ज्ञानेश्वरजी आमले : लोकांची निःस्वार्थ साथ


ज्ञानेश्वरजी आमले : लोकांची निःस्वार्थ साथ

जवखेडेसिम या छोट्याशा गावात जन्मलेल्या ज्ञानेश्वरजी आमले यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आर्थिक अडचणींमुळे त्यांचं शिक्षण केवळ बी.ए.पर्यंतच मर्यादित राहिलं. मात्र, मनात काही तरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द कायम होती.

सन १९९५ मध्ये त्यांनी एरंडोल येथे स्टॅम्प व्हेंडर आणि बॉण्ड रायटर म्हणून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करत लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची ओळख एक प्रामाणिक आणि माणसं जोडणारा उद्योजक म्हणून निर्माण झाली.

त्यांना राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा मार्ग वाटला नाही, तर समाजाच्या विकासासाठीची एक संधी आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. त्यांचं नेतृत्व राजकीय पातळीपुरतं मर्यादित न राहता, थेट लोकांच्या हृदयात स्थान मिळवून गेलं. म्हणूनच आज त्यांना आदरपूर्वक "नानासाहेब" म्हणून ओळखलं जातं.

सन २००१ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणतं पद होतं, ना सत्तेची हाव. होती ती फक्त जनतेसाठी काहीतरी भरीव काम करण्याची तळमळ. त्यांनी गावातील प्राथमिक गरजांची जाण ठेवून स्वत:ला समाजासाठी समर्पित केलं.

२००७ साली सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात केली. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य या मूलभूत गरजांवर विशेष लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या दृष्टीने ग्रामपंचायत ही केवळ सत्ता नव्हती, तर गावाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची संधी होती.

२००९ मध्ये आदरणीय आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संघटनशक्ती निर्माण करत विश्वासाचं वातावरण तयार केलं. कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण केली.

२०१२ साली शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले. त्यांच्या कार्यक्षमतेवर जनतेनं भरभरून विश्वास दाखवला. नंतर उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी लीलया पार पाडली. त्यानंतर त्यांना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊसो गुलाबरावजी पाटील, आदरणीय आबासाहेब चिमणरावजी पाटील आणि आदरणीय अमोलदादा पाटील यांचं सातत्यानं मार्गदर्शन लाभत गेलं.

त्यांच्या प्रयत्नातून तळई प्राथमिक आरोग्य केंद्र, पद्मालय शाळा, डांबरी रस्ते, नळपाणी योजना, वीजपुरवठा यांसारखी अनेक विकासकामं यशस्वीरीत्या पूर्ण झाली. ही कामं केवळ कागदावर मर्यादित नव्हती, तर त्यांच्या मागे होती लोकांसाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची निःस्वार्थ भावना. विशेष म्हणजे, या सगळ्या यशाचं श्रेय त्यांनी स्वतःकडे कधीच घेतलं नाही. त्यांनी नेहमी आदरणीय आबासाहेब व अमोलदादांचे मार्गदर्शन आणि जनतेचा विश्वास हेच आपल्या यशाचं खरं कारण मानलं.

आज संपूर्ण परिसरात त्यांना "नानासाहेब" म्हणून ओळखलं जातं. हे फक्त एक संबोधन नाही, तर श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

नुकताच जळगाव येथे ‘लोकमत’ आणि ‘विजया केसरी प्रतिष्ठान’तर्फे जाहीर झालेल्या राज्यस्तरीय ‘लोकनायक’ पुरस्काराने ज्ञानेश्वरजी आमले यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ सेवा कार्याचा, सेवाभावाचा आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेचा सन्मान आहे.

त्यांच्या प्रत्येक कृतीत सेवाभाव जाणवतो. त्यांनी कधीही पद, सत्ता वा प्रसिद्धी यांचा हव्यास धरला नाही. त्यांच्या मनात असते आत्मीयता, त्यांच्या कृतीत असते पारदर्शकता, आणि जनतेप्रती जिव्हाळा.

ते केवळ एक राजकारणी नाहीत, तर एक संवेदनशील शेजारी, आधारवड आणि असा नेता आहेत, जो लोकांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी असतो. अनेकदा त्यांनी ग्रामीण भागातील समस्या स्वतःच्या जबाबदारीवर, कुठल्याही गाजावाजाशिवाय सोडवल्या आहेत. यात त्यांच्या वैयक्तिक वेळेचा, आरोग्याचा आणि कुटुंबाच्या आयुष्याचा त्याग झाला. पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही, ना थकवा दाखवला. कारण त्यांच्या मनात एकच भावना आहे "लोकांचं भलं हेच खरं यश!"

‘लोकनायक’ पुरस्कार हा त्यांच्या त्या कार्यसंस्कृतीचा गौरव आहे, जी कोणत्या ही पदापेक्षा लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं अधिक महत्त्वाचं मानते.

आज त्यांच्या कार्याचं गोड फळ संपूर्ण जिल्हा चाखतो आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, लहानग्यांची निरागस हसरी चेहरं, वृद्धांच्या डोळ्यातून वाहणारे कृतज्ञतेचे अश्रू हेच त्यांच्या यशाचं खऱ्या अर्थाने प्रमाणपत्र आहे.

ज्ञानेश्वरजी आमले म्हणजे एक असा दीपस्तंभ, जो स्वतः जळतो, पण सभोवतालचं जीवन उजळवतो. त्यांनी वेळ घेतला, पण निःस्वार्थ सेवेच्या तेजाने समाजावर आपली अमिट छाप उमटवली. त्यांच्या या महान कार्यास आज संपूर्ण समाज नतमस्तक आहे.

मा. ज्ञानेश्वरजी आमले यांना ‘लोकनायक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव जिल्ह्याच्या आणि समस्त जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

कारण आज समाजाला गरज आहे अशाच निःस्वार्थ नेतृत्वाची – जेव्हा सत्ता ही सेवा ठरते, आणि नेता हा खरा सेवक होतो, तेव्हाच समाजाचं खऱ्या अर्थाने कल्याण होतं.

© दीपक पवार (संपादक)खान्देश माझा
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !