लहान सुरुवात करायला कधीही घाबरू नका—मी यशस्वी होणारच
लहान सुरुवात करायला कधीही घाबरू नका—मी यशस्वी होणारच
सकाळी सूर्योदयाची पहिली किरण जशी हळूहळू झाडांवर उतरते, त्याच प्रमाणे प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही कोमल, शांत आणि जरा साशंक असते. ती कधी थोडीशी संकोचलेली, कधी अनिश्चित, पण तिच्यामागे एक दृढ विश्वास असतो.की ही पावलं आपल्याला कुठे तरी दूर, उंचावर घेऊन जाणार आहेत.
कधी कधी वाटतं, आपण इतरां पेक्षा खूप मागे पडलो आहोत. त्यांच्या प्रगतीची गती पाहता, आपली पावलं अत्यंत क्षुल्लक वाटू लागतात. त्यांच्या मोठमोठ्या उंच भराऱ्या समोर आपली छोटीशी उडी नगण्य भासते. पण हे लक्षात ठेवायला हवं, कोणतं ही झाड एका रात्रीत मोठं होत नाही. त्याच्या खोलवर असलेल्या मुळांमध्येच त्याची खरी ताकद असते.जिथं कुणी पाहत नाही, तिथं ते गहिरं वाढत असतं. आणि हाच आधार त्याला एक दिवस आकाशाला गवसणी घालण्यासाठी समर्थ बनवतो.
जी माणसं यशस्वी ठरली, त्यांची सुरुवात ही आपल्या सारखीच होती साधी, अज्ञात आणि अनेक वेळा उपेक्षितसुद्धा. त्यांनी मात्र थांबण्या ऐवजी चालत राहण्याचा निर्णय घेतला. दररोज थोडं थोडं शिकत, चुका करत, स्वतःवर विश्वास ठेवत त्यांनी स्वतःची वाट निर्माण केली. त्यांच्या मनात सतत एकच वाक्य घोळत होतं. मी यशस्वी होणारच.
आपल्याही जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा सगळं धूसर वाटतं. वाट चुकल्यासारखं जाणवतं. समोर धुक्याचं आच्छादन आणि पायाखाली खाचखळगे असतात. पण त्या वाटेवर जर आपण ठामपणे, न डगमगता चालत राहिलो, तर एक दिवस तीच वाट आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाते.
कोणताही माणूस जन्मतःच थोर नसतो. थोरपण ही एक प्रक्रिया आहे. ती घडवावी लागते, जोपासावी लागते. त्यासाठी लागतो एक दृढ निश्चय की माझ्यात क्षमता आहे. आज तुमच्याकडे काहीच नसावं ना पैसा, ना प्रतिष्ठा, ना ओळखी. पण तुमच्याकडे एक स्वप्न असावं आणि त्याला पूर्ण करण्यासाठी जिद्द असावी, धडपड असावी, हीच खरी गरज असते.
हा प्रवास सहजसोप्या गाण्यासारखा नाही. यात थकवा आहे, नकार आहेत, एकटेपणा आहे आणि रात्रभर डोळ्यांत झोप न येणाऱ्या चिंता आहेत. पण या सगळ्या अंधारात ही एक गोष्ट कायम असते.तुमचा स्वतःवरचा विश्वास. मी करू शकतो. मी हरणार नाही. मी यशस्वी होणारच.
कधी आईच्या डोळ्यातल्या ओलसर आशेसाठी, कधी वडिलांच्या कष्टाला सार्थ ठरवण्यासाठी, कधी बहिणीच्या स्वप्नांमागे उभा राहण्यासाठी आणि कधी स्वतःच्या मनात खोलवर असलेल्या त्या शांत पण ठाम आवाजासाठी आपण चालत राहतो. पुन्हा, पुन्हा... अगदी थांबायच्या उंबरठ्यावरून पुन्हा उठतो.
आणि एक दिवस आपण त्या टोकावर पोहोचतो. जिथून मागे वळून पाहिलं, की सुरुवात कुठून झाली हे ही लक्षात राहत नाही. तेव्हा उमगते की लहान सुरुवात करायला घाबरू नये, कारण तीच लहान सुरुवात आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकते.
आज तुम्ही जिथे आहात, तिथूनच सुरुवात करा. यशासाठी तुम्हाला मोठं ऑफिस, प्रभावशाली ओळखी किंवा प्रचंड संसाधनं लागतात असं नाही. लागतो तो एक निश्चय आणि तो इतका प्रबळ हवा की संपूर्ण जगाला ही झुकवायला लावेल.
एक दिवस असा येईल, जेव्हा लोक तुम्हाला पाहून म्हणतील“अरे, हेच ते! ज्यांनी अगदी लहानशा सुरुवातीतून एवढं मोठं घडवलं!” आणि त्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनातल्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक प्रयत्नाला, प्रत्येक अपमानाला प्रेमाने सामोरं जाल. कारण त्या सगळ्यांनी मिळूनच तुमचं स्वप्न साकार केलं असेल.
कारण तुम्ही कधी थांबलात नाहीत. कारण तुम्ही कधी घाबरलात नाहीत. कारण तुम्ही ठामपणे ठरवलं होतं मी यशस्वी होणारच.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा