टाच्या पलीकडचा माणूस - दादासाहेब सुनीलजी पवार"

शब्दांनी हृदयाला स्पर्श करावा म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्यायचं असेल, तर धरणगावात एक नाव हमखास घेतलं जातं. दादासाहेब सुनीलजी पवार. ते केवळ एक पोस्टमन नाहीत, तर संपूर्ण गावाच्या अंत:करणाचा नाजूक सूर आहेत. दररोज हातात पत्रांची पिशवी घेऊन, कुणाच्या दारात एक बातमी, तर कुणाच्या नशिबात एक आशा घेऊन पोहोचणारे हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कामाइतकेच त्यांच्या स्वभावासाठी ही ओळखले जाते. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे सौंदर्य त्यांच्या मनात आणि त्यांच्या स्वर्गीय आवाजात दडलेले आहे.

दादासाहेबांचे स्वभाव विशेष म्हणजे अतिशय शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्ती. रोजच्या धावपळीच्या जीवनात ही त्यांचे मन कायम भगवंताच्या स्मरणात तल्लीन असते. ते कुठेही असोत, कोणाशीही बोलत असोत, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक सौम्य, समंजस आणि स्थिर भाव असतो. अनेक वेळा ते काहीही न बोलता फक्त नजरेतूनच संवाद साधतात. ही त्यांच्या अंतरात्म्याची साक्ष आहे.

त्यांच्या आवाजात एक विलक्षण जादू आहे. अभंग असो, भजन असो, कीर्तन असो त्यांच्या आवाजात हे सारे सजीव होतं. ते केवळ गात नाहीत, तर प्रत्येक शब्दात जिवंत भावना ओततात. त्यांच्या तोंडून ते शब्द ऐकताना, मनात असा भाव निर्माण होतो की जणू एखादा संत आपल्या समोर बसून त्याचा आत्मानुभव मांडतो आहे. त्यांच्या उच्चारांनी भावनांचे दरवाजे उघडतात आणि श्रोत्याच्या अंत:करणात खोलवर झिरपत जातात.

भजन हे त्यांच्या मनाचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान आहे. पहाटेच्या शांत वेळेस, जर कुठून तरी मंद स्वरात ‘विठ्ठल विठ्ठल’ हे नामस्मरण ऐकू आले, तर लोकांना लगेचच समजते. हे स्वर दादासाहेबांचेच असावेत. त्यांना कीर्तन गाण्यापेक्षा ऐकण्यात अधिक आनंद मिळतो. कारण, त्यांच्या दृष्टीने शब्दांचं फक्त उच्चारण नव्हे, तर त्या प्रत्येक शब्दाचा भाव समजून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. कीर्तन ऐकतांना ते डोळे मिटतात आणि जणू त्या शब्दांशी एकरूप होतात.

दादासाहेबांचं भक्तीमय जीवन हे खऱ्या अर्थाने अंतर्मुख आहे. ते कोणत्या ही गोष्टीचं प्रदर्शन करत नाहीत. त्यांच्या श्रद्धेचा आवाज मनाच्या खोल गाभाऱ्यातून येतो. त्यांनी साधलेला हा आत्मिक संवाद त्यांच्या शांत जीवनशैलीतून स्पष्टपणे उमटतो.

धरणगावात जेंव्हा कोणी भजन किंवा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतो, तेंव्हा दादासाहेबांची उपस्थिती ही अत्यंत नैसर्गिक असते. ते मंचावर दिसत नाहीत, पण समोर बसून ध्यान लावून प्रत्येक शब्द आतून अनुभवत असतात. आजच्या काळात जिथे ऐकण्याची सवय कमी होत चालली आहे, तिथे दादासाहेबांसारखे समर्पित आणि मन लावून ऐकणारे श्रोते दुर्मिळ झाले आहेत. खरं सांगायचं झालं, तर हाच खरा भक्तीचा आरसा आहे.

त्यांचं जीवन अत्यंत शिस्तबद्ध आहे. ते कुणाशी ही उगाच गप्पा मारत नाहीत, परंतु गरज असल्यास मोजक्या शब्दांत माणसाला आश्वस्त करतात. कधी कधी ते फक्त एक स्मित हास्य करतात आणि समोरच्याला हुरूप देतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते धरणगावात एक विश्वासार्ह आणि स्नेहपूर्ण आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या या मौनातील गूढतेला, त्याच्या स्वरातील मधुरतेला आणि त्यांच्या अंतर्मनातील भक्तीला हा शब्दार्पणाचा नम्र प्रणाम.

"दादासाहेब, आपल्यासारखी माणसं फारच दुर्मीळ असतात.आपला स्वर आमच्यासाठी जणू ईश्वराच्या सान्निध्याचा अनुभव आहे.आपलं आयुष्य असंच शांत, समाधानी आणि भगवंताच्या चरणी अर्पण झालेलं असो."

🌸 दादासाहेब सुनीलजी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा! 🌸

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !