गर्व ओसरतो, कायदा बोलतो !
गर्व ओसरतो, कायदा बोलतो !
गावाकडच्या मातीत वाढलेली माणसं साधी, सरळ, पण काही वेळा भुलवली गेलेली असतात. विशेषतः जेव्हा त्यांच्या हातात थोडा पैसा येतो, किंवा एखाद्या राजकीय पक्षात पद मिळतं, तेव्हा त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि नजरेत एक वेगळीच मस्ती झळकते.
"आता माझं कोणी काही ही वाकडं करू शकत नाही," अशी भावना त्यांच्या मनात खोलवर रुजते. त्यांच्या डोळ्यात तुच्छतेची झाक दिसते, आणि चालण्यात एक अहंकाराचे सावट स्पष्ट जाणवतं. ते स्वतःला सत्तेचं सूर्य समजू लागतात आणि वाटू लागतं "सगळे माझ्या समोर झुकले पाहिजेत."
पण या विचारांचं मूळ अज्ञानात असतं.चार चांगले दिवस मिळाले, एखादं स्थानिक पद लाभलं, किंवा एखाद्या पुढाऱ्याची ओळख मिळाली की काही जण इतके भारावून जातात की त्यांना कायदाही क्षुल्लक वाटू लागतो.
"तो गबाळा मला न्याय देणार?""माझ्याकडे ओळखी आहेत." "पोलिससुद्धा माझ्या शब्दात वागतं."
अशा गर्विष्ठ भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात.पण… कायद्याचं नाव घेणाऱ्यांना धमकावता येतं, पण कायद्या स्वतःला झाकून ठेवता येत नाही.
पैसा, पक्ष, ओळख या गोष्टी क्षणभंगूर आहेत.
या गोष्टी माणसाच्या मागे केवळ काही काळासाठी उभ्या राहतात, पण कायदा? तो गप्प बसतो, शांत राहतो... आणि योग्य क्षणी अशा ठामपणे उभा राहतो की गर्विष्ठ माणसाच्या पायाखालची जमीनच सरकते.
गावात एक जुनी म्हण आहे.
"हवा डोक्यात गेली की, नजर एक दिवस झुकतेच."
आणि हेच आजवर अनेक वेळा खरं ठरलेलं आहे.
माणूस कितीही वर गेला, सत्तेच्या खुर्चीवर किती ही दिमाखात बसला, तरी कायद्याची सावली त्याच्या मागे असतेच. ती सावली शांत असते, पण ती बघत असते. आणि वेळ आली की, ती सावली सावली न राहता. न्यायाचा तेजस्वी प्रकाश बनते.
कायद्याला ना तुमच्या गाड्यांचं कौतुक असतं, ना तुमच्या अंगरक्षकांच्या सलामाचं.त्याला ना तुम्ही कुणाच्या ओळखीचे आहात, ना कोणत्या पक्षाचे प्रतिनिधी आहात, याचं काहीच महत्त्व नसत.
कायद्यानं हजारो चेहरे पाहिले आहेत.काही गरीबांचे, काही श्रीमंतांचे, काही सत्तेवर बसलेल्यांचे.
पण न्यायाच्या तराजूत त्या चेहऱ्यांची किंमत एकसारखीच असते. सत्याच्या वजनावर आधारित.
आज ही अनेक ठिकाणी असं दिसतं.कुणीतरी एखाद्या गरीबाचं शेत हिसकावतो,कुणीतरी एखाद्याच्या घराच्या वाटेवर अडथळा उभा करतो,कुणीतरी सत्तेच्या बळावर दुसऱ्याला दडपतो...
आणि असं करताना त्यांना वाटतं "आपण कायदा विकत घेतलाय."पण एक दिवस येतो. जेव्हा एखादा सामान्य, पण न डगमगणारा माणूस एक साधा अर्ज घेऊन कायद्याच्या दारात उभा राहतो.
त्या दिवशी ना कोणतं पद मदतीला येतं, ना कोणतं नातं,
ना पैसा उपयोगी पडतो, ना ओळख कामी येते.
कामी येतो तो फक्त – न्याय.
न्याय कधीही घाईत देत नाही, पण उशिरा का होईना, तो नक्की मिळतो.आणि जेव्हा तो मिळतो, तेव्हा गर्व झुकतो, आणि सत्तेच्या भिंती कोसळतात.
तेव्हा त्या माणसाच्या मनात एक वेदनादायक स्वीकार दाटून येतो."मी जे काही समजत होतो, ते फसवणूक होती.मी मोठा नव्हतो… फक्त मोठा वाटत होतो."
गावकऱ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी.
खरं मोठेपण हे पदात नाही,ते लोकांच्या मनात असतं.
कोणीतरी तुमच्या नावाने न्याय मागतो, तेव्हा तुम्ही मोठे.
कोणीतरी तुमचं नाव घेतल्यावर डोळे भरून येतात, तेव्हा तुम्ही मोठे.पण जर लोक फक्त भीतीपोटी गप्प बसतात, तर ती तुमची सत्ता नाही.ती लोकशाहीची हार आहे.
आणि लक्षात ठेवा.लोकशाही हरली की, कायदा जागा होतो.आणि जेव्हा कायदा जागा होतो.तेव्हा पदं झुकतात, अहंकार वितळतो, आणि सत्य उभं राहतं.
म्हणूनच...
कायद्यापेक्षा वर कोणीही नाही.तुमचं नाव कितीही मोठं असो,तुमच्याकडे किती ही पैसा असो,किंवा तुम्ही कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी असोत.कायदा तुम्हाला नावानं नाही,कामानं ओळखतो.आणि त्या ओळखी पुढे,तुम्ही कोण, कुठले, आणि किती "मोठे" आहात.याला काहीच अर्थ उरत नाही. उरतो फक्त कायदा.....म्हणूनच म्हणतो कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल.
एवढ मात्र खरं.........
#गर्व_फसवतो_कायदा_जिंकवतो
#पद_क्षणिक_न्याय_शाश्वत
#कायद्याच्या_सावलीत_सगळे_समान
#लोकशाहीचा_खरा_पालक_म्हणजे_कायदा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा