जगाचा पोशिंदा उपाशीच का ?

जगाचा पोशिंदा उपाशीच का ?

रात्रभर गडद काळसर आभाळ पसरलेलं असतं, पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते, वाऱ्याचा रुतून वाहणारा आवाज अंगावर काटा आणतो आणि कुठे तरी दूर कावळा ओरडतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याच्या मनात एकच विचार सतत डोकावत राहतो. "आपणच जगाला पोसतो, पण आपल्यासाठी कोण?"

एखाद्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक घासामागे एक हात असतो.तो म्हणजे शेतकऱ्याचा. जसा आई आपल्या लेकराला दूध देते, तसाच शेतकरी आपल्या श्रमांनी जगाला अन्न पुरवतो. फरक एवढाच, की लेकराच्या डोळ्यांतील दुःख आईला दिसतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यांतील वेदना कोणालाच जाणवत नाहीत.

शेती म्हणजे केवळ माती नाही, ती शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आई आहे. त्या मातीत तो नुसते बियाणे नव्हे, तर आशा पेरतो. एका दाण्यात पोटभर अन्न होईल, या विश्वासाने तो आभाळाकडे डोळे लावून बसतो. परंतु आभाळ ही अनेकदा रुसून राहतं, आणि मग डोळे पाणावतात. अखेर, माती आणि घाम एकरूप होतात... अनेकदा रक्त देखील त्यात सामावून जातं.

शहरातल्या माणसांसाठी शेती ही केवळ नकाशावर दाखवलेली जमीन असते. त्यांना पिकांचे भाव समजतात, पण त्या भावांसाठी जीव तोडणाऱ्या शेतकऱ्याचा संघर्ष त्यांना उमगत नाही. बाजारात भाजी घेताना पाच रुपयांसाठी घासाघीस करणारी माणसं, शेतकऱ्याला शेती विकताना "बापू, सगळं ठीक आहे का?" असं एक वाक्य ही कोणी विचारत नाहीत.

दरवर्षी शेतकी तोट्यात चालली आहे. रासायनिक खतं महागतात, बियाण्यांचे दर वाढतात, मशागतीसाठी खर्च झपाट्याने चढतो. परंतु उत्पन्न मात्र तसंच राहातं किंवा अजून ही घटतं. कधी कर्ज फेडता येत नाही, कधी सण-समारंभ बँकेच्या नोटिशीच्या सावलीतच पार पडतात. पोरगा कॉलेज ऐवजी बैल हाकतो, बायको तेला ऐवजी डोक्यावर फाटकी पदर ओढते, आणि म्हातारा बाप खाटेवर आभाळाकडे पाहत राहतो. पावसाच्या आशेने.

या साऱ्यांच दुःख फक्त आर्थिक नाही, ते मानसिक आहे. असहायतेचं आहे. “मी किती ही मेहनत केली तरी मला कधीच न्याय मिळणार नाही,” या भावनेने त्याच्या मनात काळोख भरतो. हाच अंधार कधी कधी त्याला शेवटच्या टोका पर्यंत घेऊन जातो.

शेतकरी आत्महत्या करत नाही. तो हळूहळू जगण्याची आशा सोडतो. कारण त्याचं आयुष्य समाजासाठी कधीही “गौरवशाली” ठरलेलं नव्हतं. त्याचं दुःख, त्याचा संघर्ष, सगळं काही ढेकळांमध्ये दडलेलं असतं. त्याच्या घामाचं मोल ना भावात असतं, ना बातम्यांत.

सरकार योजना आणतं, घोषणा करतात, कर्जमाफीतल्या जाहिराती झळकतात. पण तरीही त्याच्या घरात चुलीला धूर नसतो. कारण त्याला केवळ योजना नकोय त्याला हळुवारपणे समजून घेणारा माणूस हवा आहे.

कोणी त्याच्याकडे पाहून विचारतं का “कसा आहेस?” कोणी त्याच्या थकलेल्या खांद्यावर हात ठेवून म्हणतं का “थकला असशील रे, पण तूच खरा आधार आहेस आपल्या देशाचा”?

तो वाट पाहतोय कुणीतरी त्याच्या डोळ्यांतील अश्रू समजून घ्यावेत. त्याच्या ओठांवरील खोटं हसू उलगडावं. त्याच्या हातांवरच्या भेगा बघून कोणी तरी एवढंच म्हणावं “ही भेगा कष्टाच्या आहेत, लाजिरवाण्या नव्हेत.”

शेती टिकावी, म्हणून नाही... शेतकरी टिकावा, म्हणून प्रयत्न व्हायला हवेत. कारण जो पर्यंत तो आहे, तो पर्यंत आपल्याला अन्नाचा खरा अर्थ समजत राहील. तो गेला, की अन्न केवळ पॅकेटात मिळेल, पण त्याला असलेला जीव नाहीसा होईल. मातीचा वास विसरून आपण मोबाईलवर "ऑर्डर" करत राहू, पण त्या घासात प्रेम, भावना आणि श्रमांचा वास उरणार नाही.

आणखी काय सांगावं?

शेवटी इतकंच वाटतं “शेतकऱ्याचं दुःख बाजारात विकत मिळत नाही,ते हळूहळू समजून घ्यावं लागतं.
मातीसारखं… खोल, गहिरं आणि मौनात सामावलेलं.”
एवढं मात्र खरं......

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 


#जगाचापोशिंदा# शेतकऱ्याचंआक्रोश
#शेतकऱ्याच्या_भावना # उपाशीशेतकरी
#मातीचामाणूस # शेतकऱ्याचं_दुःख
#शेतीआणिजीवन # हृदयस्पर्शीलेख
#खेड्याचंवास्तव # भारतीयशेतकरी
#कष्टकऱ्याचीगाथा # शेतकऱ्यावरीललेख
#आदर्शशेतकरी # सामाजिकप्रबोधन
#मातीतलाजगणं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !