मनात घर करणारा चंद्रकांत.....!
मनात घर करणारा चंद्रकांत.....!
काही माणसं ही भेटत नाहीत, ती आपल्याला "सापडतात". त्यांच्या भेटीमध्ये एक आश्वासक नातं असतं, जणू काही काळानंच त्यांच्या अस्तित्वाला आपल्या आयुष्यात पेरलेलं असतं. अशा माणसांचा विचार करताच, मनात एक गूढ शांतता दाटून येते आपोआप ओठांवर हसू उमटतं, आणि त्यांच्या आठवणीने अंतर्मन उजळून निघतं. चंद्रकांत महाजन हे असंच एक नाव… ज्यात माणुसकीचा गंध, प्रेमाचा ओलावा आणि आपुलकीची ऊब सामावलेली आहे.
त्यांना पाहिलं की नजरेला एक समजूत मिळते."आपण एकटे नाही." त्यांच्या डोळ्यांमध्ये माणूसपणाचं खोल समुद्र आहे. कोणत्याही प्रसंगी ते हळुवार शब्दांनी दिलासा देतात, जणू एखादा थकलेला प्रवासी थोडावेळ सावलीत विसावा घेतो, अगदी तसं. त्यांच्या स्वभावात नाटकीपणा नाही, गाजावाजा नाही, पण आहे एक शाश्वत स्थिरता जी जगाच्या कोलाहलात ही शांततेची अनुभूती देते.
त्यांचं बोलणं हे फक्त संवाद नसतं, ते एक जादू असते. त्यात दोष दाखवण्याचा उद्देश नसतो, तर समजून घेण्याची इच्छा असते. किती ही अस्वस्थता असो, त्यांच्या सहवासात ती हळूहळू विरघळते. ते मोठेपण दाखवत नाहीत, कारण ते त्यांच्या स्वभावातच आहे. त्यांची नजर जिथे जाते, तिथे आपुलकीचं झिरपणं सुरू होतं.
मैत्री या शब्दाला जर कोणत्या ही एका चेहऱ्याचं रूप द्यायचं असेल, तर ती चंद्रकांत महाजन यांच्या सारखी दिसेल. संकटात धावून येणारा, शब्दांशिवाय साथ देणारा, आणि प्रसंगी स्वतःचं अस्तित्व ही मागे ठेवून इतरांना उभं करणारा मित्र… हे केवळ पुस्तकांतून वाचायला मिळावं, अशी गोष्ट नाही. चंद्रकांत ही त्या सजीव मैत्रीची जिवंत व्याख्या आहे.
त्यांचं जीवन एखाद्या गोड गाण्यासारखं आहे.न सुटणारं, न विसरणारं, आणि प्रत्येकाच्या आठवणीत आपली जागा निर्माण करणारं. ते आपल्या कृतीतून प्रेम करतात, आपल्या शांततेतून आपलेपणा दाखवतात. त्यांच्या हृदयात एवढी माया आहे, की ती कोणाला ही आपोआप गुंतवून ठेवते.
आज जेव्हा माणूस माणसापासून दूर जातो आहे, नात्यांमध्ये व्यवहारांचं काटेकोर गणित सुरू आहे, तेव्हा चंद्रकांत महाजन सारखं एखादं व्यक्तिमत्त्व म्हणजे सजीव दिलासा आहे. ते भेटले की वाटतं."हो, अजून ही जगात खरं माणूसपण शिल्लक आहे." ते कुठेही असोत, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण एक वेगळीच ऊर्जा घेऊन उमगतं.
ते नुसते एक माणूस नाहीत.ते एक अनुभव आहेत. जसा चंद्र सर्वांवर सारखा प्रकाश टाकतो, तसा चंद्रकांत महाजन प्रत्येकाच्या आयुष्यात एक निखळ, निरपेक्ष उजेड बनून येतात. त्यांच्याबद्दल कितीही लिहिलं, तरी शब्द कमीच पडतील… कारण त्यांच्या मनाचं विशालतेला शब्दांची चौकट लहानच पडते.
त्यांच्या आयुष्यात जे कुणी सामील आहेत, ते नशिबवान आहेत. आणि समाजासाठी… तो एक "दिलाचा दिलदार राजा" आहे.जो गाजत नाही, पण सतत बहरत राहतो… मनामनांत.
© दीपक पवार(संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा