गवसलेलं समाधान, हरवलेलं यश.....!

गवसलेलं समाधान, हरवलेलं यश.....!

आजच्या या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि प्रगतीच्या जगात एक गोष्ट आपल्या मनात वारंवार रुंजी घालत असते."यशस्वी व्हायचं आहे." बालपणापासून आपल्याला शिकवलं जातं की यश मिळवणं हेच जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. उत्तम शिक्षण, प्रतिष्ठित नोकरी, भरघोस पगार आणि समाजात मान–सन्मान मिळवणं म्हणजेच यश, असं आपण गृहित धरतो.

परंतु थोडं थांबून, शांतपणे स्वतःला एक प्रश्न विचारु या या सगळ्याच्या बदल्यात आपण काय गमावत आहोत?

आपल्या यशाचा डोलारा बऱ्याचदा इतरांच्या कौतुकावर आधारलेला असतो. आपल्या कर्तृत्वामुळे इतरांना प्रभावित करणं, हेच जणू आपलं ध्येय ठरतं. पण या सगळ्यात आपण आपल्या आतल्या त्या शांत, निरागस मनाची कितपत काळजी घेतो?

“समाधान” ही अशी एक भावना आहे जी शब्दांशिवाय ही खूप काही सांगून जाते. ते डोळ्यांतून, चेहऱ्यावरून आणि मनाच्या गूढ लहरींतून प्रकट होतं. यश हे बाहेरून मिळवावं लागतं, पण समाधान हे अंतःकरणातून उमजतं. म्हणूनच, यश कितीही मोठं असलं तरी त्यात समाधान नसेल, तर त्याचं ओझं मनावर सतत जाणवत राहतं.

कधी कधी यशाच्या शर्यतीत आपण इतके गुंतून जातो की स्वतःशी संवाद साधणंच विसरतो. आपल्या खऱ्या आनंदाच्या क्षणांकडे, प्रिय माणसांकडे, आणि छोट्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो. आणि मग एके दिवशी, यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर स्वतःलाच विचारतो. “हे सगळं मिळवलं, पण आतून शांत का वाटत नाही?”

समाधान ही फार सूक्ष्म, पण अत्यंत खोल भावना आहे. ते मोठमोठ्या सन्मानांमधून मिळत नाही, तर ते मिळतं एखाद्या शांत झोपेत, आपल्या प्रियजनांच्या हास्यात, आई-वडिलांच्या डोळ्यांतील अभिमानात आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या मनःशांतीत.

यश म्हणजे इतर लोक आपल्याकडे कसे पाहतात; पण समाधान म्हणजे आपण स्वतःकडे कसे पाहतो. यशामुळे समाजात प्रतिष्ठा मिळते; पण समाधानामुळे मनाला आधार मिळतो. यशाच्या प्रवासात आपण अनेक लोकांना भेटतो; पण समाधानाच्या वाटेवर आपण पुन्हा पुन्हा स्वतःलाच शोधतो.

म्हणूनच “यशस्वी होण्यापेक्षा समाधानी असणं अधिक महत्त्वाचं आहे.” कारण यशाचं मोल इतरांसाठी असतं, पण समाधान ही आपल्यासाठी केवळ आपल्यासाठी असणारी अनमोल भेट असते.

आपण सर्वजण यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो, पण त्या वाटेवरून चालताना स्वतःचा हात धरून समाधानाच्या दिशेने एक छोटासा प्रवास करण्याचा प्रयत्न करुया. कारण जेव्हा आपण मनापासून हसू लागतो, तेव्हा कदाचित जग आपल्याला "यशस्वी" म्हणेल, पण आपलं अंतःकरण म्हणेल "मी समाधानी आहे..."

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !