“गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची भेट : एक प्रेरणादायी पर्व”

“गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची भेट : एक प्रेरणादायी पर्व”


शाळा… ही केवळ भिंतींची रचना नसते. ती आठवणींचं घर असतं. ती संस्कारांचं मंदिर असतं. आणि आज या मंदिरात पुन्हा एकदा श्रद्धेची आणि ऋणानुबंधाची दिवे लागले होते.

जशी आषाढीच्या महिन्यात वारकऱ्यांना पंढरीच्या माऊलीची ओढ असते, तशीच ओढ पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मनात जागृत झाली होती. ही फक्त शाळेची पायरी नव्हती… ही आपल्या आयुष्याच्या पाया बनलेली जागा होती.

एसएससी १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्यांच्या व्यापातून वेळ काढून शाळेच्या अंगणात पावलं टाकली. त्यांचा हेतू होता आपल्या शाळेला काहीतरी परत देण्याचा… त्या ऋणाची जाणीव जिवंत ठेवण्याचा.

मा. मुख्याध्यापक मेजर डी. एस. पाटील सरांना त्यांनी सप्रेम नमस्कार करत विनंती केली. "आम्हाला यंदा मार्च २०२५ च्या गुणवंत आणि किर्तिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे." सरांच्या डोळ्यांतून अभिमान ओसंडून वाहत होता. सरांनी आनंदाने परवानगी दिली आणि मग सुरू झाला त्या दिवसाचा भावनिक प्रवास.

प्रथम क्रमांकासाठी ५० ग्रॅम चांदीचं पदक, द्वितीयसाठी ३० ग्रॅम, तृतीयसाठी २० ग्रॅम, अशा एकूण १०० ग्रॅम चांदीची पदकं, त्यासोबत प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा मोठ्या सन्मानाने सत्कार झाला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते संस्थेचे मानद सचिव डॉ. मिलिंद जी डहाळे दादा आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते शाळेचा अभिमान, मा. विभागीय आयुक्त विशाल जी मकवाने साहेब. व्यासपीठावर सुनील पाटील, प्रा. रवींद्र मराठे, सुशील कोठारी, दीपक केले, बिस्मिल्ला शेख, भटू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, पर्यवेक्षक डी. एच. कोळी सर हे सर्व मान्यवर तेजोमय प्रकाशासारखे उपस्थित होते.

विशाल मकवाने साहेबांनी आपल्या सहज आणि प्रभावी शब्दांत शाळेच्या आठवणी उलगडत विद्यार्थ्यांना जीवनातील मूलभूत मंत्र दिला,
"मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा आणि यशाचे शिखर गाठण्यासाठी सातत्य ठेवा. मोबाईलच्या मायाजाळात अडकू नका. प्रामाणिकपणे परिश्रम करा आणि तुम्ही नक्की जिंकाल."

डॉ. डहाळे दादांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भरभरून बोलताना सांगितलं,
"जिथे आपण घडलो, त्या मातीला परत काहीतरी द्यावं, हा मोठेपणा या १९९७ च्या बॅचमध्ये पाहायला मिळतोय. ही शाळा आणि हे शिक्षक यांच्यामुळेच आपण आयुष्यात काहीतरी साध्य केलंय आणि याचं स्मरण ठेवणं हेच खऱ्या माणूसपणाचं लक्षण आहे."

कार्यक्रमाचं सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक गणेश सिंह सूर्यवंशी सरांनी केलं आणि आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी. एच. कोळी सरांनी अगदी मनःपूर्वक केलं.

या दिवशी शाळेच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं गेलं. कु. अवंती पिंपळगावकर हिला ५० ग्रॅम चांदीचं पदक, प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प, खुश पवार याला ३० ग्रॅम चांदीचं पदक, किर्ती महाजन हिला २० ग्रॅम चांदीचं पदक मा. मकवाने साहेबांच्या हस्ते बहाल झालं.

यासोबतच वेदांत सोनी, कुणाल कोळी, मानवी चौटे, साक्षी पाटील, वैष्णवी भोई, कांचन शिंदे यांचा ‘करिअर सारथी’ हे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्यांनी आपल्या कर्तव्याची प्रामाणिक जबाबदारी निभावली ते सर्व माणूसपणाचे खरे आदर्श ठरले. रामचंद्र धनगर, डॉ. बापू शिरसाठ, प्रशांत महाजन, प्रदीप असोदेकर, संदीप घुगे, राजेश खैरे, सुरेखा तावडे, सुरेंद्र सोनार, संजय बेलदार, गोपाळ चौधरी, गोपाळ सोनवणे, नवनीत सपकाळे, प्रमोद पाटील, महेश पाठक, जितू दाभाडे, मिलिंद हिगोनेकर, योगेश नाईक या सर्वांचे मोलाचे योगदान या क्षणात अजरामर राहणार आहे.

त्या दिवशी शाळेच्या प्रांगणात केवळ बक्षिसांचीच नव्हे तर “मानवतेच्या, ऋणानुबंधाच्या आणि प्रेरणेच्या नव्या पर्वाची सुरुवात” झाली.

शाळेच्या भिंतींनी आज पुन्हा आठवणींना कवेत घेतलं… शिक्षणाच्या मुळाशी प्रामाणिकपणाची शपथ पुन्हा एकदा ऐकू आली… आणि प्रत्येकाने मनात पक्कं ठरवलं.
“या मातीतून जो मोठा होतो, तो मातीला विसरत नाही!”

 शाळेला शतशः वंदन… गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम… आणि १९९७ बॅचच्या या माणुसकीच्या सोहळ्याला लाख लाख सलाम! 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !