मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’

मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’

गावाकडच्या मातीमध्ये रुजलेली स्वप्नं जेव्हा अंकुरतात, तेव्हा ती केवळ शेती पुरती मर्यादित राहत नाहीत, तर समाजासाठी आशेचा किरण ठरतात. धानोरा या छोट्याशा गावातून असेच एक स्वप्न आकाराला आलं – श्री.संदीप युवराज गुजर यांचं.

आज या स्वप्नाला यशाची उंच भरारी लाभली असून, त्याला ‘कृषीगौरव पुरस्कार’ रूपी सन्मान प्राप्त झाला आहे. चोपडा येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. तहसीलदार साहेब, माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरुणभाई गुजराथी आणि इतर मान्यवरांच्या साक्षीने संदीपभाऊंचा गौरव करण्यात आला. हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नसून, एका विचाराचा, अथक परिश्रमाचा आणि मातीशी असलेल्या घट्ट नात्याचा आहे.

संदीपभाऊंनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून, नाविन्यपूर्ण प्रयोग करत शेती पूरक व्यवसायांचे आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. विशेषतः त्यांनी विकसित केलेल्या पेरूच्या बागा आज जळगाव जिल्ह्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या आहेत. एखाद्या फळबागेचा सुगंध इतक्या दूरवर पोहोचेल, याची पूर्वी कल्पना ही कोणी केली नव्हती.

या यशामागे संदीपभाऊंच्या सातत्यपूर्ण परिश्रमा सोबतच त्यांच्या कुटुंबीयांचे ही मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पत्नी सौ. सोनल गुजर यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांना खंबीर साथ दिली. त्यांची कन्या सेजल, जिच्या निरागस हास्यासाठी संदीपभाऊ रात्रंदिवस परिश्रम करत राहिले, तीच त्यांच्या प्रेरणेचं मूळ ठरली.

त्यांचे वडील श्री.युवराज महाजन आणि माता मंगलाबाई महाजन आज ही शेतीच्या कामात सक्रिय सहभागी आहेत.मातीशी असलेली ही तीन पिढ्यांची साखळीच संदीपभाऊंच्या यशाचा खरा आधारस्तंभ आहे.

शेती सोबतच संदीपभाऊ संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एसी दुरुस्तीचा व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे चालवत आहेत. कष्ट, चिकाटी आणि कार्यतत्परता यांच्या बळावर त्यांनी शेती व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या या दुहेरी यशाचा प्रवास इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

गुजर कुटुंबाचे संस्कार आणि मूल्ये आज संदीपभाऊंच्या कर्तृत्वातून प्रकट होत आहेत. त्यांच्या विचारसरणीतून आणि कृतीतून शेती हा व्यवसाय केवळ उपजीविकेचं साधन न राहता, तो एक प्रतिष्ठेचं व सन्मानाचं क्षेत्र ठरलेला आहे.

संदीपभाऊंनी दाखवून दिलं आहे की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आणि नवकल्पनांचा अंगीकार करून शेतकरी ही यशाचं शिखर गाठू शकतो. गरज आहे ती फक्त जिद्द, चिकाटी आणि माती कडून मिळालेल्या मूल्यांना जपण्याची.

आज संदीपभाऊंचा सन्मान हा केवळ एका माणसाचा नाही, तर तो हजारो तरुण शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं यश आणि त्यांच्या कुटुंबातील एकजूट ही खर्‍या अर्थानं ‘मातीच्या सुवासाची’ जिवंत साक्ष आहे.

संदीपभाऊ, आपल्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन! पुढील यशस्वी पर्वासाठी मनःपूर्वक शुभेच्छा... कारण ही केवळ सुरुवात आहे!

© दीपक पवार(संपादक) खान्देश माझा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !