मीच चांगला या भ्रमाच्या पलीकडे...!


मीच चांगला या भ्रमाच्या पलीकडे...!

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा आपण कोणाच्या तरी वागण्याने अस्वस्थ होतो. विशेषतः जेव्हा समोरचा सतत स्वतःचं कौतुक करत राहतो."मीच चांगला", "मीच योग्य", "माझ्यामुळेच सगळं चाललंय" अशा शब्दांतून तो स्वतःला उंच दाखवायचा प्रयत्न करत असतो. कधी हसू येतं, कधी कंटाळा, पण त्याच्या अशा वागणुकी मागे काय दडलंय, हे आपल्याला लगेचच कळत नाही.

माणूस जेव्हा सतत स्वतःचं चांगुलपण जगाला दाखवू पाहतो, तेव्हा खरं तर तो स्वतःलाच त्यावर विश्वास बसवायचा प्रयत्न करत असतो. ही केवळ आत्मविश्वासाची खूण नसते, तर अनेकदा मनाच्या खोल कप्प्यातली असुरक्षितता असते. आपण पुरेसे आहोत का, लोक आपल्याला मान देतील का, आपली किंमत आहे का या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वतःचं कौतुक करून मिळवायची असतात.

पण खरी चांगुलपणा ही कधीच मोठमोठ्याने बोलून सांगावी लागत नाही. ती कळते. शब्दांशिवाय, गोंगाटा शिवाय. एखाद्याचं साधं हसणं, एखाद्या क्षणी दिलेली मूक साथ, कुणाच्या ही न मागता केलेली मदत या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला त्या व्यक्तीच्या मोठेपणाची जाणीव करून देतात.

चांगुलपणा ही एक भावना आहे.दाखवण्याची नव्हे, तर जगण्याची. आणि ही भावना केवळ कृतीतूनच दिसते. ज्या माणसाच्या मनात खरंच प्रेम, आपुलकी, नम्रता असते, त्याला स्वतःचं काही विशेष करून दाखवायची गरज भासत नाही. तो आपले कर्तव्य निभावत राहतो. तो कोणाचं लक्ष वेधून घ्यायला करत नाही, पण तरीही लोक त्याच्याकडे ओढले जातात कारण त्याचा स्वभावच बोलका असतो.

अगदी झाडासारखा फळांनी भरलेलं झाड कधीच आवाज करत नाही. ते नमतं, झुकतं, पण त्याच्या सावलीखाली बसल्यावर त्याची खोली समजते. तसंच काहीसं माणसांचं ही आहे. जे जास्त बोलत नाहीत, पण त्यांच्या संगतीने मन शांत होतं, मन समृद्ध होतं.

समोरच्याचं खोटं उंचावलेपण पाहून आपणही कधी कधी विचार करतो. आपलीच किंमत नाही का? पण लक्षात ठेवा, जो खरंच चांगला असतो, त्याला वेळ लागतो. पण तो लोकांच्या हृदयात घर करतो. त्याची ओळख एक-दोन कौतुकाच्या शब्दांपुरती राहत नाही, ती आठवणींमध्ये, विश्वासात आणि प्रेमात टिकून राहते.

शेवटी हेच खरे जर चांगुलपणाची गरज सतत दाखवण्याची असेल, तर तो केवळ एक मुखवटा आहे. पण जर ती एखाद्या स्पर्शासारखी न दिसता जाणवणारी असेल, तर ती खरी आहे. आणि अशी चांगुलपणाची जाणीव आपल्या आजूबाजूला वाढली, तर जगणं खूपच सुंदर होईल.

कारण खरं चांगुलपण कधीच स्वतःला सिद्ध करत नाही... ते आपोआप ओळखलला जातो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !