संघर्षातून यशाकडे उंच भरारी — तेजश्री आणि यश यांची प्रेरणादायी गाथा

संघर्षातून यशाकडे उंच भरारी — तेजश्री आणि यश यांची प्रेरणादायी गाथा

कधी कधी आयुष्य एका क्षणात बदलून टाकतं… काहीजण त्या बदलासमोर झुकतात तर काही जण त्या बदलाला संधी बनवतात. आज आपल्यासमोर उभे राहिलेले दोन तेजस्वी चेहरे म्हणजे तेजश्री बिर्‍हाडे आणि यश गौतम सोनवणे… त्यांनी आयुष्याच्या अडथळ्यांवर स्वप्नांची पताका रोवली आहे. गरिबी ही त्यांच्या आयुष्यात अडथळा ठरली नाही, उलट तीच त्यांच्या संघर्षाची खरी मशाल ठरली.

तेजश्री… ज्याच्या बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं… गरिबीचा तडाखा असह्य होता, पण तिच्या आईने हार मानली नाही. दिवसाला दहा ठिकाणी धुणीभांडी करून पोट भरत होती आणि मुलीच्या स्वप्नांचंही पोषण करत होती. एका आईच्या डोळ्यात असलेली आशा तेजश्रीच्या डोळ्यात स्वप्न बनून झळकत होती. आईच्या तुटपुंज्या कमाईतून शिकणं… हे एक दिवास्वप्नच वाटलं असतं, पण तेजश्रीने ते प्रत्यक्षात आणलं. आज ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली आहे. तिच्या प्रत्येक यशामागे तिच्या आईचे घामाचे थेंब आहेत, तिच्या संघर्षाच्या जिद्दीची शिदोरी आहे.

 दुसरीकडे… यश गौतम सोनवणे. वडील रिक्षा चालवत, सकाळपासून रात्रीपर्यंत रस्त्यांवर जीवनाची वाट शोधत होते. पण या रिक्षाच्या धावणाऱ्या चाकांवर यशने स्वतःचं आयुष्य थांबू दिलं नाही. त्याच परिस्थितीचा पाठलाग करत, इंटरनेट आणि मोबाईलवरचं शिक्षण घेऊन, कुठल्याही मोठ्या कोचिंग क्लासशिवाय, तो थेट IIT खरगपूर या नामांकित संस्थेत पोहोचला.वडील रिक्षा चालवत झोपडीतून घर चालवत होते. शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये असलेली क्लासेस नव्हते, पण यशच्या डोळ्यातील जिद्द आणि मोबाईलवर चाललेली युट्युब क्लासेस हीच त्याची गुरूकिल्ली ठरली. बारीकशा मोबाईल स्क्रीनवर मोठं स्वप्न रेखाटत, स्वतःच्या बुद्धीची धार वाढवत, यशने थेट IIT Kharagpur सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेत आपली जागा निश्चित केली.

या दोघांच्या संघर्षाची दखल एरंडोल नगराध्यक्ष मा. शालीकभाऊ गायकवाड आणि डॉ. मकरंद पिंगळे यांनी घेतली. त्यांच्या हस्ते झालेला सत्कार म्हणजे केवळ पुरस्कार नव्हता… ती त्या थकलेल्या आईच्या डोळ्यात उतरलेली कृतार्थतेची पाऊसधार होती… तो त्या रिक्षाचालक वडिलांच्या थकलेल्या हाताला मिळालेला अभिमानाचा दुलई होता.

शालिक भाऊ गायकवाड आणि डॉ. मकरंद पिंगळे यांनी समाजाला शिकवण दिली की परिस्थिती ही कधीच निर्णायक ठरत नाही… माणसाच्या निर्धाराची आणि कष्टाची ताकदच त्याच्या भविष्याचं खरं रेखाटन करते.

आज तेजश्री आणि यशसारखे मुलं समाजाला सांगून जातात की गरिबी ही शाप नाही, ती लढण्याची संधी आहे… शिकण्याचा ध्यास घेतला, मेहनतीवर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही.

अनेकांना वाटतं… पैसे नाहीत म्हणून शिकता येणार नाही… क्लास नाहीत म्हणून आयुष्य पुढे जाऊ शकणार नाही… पण या दोघांनी दाखवून दिलं की जिथे जिद्द असते, तिथे मार्ग आपोआप निर्माण होतो.

आज हे यश केवळ यशाचं नाही… हे यश त्या प्रत्येक आईचं आहे जी आपल्या लेकरासाठी वाट्याला आलेली हालअपेष्टा हसतमुखाने सहन करते… हे यश त्या प्रत्येक वडिलांचं आहे ज्यांचे हात फाटले तरी मुलाच्या भविष्यासाठी मेहनत कमी पडत नाही… आणि हे यश त्या प्रत्येक गरिब घराचं आहे, जिथे परिस्थितीवर मात करून, कष्टाचं सोनं केलं जातं.

तेजश्री आणि यश यांच्या संघर्षाला सलाम! त्यांच्या यशाचा अभिमान प्रत्येक पिढीला उर्जा देवो, नवा आत्मविश्वास देवो आणि एक संदेश देवो 
“स्वप्नं मोठी बघा… गरिबीला शरण जाऊ नका… कारण परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमच्या जिद्दीची उंचीच यशाचं शिखर ठरवत असते.”

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !