अचानक हरवलेला आधार....!

अचानक हरवलेला आधार....!


आई-वडील हे प्रत्येक मुलाच्या आयुष्याचं मूलभूत आणि अनमोल अस्तित्व असतं. जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते स्वप्नांच्या पहिल्या उड्डाणापर्यंत त्यांच्या सतत साथ असण्यानंच मुलांचं संपूर्ण विश्व घडतं. त्यांच्या उपस्थितीची इतकी सवय झालेली असते, की त्यांच्या अचानक जाण्याची कल्पना ही मनाला असह्य वाटते. पण आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा आई-वडील क्षणार्धात काळाच्या पडद्याआड निघून जातात, आणि त्या अपूर्ण, असहाय्य अवस्थेत मुलं केवळ दुःखात बुडून जात नाहीत, तर आतून, बाहेरून, पूर्णपणे गोंधळून जातात.

आई-वडील हे केवळ जन्मदाते नसतात. ते आपले पहिले शिक्षक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली "ओळख" असतात. त्यांच्या प्रेमळ सहवासात, शिस्तीच्या मार्गदर्शनात आणि अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या डोळ्यांत असणाऱ्या विश्वासाच्या झळकांत आपण आपलं आयुष्य समजून घेतो. त्यांचा एक साधा स्पर्श, एक दिलासा देणारा शब्द, किंवा एक आश्वासक नजर या साऱ्या गोष्टींनी आपल्याला पुढे जाण्याचं बळ मिळतं.

परंतु जेव्हा हे सगळं अचानक निघून जातं, तेव्हा आयुष्याचं गणितच कोलमडून जातं. प्रत्येक निर्णय, प्रत्येक भावना कोलांटी घालते. कोणाकडे रडावं? कोणाकडून सल्ला घ्यावा? ज्या चेहऱ्यांकडे आपण कायम मार्गदर्शनासाठी पाहायचो, तेच चेहेरे नजरेआड झाल्यावर मनात फक्त प्रश्नच राहतात. पण त्यांची उत्तरं कुणाकडेच नसतात.

मुलं गोंधळतात कारण त्यांच्या भावविश्वाचं केंद्रच हरवलेलं असतं. मनाला हक्कानं हातावरून हात फिरवणारी माया हवी असते, कुणीतरी आपल्याला घट्ट कवटाळून सांगावं, “मी आहे तुझ्यासोबत,” असं वाटतं. पण अशा साऱ्या भावना जणू शून्यात विसरलेल्या असतात. दिवस नुसते जात असतात, पण काळजाच्या खोल तळाशी सतत एक ओलसर शांतता जमा होत जाते.

ज्यांच्या सहवासात आपण रडलो, हसलो, शिकलो आणि जगलो त्यांचंच अचानक हरवणं म्हणजे अंतःकरणात निर्माण होणारं असह्य रिक्ततेचं वादळ. समोरचं जग चालू असतं, जबाबदाऱ्या चालू असतात, पण मन कुठंतरी मागे अडकलेलं असतं त्यांच्या आठवणीत, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या स्पर्शात.

आई-वडील नसणं म्हणजे केवळ रिकामं घर नव्हे, तर एक पोकळ झालेलं अंतर्मन. कितीही यश मिळालं, कितीही लोकांनी कौतुक केलं, तरी मनात एकच विचार अधूनमधून डोकावतो. “आई-बाबा असते तर...!”

मुलं गोंधळतात कारण ती स्वतःला सावरायचं प्रयत्न करत असतात, पण आधारासाठी कोणाचा हातच उरलेला नसतो. मोठं व्हायचं धैर्य कमावतात, पण "तू अजून लहान आहेस" असं आपुलकीनं सांगणारी नजरच हरवलेली असते.

त्या गोंधळाच्या काळोखात, त्या शांत शून्यात... मुलं हळूहळू स्वतःलाच शोधू लागतात. कधी आठवणींच्या आधारावर उभं राहतात, तर कधी त्यांच्या शिकवणीला जीवनाचं पाठभेद मानून वाटचाल करतात. परंतु तो गोंधळ मनाच्या एका कोपऱ्यात कायमचं घर करून बसतो.त्यांच्या नसलेल्या, पण आयुष्यभर मनात असलेल्या आई-वडिलांच्या आठवणींसोबत.

आई-वडीलांची जागा कोणही घेऊ शकत नाही. त्यांचं प्रेम, त्यांची माया, त्यांचं निःशब्द साथ देणं. या साऱ्या गोष्टी कायमच्या मनात कोरल्या जातात. ते गेल्यावर माणूस जिवंत राहतो, पण मनाचं अवकाश अधुरं वाटतं. आणि म्हणूनच, मुलं गोंधळतात.कारण जे गेलंय, ते केवळ दोन माणसं नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाचं संपूर्ण स्वप्न असतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !