एक हरवलेली वस्तू… आणि सापडलेली माणुसकी!


एक हरवलेली वस्तू… आणि सापडलेली माणुसकी!

एरंडोल… हे गाव फक्त नकाशावर नाही, तर माणुसकीच्या नकाशावरही उजळून निघालंय. जेव्हा प्रत्येकजण आपल्या स्वार्थात बुडालेला दिसतो, तेव्हा एरंडोलच्या बस आगारातून माणुसकीचा एक सुंदर संदेश पसरला… एक हरवलेला मोबाईल आणि एक सापडलेला प्रामाणिकपणा!

१८ जुलै २०२५ चा दिवस. नाशिक-धरणगाव १३२८ क्रमांकाच्या बसमध्ये पारोळा ते शेळावे फाटा हा प्रवास प्रवासी सुरेश रामदास नावडे करत होते. प्रवासात नकळत त्यांचा मोबाईल सीटखाली पडला… आणि बस थेट एरंडोल आगारात पोहोचली. मोबाइल हरवल्याचं त्यांना उशीराच लक्षात आलं. काळजी, चिंता आणि हतबलतेचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता.

पण त्याच दिवशी, एरंडोल बस आगारात रोजच्या कामात गुंतलेले कर्मचारी एस.टी. शेख यांच्या नजरेस तो मोबाईल पडलेला दिसला. क्षणभर कोणालाही मोह होऊ शकतो… पण माणूस म्हणून खरी ओळख तेव्हा पटते जेव्हा एखादी वस्तू सापडल्यावर ‘ही माझी नाही’ हे सांगण्याचं धाडस दाखवलं जातं.

शेख यांनी तेच केलं… मोबाईल सरळ सुरक्षा रक्षक सोनार यांच्या हवाली केला. मोबाईल कोणाचा आहे? कोणी शोधत असेल का? त्याच्या मागे कुणाचं महत्त्वाचं आयुष्य दडलं असेल का? या विचारांनी त्यांना एका क्षणासाठीही विचलित होऊ दिलं नाही.

दुसऱ्या दिवशी, १९ जुलै रोजी आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे आणि स्थानक प्रमुख गोविंदा बागुल यांच्या उपस्थितीत मोबाईल त्या योग्य हक्कदाराला, सुरेश नावडे यांना सुपूर्त करण्यात आला. त्या छोट्या क्षणात एक माणूस हरवलेली आशा परत मिळवत होता… आणि दुसरा माणूस आपलं प्रामाणिकपण मिरवत होता.

सुरेश नावडे यांचे डोळे पाणावले… हरवलेला मोबाईल मिळणं ही केवळ वस्तू परत मिळणं नव्हतं… ती एक भावना होती, की अजूनही समाजात चांगुलपणा शिल्लक आहे. एरंडोल बस आगारात उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी शेख यांचा टाळ्यांच्या गजरात सन्मान केला. हा टाळ्यांचा आवाज फक्त एका कर्मचाऱ्याचा नव्हता, तो प्रामाणिकपणाच्या विजयाचा आवाज होता!

या छोट्या पण मोठ्या घटनेतून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली – कामाचं क्षेत्र काहीही असो, माणुसकीची जाणीव ज्याच्यात आहे तोच खरा मोठा माणूस ठरतो.

शेख यांचा प्रामाणिकपणा सांगून गेला…
“पगार पोटाला मिळतो… पण मान-सन्मान मनाला मिळतो… आणि ते मिळवायला लागतो प्रामाणिकपणा…!”

धन्यवाद एस.टी. शेख, एरंडोल बस आगारातून प्रामाणिकपणाचा हा झेंडा फडकवत राहा!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !