"संघर्षाशिवाय यशाचं दार उघडत नाही"
"संघर्षाशिवाय यशाचं दार उघडत नाही"
यश म्हणजे काय? चमचमीत गाड्या, मोठ्या घरातलं आयुष्य, की लोकांच्या टाळ्यांनी भारलेलं नाव? खरं पाहिलं, तर यशाचं खरं रूप फार साधं असतं. स्वतःला सिद्ध करणं, स्वप्नांना प्रत्यक्षात आणणं, आणि मागे वळून पाहिल्यावर मनात समाधान असणं.
पण आजच्या या झपाट्यानं चाललेल्या जगात यशाचं अर्थही बदलू लागलाय. पटकन मिळालं पाहिजे, झटक्यात यावं, एक रात्रीत प्रसिद्ध व्हावं, असा अट्टाहास! आणि म्हणूनच शॉर्टकटच्या वाटा शोधणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. पण हे कोणीच लक्षात घेत नाही की, या शॉर्टकटच्या रस्त्यांवरून चालताना आपण आपली खरी किंमतच हरवून बसतो.
आपण प्रत्येकजण एखाद्या पायऱ्यांवरून वर चढतोय, पण त्या प्रत्येक पायरीला आपलं काहीतरी गमावून मिळालेलं असतं. रात्रभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं, ट्रेनिंगमध्ये घाम गाळणाऱ्या खेळाडूच्या शरीरावर पडलेल्या खपल्या, आणि रोज हातात केवळ १० रुपये घेऊन मोठं स्वप्न पाहणाऱ्या एका गरिबाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हे असतं खऱ्या यशाचं इंधन.
हे यश मिळवण्यासाठी कोणत्याच शॉर्टकटने मदत केली नाही. कारण शॉर्टकट म्हणजे काय? तुमच्या कष्टांची थट्टा! तुमच्या संघर्षांची अब्रूच काढणारा एक बनाव. शॉर्टकट तुम्हाला एका ठिकाणी नेईलही, पण तिथं पोचल्यावर तुम्हाला कोणतं उत्तर द्यायचं हेच तुमच्याकडे उरणार नाही. कारण त्याच मार्गावरून चालताना तुम्ही काहीच शिकलाच नाही.
यश तेव्हाच सुंदर दिसतं, जेव्हा त्यामागे झोप न लागलेल्या रात्री असतात, अपयशाचे अश्रू असतात, आणि मनाच्या तळातून आलेल्या हाकांचा आवाज असतो. एक आई जेव्हा तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा मारते, तेव्हा तिचं यश तिच्या मुलाच्या पदवीमध्ये झळकतं. एक शेतकरी जेव्हा उन्हाळ्याच्या चटके सहन करून रानात घाम गाळतो, तेव्हा त्याच्या हातात आलेला पहिला सुगंधी पीक त्याचं खरं यश असतं. आणि अशा यशाला कुठलाही शॉर्टकट नाही.
म्हणूनच, जर यश हवं असेल, तर घामाला न घाबरता झेप घ्या. पडाल, दुखाल, पण शिकाल. जे शॉर्टकटच्या वाटेवर नाही शिकता येत. यश म्हणजे झाडासारखं त्याची मुळं खोल जातात तेव्हाच ते फुलतं. वर झाड कितीही सुंदर दिसलं, पण मुळांना जर मेहनतीचं पाणी नसेल, तर ते लवकरच कोमेजतं.
आज जग तुमच्या यशाच्या गजरात टाळ्या वाजवेल, फोटो काढेल, पोस्ट लिहील. पण ते तुम्ही मात्र नेहमी जाणत असाल की, त्या यशामागे असतो एक असा रस्ता, जिथे पाऊल टाकताना अश्रू पुसावे लागले, स्वप्नांसाठी अनेकदा स्वतःला मागे ठेवावं लागलं.
आणि म्हणूनच
यशाच्या वाटेवरून चालायचं असेल, तर थोडं वेळ लागेल, पण तो प्रवास स्वतःच्या पायांनी, आत्मविश्वासानं आणि मेहनतीच्या पावलांनीच पार करा. कारण यशात सौंदर्य तेव्हाच असतं, जेव्हा त्यात संघर्षाची कहाणी मिसळलेली असते… शॉर्टकटची नाही.
"यश हे गिफ्ट नाही... ते एक तपश्चर्या आहे."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा