“जाणून घ्या त्यांच्या थकलेल्या पावलांची कहाणी…”
“जाणून घ्या त्यांच्या थकलेल्या पावलांची कहाणी…”
आपल्या आयुष्यात जर कोणी खऱ्या अर्थाने देवाचे मूर्तस्वरूप असेल, तर ते म्हणजे आपले आई-वडील. त्यांच्या अस्तित्वामुळेच आपण या जगात उभे आहोत, चालत आहोत, शिकत आहोत, आणि उंच भरारी घेण्याची स्वप्ने पाहत आहोत. दुर्दैवाची गोष्ट अशी की, जसे जसे आपण मोठे होत जातो, तसतसे त्यांच्या त्यागाची, श्रमांची जाणीव आपल्याला कमी होत जाते.
आई म्हणजे प्रेम, माया आणि त्यागाचा मूर्तिमंत अविष्कार. ती आपल्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून पूर्णपणे मुलांच्या भल्यासाठी जगते. ती रात्रंदिवस अविरतपणे कष्ट करत असते — कधी आपल्या भुकेला आवर घालत, कधी आपल्या थकव्यावर मात करत. तिच्या मनात सतत एकच विचार असतो. “माझी मुलं सुखी, आनंदी आणि सुरक्षित असावीत.”
कधी जेवताना आपलं अर्धवट ताट बाजूला ठेवत, “माझं झालं ग, तू खा,” असं म्हणणारी आई…
कधी आपल्या आवडीचा पदार्थ उरला नाही म्हणून मनातल्या मनात हळहळणारी आई…
कधी स्वतःचं दुखणं लपवून आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारी आई…
हा त्याग केवळ आईच करू शकते. तिच्या शांत डोळ्यांच्या आड लपलेला भावनाांचा समुद्र आपल्याला कधी जाणवतही नाही.
आणि वडील?
वडील म्हणजे त्या घराचा न बोलता आधार देणारा मजबूत खांब.
तो पहाटे लवकर उठतो, दिवसभर कष्ट करतो, उन्हातान्हात झिजतो, आणि संध्याकाळी थकलेला शरीर घेऊन परत तो तरी त्याच्या चेहऱ्यावर थकव्याची सावलीही नसते.
शेतात राबणारा असो, बस चालवणारा असो, शिक्षक, दुकानदार, किंवा कारखान्यात काम करणारा असो वडील आपल्या कुटुंबासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी अविरत परिश्रम घेत असतो. कधी कर्ज काढून, कधी स्वतःच्या इच्छा दाबून आपल्या सुखासाठी तो झिजत असतो.
त्याच्या फाटलेल्या शर्टामागे लपलेली जबाबदारीची ओझी, त्या जुन्या चप्पलांमधून जाणवणारी थकवलेली पावलं हे सारं आपण कधी समजून घेतो का?
वडील कधी बोलून दाखवत नाहीत. ते फक्त करत राहतात, आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी.
पण हे आई-वडील आपण कधी खरं ओळखतो?
मोठं झाल्यावर आपण सहज म्हणतो, “आई-वडील मागे राहिले...”
पण विचार करा. खरंच का ते मागे राहिले? की त्यांनी आपल्याला पुढे धाडून, स्वतः मागे थांबण्याची तयारी केली?
आज जर त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवला, तर त्यांच्या डोळ्यांतून अनाहूत अश्रू ओघळतात.
“माझं लेकरू अजूनही मला विसरलेलं नाही,” या एका विचाराने त्यांचं आयुष्य उजळून जातं.
एकदा त्यांच्याजवळ बसून आपण प्रेमाने म्हणालो, “आई-बाबा, आज मी जे काही आहे, ते तुमच्यामुळेच,” तर त्यांना आयुष्यभर मिळालेली सारी थकवा विसरण्याची ऊर्जा मिळते.
आईच्या हाताला माया देऊन धरावं, वडिलांच्या पायाला नतमस्तक होऊन स्पर्श करावा…
त्यांच्या मूक प्रेमाचा आदर करावा, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवावी.
कारण…
त्यांचा श्वास थांबण्याआधी त्यांचं मूल्य कळलं पाहिजे…
नाहीतर उरतात फक्त फोटो, चार चौघात केलेल्या आठवणी…
आणि उरते एक खोल, अधुरी खंत…
म्हणूनच,
वडिलांच्या श्रमांची जाणीव ठेवा…
आणि आईच्या त्यागाचा आदर करा…
हीच खरी भक्ती, हीच खरी माणुसकी, आणि हीच खरी जबाबदारी!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा