सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!...

सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!...

             भारत हा मूळ सिंधू अर्थात कृषीसंस्कृती असलेला देश. या देशामध्ये स्त्री सत्ताक,मातृसत्ताक तसेच गणव्यवस्था होती. या देशात निऋत्ती नावाची गणमाता होती. आपली मूळ संस्कृती कृषी संस्कृती होय. आर्यांनी या देशातील मूळ क्षेत्रीय लोकांवर हल्ले करून, आपापसात भांडणे लावून, अनेक षडयंत्र करून येथील संस्कृती बुडविली.
           सिंधू संस्कृतीत उत्तम पद्धतीची विवाहसंस्था होती. स्त्री हीच कुटुंबाची प्रमुख होती. कालांतराने आर्यांनी काल्पनिक ग्रंथांची निर्मिती रचून येथील विज्ञानवादी कृषी संस्कृती नष्ट केली. ही महान कृषी संस्कृती पुनर्जीवित व्हावी यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी कृषी संस्कृतीच्या पूर्वजांच्या इतिहासाचा पुन्हा विज्ञानवादी, विवेकवादी , समताधिष्ठित समाज रचना उभे करण्याचे महत्त्वपूर्ण सत्कार्य केले. त्यासाठी त्यांनी शिक्षणावर भर देऊन सत्यशोधक विचाराचा समाज निर्माण केला. 
          पुरोहितवर्ग बहुजन कष्टकऱ्यांचे पूजापाठ, लग्नविधी यासाठी धर्माच्या आडून शोषण करण्याचा धंदा चालू ठेवलेला होता. लोकांना भ्रमित करून खोट्या रुढी, परंपरा, चाली सुरू थोपलेल्या होत्या. बहुजनांना गुलामीत ढकलणारे ग्रंथ पुरोहितांना देवापेक्षा श्रेष्ठ मानत होते अर्थातच भूदेव. अशा पद्धतीने पुरोहितांनी भारतातील क्षेत्रीय लोकांना चातुर्यवर्ण व्यवस्था लादून शूद्र अर्थात गुलाम, दास ठरविले होते. अशा ह्या शोषण करणाऱ्या पुरोहितशाही विरुद्ध चार्वाक, भगवान महावीर,गौतम बुध्द, चक्रधर स्वामी, महात्मा बसवन्ना, संत रविदास, संत कबीर, संत नामदेव, संत सावता, संत तुकोबाराय, संत गाडगेबाबा या संतांनी एल्गार पुकारला.     
         बळीराजा हे कृषी संस्कृतीचे खरा वारसदार होते. त्यांचा प्रेरणादायी इतिहास महात्मा फुले यांनी जगासमोर आणला. आपली मूळ कृषी संस्कृती लोकांना समजावून सांगितली. मातृसत्ताक पद्धतीने राज्यकारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पवाड्याच्या माध्यमातून जगासमोर आणला. महात्मा फुले व सावित्रीमाई यांनी अथक प्रयत्न करून तसेच अतोनात हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची ज्योत भारतात लावली. जातिभेदावर, विषमतेवर आधारलेल्या विचारांना कडाडून विरोध केला. शेतकरी कष्टकरी व स्त्रियांवर शोषण करणारे कायद्याचे पुस्तक मनुस्मृतीला आपल्या विचाराने नेस्तनाबूत केले. समाजाला विवेकावर उभे करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विवाह भरमसाठ पैसे घेऊन केले जात. पुरोहितांना शेतकऱ्यांचा पैसा, शिधा आटा चालत होता परंतु ती लोकं आवडत नव्हते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातुन विवाह लावण्यासाठी सत्यशोधक लोकांची भक्कम फळी उभी केली. भारतामध्ये सत्यशोधक पद्धतीने आंतर जातीय विवाह अनेक लोकांनी लावून समाजाला समतेची ममतेची दिशा दिली होती. संत रविदास, संत बसवन्ना यांनी आंतरजातीय विवाहसाठी फार मोठा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये आंतरजातीय विवाह लावण्याची नोंद आहे.
          कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अनेक अंतरजातीय लग्न करून समानतेचा पाया रचला होता. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहास मान्यता दिलेली होती. त्यानुसार आपल्या आप्तेष्ट लोकांचे विवाह आंतरजातीय पद्धतीने लावले. राजमाता अहिल्यामाई होळकर यांनीही आपल्या काळात आपल्या मुलीचे लग्न आंतरजातीय पद्धतीने लावल्याची नोंद आहे. सत्यशोधक समाजाच्या या मूळ तसेच आधुनिक विचाराच्या विवाहाने समाजात सकारात्मक बदल घडू लागला. समाजात दिवसेंदिवस सत्याची कास धरणारे सत्यशोधक जागोजागी तयार झाले. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ब्राह्मणेतर चळवळीच्या लोकांनी स्वार्थासाठी शेटजी, भटजी निर्मित काँग्रेस पक्षात पद, प्रतिष्ठेसाठी आपले इमान गहाण ठेवले. परिणामी सत्यशोधक पद्धतीने होणारे धार्मिक विधी नगण्य झाले व शेतकरी कष्टकरी आपल्या मूळ संस्कृती पासून दूर गेला. या मंदावलेल्या सत्यशोधक चळवळीला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक विचाराची फळी पुन्हा निर्माण झालेली आहे. या फळीने नव्याने सत्यशोधक पद्धतीने अनेक विवाह लावले. त्यामध्ये स्वजातीत, आंतरजातीत विवाह करण्याचे प्रमाण वाढले. केवळ विवाह नाही तर सर्व प्रकारच्या धार्मिकविधी सत्यशोधक पद्धतीने करण्याचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात पार पडत आहेत.
           भारतातील थोर समाज क्रांतिकारक , आधुनिक भारताचे शिल्पकार, स्त्री शिक्षणाचे जनक, शिक्षण क्रांतीचे प्रणेते सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या शेतकरी कष्टकरी समाजाला गुलामगिरी व शोषणापासून मुक्त करण्याचा चंग बांधला . १९ व्या शतकात शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी १ जानेवारी १८४८ ला पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि यानंतर पुण्यामध्ये १२ शाळा सुरू करून खऱ्या अर्थाने शिक्षणाची क्रांती केली. या कार्यामध्ये भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मोलाची साथ दिली. त्यांनी शिक्षणाला महत्त्व देत अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहण्याचा संदेश दिला स्वतः मराठीमध्ये मंगलाष्टक रचले आणि आपल्या बहुजनांचे विवाह हे सत्यशोधक पद्धतीने केले. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य "सर्वसाक्षी जगत्पती नकोच त्याला मध्यस्थी " असे होते.
          आज महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून अनेक विवाह सत्यशोधक पद्धतीने होत आहेत यानंतर दशपिंडविधी, गृहप्रवेश असे अनेक संस्कार हे सत्यशोधक पद्धतीने होत आहे याचा सार्थ अभिमान आहे हीच खरी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याला आदरांजली होय. सत्यशोधक समाज संघ ही १८ पगड जाती, बारा बलुतेदार जाती समुदायाचीही सामाजिक संघटना आहे. महात्मा फुले यांनी कुळवाडीभूषण कष्टकरी प्रतिपालक छत्रपती शिवराय यांना आदर्श मानुन या देशात पहिला शिवजन्मोत्सव साजरा करून शिवरायांचा विचार घरा - घरात पोहोचविला. राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, केळुस्कर गुरुजी, भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांना गुरू मानले.
           आजघडीला खेड्यातून शहराकडे शिकून सवरलेल्या शेतकरी कष्टकरी समाजामध्ये वैदिक पद्धतीने विवाह लावले जात आहेत याचे अतिव दुःख होत आहे. वैदिक पद्धतीने विवाह सोहळा, मोठा बँड बाजा, प्री विडिंग आणि यासोबत आलेल्या मान्यवरांना आहेर म्हणून साड्या, भांडे, घमेले, डबे देणे अशा पद्धतीच्या चालीरीती या बहुजन समाजाला आर्थिक दृष्ट्या मागे घेऊन जाणाऱ्या आहेत. एक विवाह सोहळा अशा पद्धतीने केला तर त्या कुटुंबाला चार ते पाच लाख रुपयाचा कमीत कमी खर्च येतो. पुरोहित वर्ग आपल्याकडून कमीत कमी २० ते ३० हजार रुपये ( साखरपुडा ते विवाह नंतरचे सर्व विधी धरून ) निरर्थक घेऊन जातो कारण त्यांनी अगोदर पासूनच आपल्याला भीती घालून दिली आहे. आज वर्तमानामध्ये आपल्या परिवारात मुलाचा जन्म झाल्यापासून तर विवाह लावणे, गृहप्रवेश, आणि शेवटी मृत्यु झाल्यानंतर सुद्धा दशक्रिया विधीसाठी पैसे घेऊन तोच आपल्याला माहीत नसलेल्या संस्कृत भाषेतील मंत्र म्हणतो. अशी पोटापाण्याची व्यवस्था त्याने करून ठेवलेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पुरोहीत वर्गाने छत्रपती शिवरायांना छळले , राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नानाच्या वेळेस पुराणोक्त मंत्र म्हणून त्यांची अवहेलना केली. माझा प्रश्न हा आहे की, कशाला पाहिजे आम्हाला संस्कृत मंत्र.
         आज सत्यशोधक विवाह लावणे ही काळाची गरज झालेली आहे. सत्यशोधक विवाह लावायचा असेल तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील पातोंडे येथील भगवान रोकडे, दस्केबर्डीचे भगवान बोरसे सर, धुळे येथील राजकिशोर तायडे, छत्रपती संभाजीनगर येथील साळूबा पांडव, एरंडोल येथील शिवदास महाजन हे सत्यशोधक विधीकर्ते आहेत महाराष्ट्रभरात जवळपास 200 च्या वर विधीकर्ते आहेत. सत्यशोधक विवाह सोहळ्याला आपण सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नाममात्र सत्यधर्म दान घेत असतो. याची सुद्धा आपल्याला सत्यशोधक समाज संघाकडून रीतसर पावती मिळते. यामध्ये हळद, सत्यशोधक विवाह सोहळा व दुसऱ्या दिवशी सत्यपूजा यामध्ये केली जाते. या व्यतिरिक्त आपण एक रुपया सुद्धा घेत नाहीत. सत्यशोधक विवाह सोहळा मध्ये कुठलेही शोषण नाही उलट साड्या, भांडे, घमेले या ऐवजी आपल्या इच्छेनुसार पुस्तक वितरण किंवा वृक्षांचे रोपांचे वितरण केले जाते तसेच लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या संस्थेला देणगी दिली जाते.पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. वृक्षांची रोपे आपल्या परिसरात, आपल्या गावात, शहरात, शेतात लावल्याने वृक्षांचे संवर्धन होते हा संदेश या सत्यशोधक विवाह मार्फत दिला जातो.

*सत्यशोधक विवाह कसा असतो ?....*

          आदल्या दिवशी रीतसर वधू-वरांचा हळदीचा कार्यक्रम होतो तसेच आपले मूळ ग्राम संस्कृतीचे कार्यक्रम सुद्धा घेतले जातात.
        सत्यशोधक विवाहाच्या सुरुवातीला खंडोबाची तळी भरून/उचलून सुरुवात केली जाते. विवाह मंडपात वधू-वरांचे आगमन होत असताना क्रांतीची मशाल पेटवून आगमन होते. यानंतर वधू-वरांच्या व त्यांच्या मात्यापित्यांच्या हस्ते महात्मा बळीराजा, भगवान विठ्ठल, कुळमाता, तसेच महापुरुषांच्या, संतांच्या, महामातांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते.
       तदनंतर महात्मा फुले रचित सत्यधर्माचा अखंड /प्रार्थना म्हटली जाते. यानंतर राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांची मराठी भाषेतून मंगलाष्टक म्हटले जातात. यानंतर वधू आणि वर हे सर्वांसमक्ष सहजीवनाची शपथ घेतात. त्यानंतर विवाह जोडप्यास सूत बंधनात जीवनभरासाठी जोडले जाते. अशा पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होतो. 
          या विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही कर्मकांडाला, अंधश्रद्धेला थारा नाही. कुठल्याही व्यक्तीचे शोषण नाही याउलट सत्य सांगून शोषणाविरुद्धचा हा लढा सत्यशोधक समाजाने सुरू केला आहे. या अगोदर आपली विवाह जसे होतात त्याच पद्धतीने सत्यशोधक विवाह होतात. आपल्या सत्यशोधक विवाह सोहळ्यामध्ये भटजी अर्थात पुरोहिताची म्हणजेच मध्यस्थीची आवश्यकता नाही आपले धार्मिक विधी आपणचं करावे असा महात्मा जोतिराव फुले यांचा संदेश आहे आणि तोच संदेश सत्यशोधक समाज संघ जोपासत आहे.
          आज आपला शेतकरी कष्टकरी समाज कुंडली मागे अडकलेला आहे. या कुंडली आणि गुणांमुळे, अंधश्रद्धेमुळे चांगले विवाह स्थळ तो सोडून देतो आणि नंतर पश्चाताप करतो. प्री वेडिंग सारखा अतिशय फालतू प्रकार आता तरुण - तरुणींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज प्री-वेडिंग केल्यानंतर सुद्धा ही लग्न मोडले जात आहेत. कुठेतरी आपण या खर्चाला आवर घातला पाहिजे आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह लावले पाहिजेत. या प्री-वेडिंगला सत्यशोधक विवाहामध्ये थारा नाही.
         आज विवाह सोहळा म्हणजे खूप खर्चिक बाब झालेली आहे. समाजामध्ये देखावा करण्याचा एक वेगळा पॅटर्न समोर येत आहे. या ऐवजी आपण विवाह सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला तर तो समाजासाठी हितकारक ठरेल. तुम्ही सत्यशोधक विवाह सोहळ्या निमित्त होतकरू शोषित, पीडित,मुला-मुलींना, अनाथ आश्रमातील लेकरांना जेऊ घाला, त्यांना शैक्षणिक साहित्य भेट द्या, आलेल्या मान्यवरांना पुस्तक / ग्रंथ भेट द्या, वृक्षांची रोप भेट द्या. असा विचार दिल्यानंतर आपल्या समाजाचे व देशाचं हित जोपासले जाईल असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपल्या महापुरुषांचा जयंती व स्मृतिदिन आपण साजरे करतो पण त्यांचा विचार आत्मसात करत नाही.
            सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार ( छत्रपती संभाजी नगर ) उपाध्यक्ष दत्ताजीराव जाधव ( सातारा ) सचिव डॉ.सुरेश झाल्टे ( धुळे ) आणि सर्व विश्वस्त यांच्या माध्यमातून सत्यशोधक समाज संघाची फळी संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे समाज हळू - हळू परिवर्तनेच्या दिशेने जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये या ३ वर्षात जवळजवळ १०० च्या पुढे सत्यशोधक विवाह, दशपिंडविधी, गृहप्रवेश, पुण्यतिथी विधी संपन्न झालेले आहेत. मी पी डी पाटील आपणा सर्वांना यानिमित्त आवाहन करतो की, आपण आपल्या गावा - गावात ,तालुक्यात, जिल्हयात सत्यशोधक विवाह लावले पाहिजेत. सत्यशोधक विवाह लावणे ही काळाची गरज आहे.

✒️ मा.पी डी.पाटील सर
जिल्हाध्यक्ष - सत्यशोधक समाज संघ, जळगाव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !