स्मृतींच्या पाऊलखुणा...श्रीमती यमनाबाई नथ्यू महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्मृतींच्या पाऊलखुणा...
श्रीमती यमनाबाई नथ्यू महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
धरणगाव तालुक्यातील जांभोरे या आपुलकीच्या नात्यांनी नटलेल्या गावात आज एक हळवा क्षण उतरला आहे. गावातील वयोवृद्ध, सर्वांना आपल्यासारख्या वाटणाऱ्या आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या श्रीमती यमनाबाई नथ्यू महाजन यांनी सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वृद्धापकाळाने शांतपणे आपल्या जीवनयात्रेचा शेवट केला.
१०५ वर्षांचे प्रदीर्घ, समृद्ध आणि अनुभवांनी भरलेले आयुष्य जगून त्यांनी अनंताच्या दिशेने प्रस्थान केले. त्यांच्या अंत्ययात्रेची सुरुवात मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या जांभोरे येथील राहत्या घरातून होणार आहे. त्यांच्या या अंतिम प्रवासात नुसते नातेवाईकच नव्हे, तर गावकऱ्यांच्या ही मनात दाटलेल्या भावनांची आणि आठवणींची शिदोरी सोबत असेल.
यमनाबाई महाजन या केवळ एक वृद्ध माता नव्हत्या, तर त्या एक जिवंत इतिहास, एक स्मृतीगंध आणि एक संस्कारांची शिदोरी होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, प्रेमळ आणि प्रत्येकाशी आपुलकीचा होता. त्यांनी नाती केवळ नावापुरती जपली नाहीत, तर त्यामध्ये आपला जीव ओतला. त्यांच्या घरी
येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची त्या अगत्याने विचारपूस करत असत. कोणी नवीन माणूस जरी भेटला, तरी त्याच्या नावावरून, घराण्यावरून त्या त्या व्यक्तीचा इतिहास त्याचे पूर्वज, त्यांची संतती, पिढीजात ओळखी अगदी सहजतेने सांगत. त्यांच्या स्मरणशक्तीचे हे सामर्थ्य वयाच्या शंभरीत पोहोचल्या नंतर ही तितकेच तीव्र आणि स्पष्ट होते.
आवाज ऐकताच त्या व्यक्तीला ओळखणं, आणि त्याच्या घरच्या चार पिढ्यां पर्यंतचा उल्लेख करणं, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विलक्षण देणगी होती. आजच्या काळात जिथे माणसं नात्यांपासून दुरावत चालली आहेत, तिथे यमनाबाईं सारखी माणसं आपल्याला हे शिकवून जातात की खरी संपत्ती म्हणजे माणसं, त्यांचं आपलेपण, आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी.
त्यांनी आपले पती नथ्यू महाजन यांच्या सोबत खंबीर साथ दिली. त्या त्यांच्या जीवनातील खरी सावली ठरल्या. संसाराच्या गडबडीतून आणि काळाच्या ओघातून त्यांनी आपल्या कुटुंबासाठी संस्कारांचा आणि प्रेमाचा एक मजबूत पाया घातला. त्यांच्या सुपुत्र प्रा. भगवान नथ्यू महाजन सर यांनी आपल्या आयुष्याला ज्ञान, विचार आणि सत्पंथ संप्रदायाच्या सेवेस समर्पित करत तीन-चार काव्यग्रंथ साकारले. हे सर्व त्या मातृशक्तीच्या प्रेरणेचं फलित आहे, ज्यामुळे आज समाजात एक विचारशील, सृजनशील पिढी घडली आहे.
आज यमनाबाई आपल्यात नसल्या तरी त्यांचा प्रेमळ आवाज, आस्थेने विचारपूस करणारी नजर, आठवणीत साठवलेली माणसं, आणि नात्यांशी जोडलेली प्रत्येक आठवण आपल्या मनात जिवंत राहणार आहे. त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात ममतेचा गंध सोडला. जो आज ही आपल्या आठवणींच्या श्वासांत दरवळतो.
त्यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती आणि शांती देवी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा