शेतकऱ्याच्या घामाला न्याय द्या, मायबाप सरकार…!khandesh Majha
शेतकऱ्याच्या घामाला न्याय द्या, मायबाप सरकार…!
मातीच्या कुशीत जन्म घेतलेला तो माणूस, जेव्हा सूर्योदयाआधीच उठतो, तेव्हा त्याच्या मनात एकच आशा असते. यंदा पीक चांगलं यावं. केवळ पोटापाण्यासाठी नव्हे, तर मातीसोबत असलेल्या आत्मीय नात्यासाठी तो पुन्हा पुन्हा नांगर उचलतो, पुन्हा पुन्हा रानात पाऊल टाकतो. त्याचं रान हेच त्याचं आयुष्य, त्याची पूजा, त्याचा श्वास. परंतु या देवतुल्य माणसाच्या पाठीवर आज कर्जाचं ओझं इतकं वाढलं आहे की शरीर नाही, तर मनच वाकून गेलं आहे.
आज ही कोणत्या तरी गावात एखादा शेतकरी रात्रभर जागून आपल्या पत्नीला म्हणतो, "तुझं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागेल गं, मुलाच्या शिक्षणासाठी काहीतरी करावं लागेल." आणि ती बायको, डोळ्यांतून सांडणाऱ्या अश्रूंनी भिजलेल्या नजरेनं उद्याचं रान पाहते. कारण तिचं दुःख ही त्या मातीत मिसळून गेलेलं असतं.
मायबाप सरकार, किती काळ आमचा घाम मातीमध्येच सुकून जाईल? किती दिवस आम्ही कर्जाच्या भाराखाली दबून जगणार? तुम्ही निवडणुकीच्या सभांमध्ये आम्हाला देव मानून, हात जोडून आश्वासनं दिली होती. की तुमचं सरकार सत्तेवर आलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. पण वर्ष उलटून गेलं… आणि आमचं नाव कुठल्याच यादीत नाही.
बँकांचे अधिकारी घरी येऊन धमक्या देतात, जप्तीच्या नोटीसा देतात. कुणाच्या शेतावर जप्तीचे फलक लागलेत, कुणाच्या शेतात नांगरा ऐवजी आता भयाण शांतता आहे… कारण तो माणूस आता हयात नाही. काही शेतकऱ्यांनी हे ओझं सहन न झाल्यामुळे जीवन संपवलं. त्यांनी आत्महत्या केली नाही, तर त्यांनी सरकारच्या उदासीनतेवर आपला शाप ठेवला.
कोरडं रान, अनियमित पाऊस, महागलेली खते, बियाण्यांच्या तुटवड्याने उभं राहिलेलं संकट, बाजारात मिळणारा कमी भाव यामध्ये शेतकऱ्याचं अस्तित्वच हरवत चाललं आहे. तो फक्त आकड्यांत उरला आहे की काय? की निवडणुकीपूर्वीच्या भाषणांमध्ये?
जर शेतकरीच रानात राहिला नाही, जर त्याच्या हातात नांगरा ऐवजी बँकेची नोटीस आली, तर या देशाची भूक कोण भागवणार? जो माणूस आपला घाम सांडून देशाला अन्न देतो, त्याच्याकडेच आज दोन वेळचं अन्न नाही. ही बाब दुर्दैवाची नव्हे, तर लाजिरवाणी आहे.
मायबाप सरकार, कर्जमाफी ही शेतकऱ्याची भीक नाही ती त्याची गरज ही नाही. ती त्याचा हक्क आहे. त्याने देशाला अन्न दिलं, स्वतः उपाशी राहून रान पिकवलं. आणि आज त्याच्या डोळ्यांत हताशतेचे अश्रू आहेत. हे अश्रू पुसणं, हे त्याच्या वेदनेला उत्तर देणं, हे तुमचं आद्य कर्तव्य आहे.
तुम्ही म्हणता, योजना सुरू आहेत, राबवल्या जात आहेत. पण त्या योजना खरंच पोहोचतात का तिथे, जिथे वीज नाही, मोबाईल रेंज नाही? त्या शेतकऱ्याला काय ठाऊक 'ऑनलाइन अर्ज' काय असतो? त्याला फक्त आधार हवा आहे. त्याचं आत्मभान जपणं हीच खरी योजना आहे.
आज शेतकऱ्याच्या मुलाला शाळा सोडावी लागतेय, कारण फी भरता येत नाही. मुलीचं लग्न लांबवलं जातंय, कारण घरातल्या सगळ्या पैशांनी कर्ज फेडायचं आहे. आणि तुम्ही अजून ही तारीखांमध्ये आणि यादीत अडकलेले आहात. हे केवळ प्रशासकीय अपयश नाही. हे माणुसकीचं ही अपयश आहे.
शेतकऱ्याचं जीवन अजून ही उसाच्या रसरशीत फांद्या इतकंच नाजूक आहे. जरा जरी संकट आलं, की सगळं कोसळतं. त्याला आधार द्यायचा असेल, तर आता वेळ आहे. अजून उशीर झाला, तर केवळ पिकांचं नुकसान होणार नाही.तर माती सकट माणुसकी ही गमावली जाईल.
म्हणूनच हे नम्र आवाहन कृपया दिलेल्या आश्वासनांना आता कृतीची जोड द्या. निवडणूक जिंकल्यानंतर सत्तेच्या उबेत आश्वासन विसरू नका. कारण ही माती, ही माणसं, हे रान हेच तुमचं खरं भांडवल आहे.
कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर घ्या. अजून एका घरात चूल विझण्याआधी, अजून एका शेतकऱ्याचं हसू मावळण्याआधी, अजून एक लेकरू आपल्या बापाच्या कुशीत विसावण्याआधी शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंदाचं थेंब यावा, अशी कृती करा.
आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, पण न्यायाची अपेक्षा ठेवतो. कारण आम्ही शेवटचा घास देऊ शकतो, पण शेवटची आशा मात्र आज ही आमच्या मनात उगवतेय.
आमचं रान अजून ही तयार आहे… फक्त त्यात बी टाकायचंय… आणि विश्वासाचं पाणी द्यायचंय… तुमच्या वचनांच्या नावावर.
"शेतकऱ्याच्या अश्रूंना उत्तर द्या, सरकार… कारण त्या अश्रूंपाशी देशाची भूक शांत होते."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा