मनात उतरणारे विष… आणि तुटणारी नाती...!
मनात उतरणारे विष… आणि तुटणारी नाती...!
कधी कधी आपल्याकडे काही शब्द पोहोचतात, जे साधे वाटतात पण आतून हळूहळू आपल्या नात्यांच्या मुळाशीच कुरतडू लागतात. कोणी आपल्या जवळ येऊन, हळू आवाजात, ‘तुझ्याबद्दल अमुक अमुक बोलत होतं’ असं सांगतं… आणि तो क्षण असतो एका अदृश्य विषाची सुरुवात होण्याचा.
हे विष ना डोळ्यांना दिसतं, ना हाताला लागतं, पण ते मनात झिरपायला लागलं की, हळूहळू आपल्याला त्या व्यक्तीबद्दल संशय, कटुता, आणि अंतर निर्माण होतं. खरं म्हणजे ते शब्द कदाचित पूर्ण खोटे असतात, किंवा अर्धवट सत्य असतं, पण ते सांगणाऱ्याचा हेतू एकच दोन मनं वेगळी करणं.
विष पसरवणारे लोक कधीच कोणाची निस्वार्थी मैत्री, खरी माया, किंवा घट्ट विश्वास पाहू शकत नाहीत. कारण त्यांना अशा नात्यांचा अनुभवच नसतो. ते आपल्याला गोड बोलून जवळ घेतात, पण आपल्या कानात दुसऱ्याविषयी तेवढंच ‘जखम करणं’ पुरेसं असतं.
अशावेळी थांबून स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा
“हा सांगणारा खरंच माझा हितचिंतक आहे का, की माझ्या मनात गुपचूप विष ओतणारा आहे?”
कारण जेव्हा आपलं नातं मजबूत असतं, तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला मधे पडण्याची संधीच मिळत नाही. पण जिथे आपण न विचार करता दुसऱ्यावर संशय घेतो, तिथे हे विष आपलं काम पूर्ण करतं.
कधी कधी आपल्याला भांडणाचं खरं कारण तो व्यक्ती नसतो, ज्याच्यावर आपण रागावतो; खरं कारण तो असतो, ज्याने हे विष आपल्यात उतरवलं. म्हणूनच अशा लोकांची नीती, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं बारकाईने पहा. काही लोक मैत्रीच्या नावाखाली फक्त आपलं समाधान शोधतात दुसऱ्याचे संबंध तुटल्याचा समाधान.
जी नाती वर्षानुवर्षे विश्वासाने उभी असतात, ती अशा क्षुल्लक विषाने तुटू देऊ नका. कारण एकदा विश्वासाचा पूल ढासळला, तर पुन्हा तो बांधता येतो, पण त्यावरचा पहिल्या पावलांचा निश्चिंतपणा कायमचा हरवतो.
शब्दांची ताकद मोठी असते, पण चुकीच्या हातात गेली की ती तलवारीपेक्षा धारदार असते. आणि ती जखम दिसत नाही, फक्त मनातून रक्तस्राव करत राहते. म्हणूनच कुणी काही सांगितलं, तरी थेट त्या व्यक्तीशी बोला, स्पष्टता आणा. तुम्ही त्या नात्याचे किती जपणूकदार आहात, हे त्या क्षणी ठरते.
खरी मैत्री, खरं प्रेम, खरी माया हे सगळं स्वच्छ पाण्यासारखं असतं. आणि स्वच्छ पाण्यात थेंबभर विष पडलं तरी ते पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे नातं जपा, पण त्यात कोणता थेंब पडतोय हे वेळेवर ओळखा. कारण खरी संपत्ती म्हणजे आपल्या जवळ असलेले प्रामाणिक माणसं… आणि ती गमावणं, हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान असतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा