सेवेच्या नात्यांची ३४ वर्षांची हृदयस्पर्शी वाटचाल....!
सेवेच्या नात्यांची ३४ वर्षांची हृदयस्पर्शी वाटचाल....!
धरणगाव येथील इंदिरा कन्या माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात नुकतीच एक अत्यंत संस्मरणीय घटना अनुभवण्यास मिळाली. एरंडोल-धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची ३४ वी सर्वसाधारण सभा.ही केवळ एक औपचारिक सभा नव्हती; ती अनेक वर्षांच्या सेवाभावाच्या, आपुलकीच्या व निष्ठेच्या नात्यांना उजाळा देणारी, हृदयाला स्पर्श करणारी एक अविस्मरणीय ठरली.
सभेचा प्रारंभ पतसंस्थेच्या माननीय अध्यक्षा सौ. रुपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. संस्थापक अध्यक्ष मा. अण्णासाहेब पी. ए. पाटील आणि एस. आर. पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. हे पूजन म्हणजे संस्थेच्या दशकानुदशकांच्या कार्याची, निष्ठेची व प्रेरणादायी मार्गदर्शनाची सजीव साक्षच होती.
सभेसाठी उपस्थित असलेले इंदिरा कन्या विद्यालयाचे सचिव मा. सी. के. आबा पाटील, पी. आर. हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक मेजर डी. एस. पाटील, माजी मानद सचिव महाले सर, उपाध्यक्ष सौ. आरती जैन, मानद सचिव श्री. सुनील पाटील, तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य आणि अन्य मान्यवर सभासद यांची उपस्थिती संस्थेच्या यशोगाथेचे प्रकट रूप होती.
सभेतील प्रत्येक क्षण हृदयाला भिडणारा ठरला.विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार, दोन्ही तालुक्यांतील नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकांचा गौरव, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान... या साऱ्या क्षणांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान व आनंद अश्रूंचे दाटून आले.सेवापूर्ती करून निवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करताना संपूर्ण सभागृह एका भावनिक लहरीने भारावून गेले. सेवेची ही जडणघडण विसरणे अशक्य आहे.
मानद सचिव श्री. सुनील पाटील यांनी मोजक्या, परंतु अत्यंत प्रभावी शब्दांत अहवाल वाचन केले. त्यांच्या निवेदनातून संस्थेच्या प्रगतीची प्रत्येक पायरी, प्रत्येक प्रयत्न आणि यशाची कहाणी जणू डोळ्यांसमोर उभी राहिली.अध्यक्ष सौ. रुपाली पाटील यांच्या प्रास्ताविकाने पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, ती एक कुटुंब असल्याची भावना अधोरेखित केली.
किरण चव्हाण यांनी अत्यंत सौंदर्यपूर्ण व शिस्तबद्ध सूत्रसंचालन करून कार्यक्रमात एक सलग, आत्मीय आणि उत्साही वातावरण निर्माण केले.कार्यक्रमाच्या शेवटी आरती जैन यांनी मनापासून सर्वांचे आभार मानून, सहभाग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाला योग्य तो मान दिला.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशामागे मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील यांचे कुशल मार्गदर्शन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम हे खरोखरच वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या नियोजनामुळेच संपूर्ण सभा अत्यंत सुबोध, शिस्तबद्ध आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध ठरली.
कार्यक्रमानंतर शाळेच्या वतीने करण्यात आलेली सुरुच भोजन व्यवस्था ही केवळ औपचारिक जेवण नव्हते ती होती प्रेमाची, आपुलकीची, सहकार्याची आणि नात्यांच्या उबदारतेची एक जिवंत अनुभूती.प्रत्येक ताटामागे जणू एक स्नेहबंध दरवळत होता.
३४ वर्षांची ही पतसंस्था म्हणजे केवळ आर्थिक आधार नव्हे, तर ती आहे.शिक्षकांच्या अंतःकरणातील परस्पर विश्वास, निष्ठा, सहकार्य, आणि सतत जोपासले जाणारे मूल्याधिष्ठित बंध यांचे सजीव प्रतीक.
हा स्नेह, ही एकजूट आणि ही मूल्यांची परंपरा अशीच वृद्धिंगत होवो, फुलत जावो…सेवेला, निष्ठेला आणि माणुसकीच्या या अमूल्य वीणेला मनःपूर्वक वंदन!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा