"विज्ञानाची पालवी साळवेच्या शाळेत"
"विज्ञानाची पालवी साळवेच्या शाळेत"
२८ जुलै २०२५… एक साधी सकाळ, पण साळवे गावासाठी ही सकाळ खास होती. या दिवशी मारवड विकास मंच आणि मिलके चलो असोसिएशन, अमळनेर यांच्या सौजन्याने साळवे इंग्रजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात एक अद्वितीय, प्रेरणादायी आणि हृदयाला स्पर्श करणारा उपक्रम राबवला गेला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फिरती विज्ञान प्रयोगशाळा.
या प्रयोगशाळेच्या आगमनाने जणू ज्ञानाचा सूर्य या गावात उगवला होता. विद्यार्थ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. आज विज्ञान केवळ पुस्तकात नव्हते, ते त्यांच्या हातात होतं… त्यांच्या डोळ्यांसमोर प्रयोगांचं जिवंत रूप होतं.
या कार्यक्रमाच्या प्रमुख शिल्पकारांमध्ये होते प्रकल्प संचालक श्री विनायक पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक श्री अतुल सैंदाने. त्यांनी इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसोबत जे संवाद साधले, जे मार्गदर्शन केलं, ते केवळ माहितीपुरतं मर्यादित नव्हतं. त्या मागे होती जिज्ञासेला पेटवणारी ऊर्जा.
श्वसन संस्था, संवेग, ऊर्जेचे रूपांतरण, साधा दोलन ही विज्ञानातील अवघड वाटणारी उपकरणं त्यांनी इतक्या सोप्या आणि अनुभवात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे मांडली की, त्या क्षणी विज्ञान विद्यार्थ्यांच्या मनात स्थिरावलं. या चर्चा केवळ संकल्पनांची नव्हती, त्या होत्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या ठरणाऱ्या क्षणांची.
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही. के. मोरे यांनी केलं. त्यांच्या शांत, समर्पित आवाजात जेव्हा त्यांनी सांगितलं की "विज्ञानाच्या छोट्या छोट्या प्रयोगांतूनच मन आणि बुद्धीला चालना मिळते आणि त्यातूनच नवीन शोध उदयास येतात", तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात एक नवं रोपटं रुजलं शोध घेण्याची वृत्ती.
या उपक्रमातून केवळ प्रयोग नव्हते, तर एक प्रकारचं "स्वतः शोधा, स्वतः समजा" असं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं. त्यांनी नोंदी केल्या, प्रयोग पाहिले, हाताळले, अनुभवले आणि त्यातून स्वतःचे निष्कर्ष ही काढले. प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग म्हणजे कार्यक्रमाचा खरा आत्मा होता. त्यांनी आपल्या प्रतिसादातून आणि उत्साहातून या प्रयोगशाळेला यशाच्या शिखरावर नेलं.
मुख्याध्यापक श्री एस. डी. मोरे यांनी अत्यंत प्रेरणादायी भाषण करताना अनेक शास्त्रज्ञांची उदाहरणं विद्यार्थ्यांसमोर ठेवली. "मोठे शोध हे लहान लहान कृतीतून, छोट्या प्रयोगांतूनच उगम पावतात," हे त्यांचं वाक्य अनेक विद्यार्थ्यांच्या मनात ठसवलं गेलं. त्यांनी हे पटवून दिलं की यशाच्या प्रवासाची सुरुवात एका साध्या कल्पनेतून होते ती कल्पना कृतीत उतरवणं हेच विज्ञानाचं खरे सौंदर्य आहे.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकवृंद आपल्या कर्तव्यनिष्ठेने सहभागी झाले. संयोजन, विद्यार्थ्यांचं समुपदेशन, प्रयोगांसाठी सहाय्य प्रत्येक पातळीवर त्यांनी कार्य केले. त्यांच्या समर्पणामुळेच हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती गुणवंती पाटील मॅडम यांनी आपल्या हळव्या, पण स्पष्ट शब्दांत सर्वांचे आभार मानले. त्यांचा नम्र आणि मनापासून व्यक्त केलेला आभारपर संदेश हा कार्यक्रमाचा सुंदर समारोप ठरला.
या दिवशी विज्ञानाने फक्त प्रयोग नव्हे, तर एक विचार दिला… एक दृष्टिकोन दिला… आणि विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासेचं बीज रोवलं. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं स्वप्न अशा उपक्रमांतूनच पुर्ण होत आहे. जिथे ग्रामीण भागातील विद्यार्थी ही विज्ञानाचं सामर्थ्य अनुभवतात आणि ते जीवनात उतरवतात.
या उपक्रमाचं स्मरण विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळ राहील आणि कदाचित याच दिवशी कुणा एका विद्यार्थ्याच्या मनात शास्त्रज्ञ होण्याची पहिली ठिणगी पडली असेल...!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा