विघ्नसंतोषी माणसं सावलीसारखी सोबत....!
विघ्नसंतोषी माणसं सावलीसारखी सोबत....!
जगात प्रत्येक गाव, प्रत्येक वाडा, प्रत्येक घर हे एक छोटंसं स्वतंत्र विश्व असतं. या विश्वात प्रेम असतं, आपुलकी असते, माणुसकीचा ओलावा असतो. मात्र याच गावकुसाच्या एका अंधुकशा कोपऱ्यात काही मनं अशी ही असतात. जी दुसऱ्याचं चांगलं बघू शकत नाहीत. हीच ती विघ्नसंतोषी माणसं.
ही मंडळी विशेष काही करत नाहीत, पण इतरांचं काही तरी चांगलं घडतं आहे, हे त्यांच्या मनाला खटकतं. कुणी नवं घर बांधलं, कुणाचं मूल शिकून मोठं झालं, कुणाचा संसार सुखाने चालतोय. की त्यांचं मन अस्वस्थ होतं. चेहऱ्यावर हसू नाही, उलट डोळ्यांत एक विचित्र प्रश्न असतो. "हे यांचं असं कसं?"
विघ्नसंतोषी माणसं कधीच समोरून थेट विरोध करत नाहीत. त्यांचं काम हळूहळू, सावध पावलांनी सुरू होतं. ते शब्दांच्या धारांनी घाव करतात, नजरेच्या टोचण्यांनी भावना दुखावतात. एखाद्याचं यश पाहिलं, की लगेच म्हणतील, "हो, पण..." या दोन शब्दांनी सुरुवात होऊन त्या यशावर शंका घेतली जाते. "त्या मुलाला नोकरी लागली खरी, पण काहीतरी शंका आहे." "हिला एवढं यश मिळालं? काही तरी अजिबात स्वाभाविक वाटत नाही." अशा प्रकारे त्यांच्या बोलण्यातून नेहमीच दुसऱ्याच्या आनंदात विष कालवण्याचा प्रयत्न दिसतो.
कधी कधी मनात विचार येतो. ही माणसं अशी का असतात? त्यांच्या मनात दुःख भरलेलं असतं का? अपयशाची ठसठस, एकटेपणा, वा समाजाकडून मिळालेलं दुर्लक्ष हे सगळं त्यांच्या मनाला कुरवाळत राहतं का? की ही मनाची एक विकृतीच झाली आहे. जी दुसऱ्याचं सुख बघवत नाही?
खरं पाहिलं, तर या माणसांची कीवच येते. दुसऱ्याच्या यशात विघ्न शोधणाऱ्यांना स्वतःच्या जीवनातील आनंद उमगत नाही. ते सतत स्वतःची इतरांशी तुलना करत राहतात. द्वेषाची आग मनात पेटलेली असते. आणि या नकारात्मकतेतच ते हळूहळू एकाकी होत जातात.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा व्यक्ती भेटतात. त्या आपल्या शेजारी राहणाऱ्या असतात, ओळखीच्या असतात, कधी कधी आपल्या घरातल्या ही असू शकतात. त्यांचं वागणं टोचतं, मनाला लागून राहतं. पण त्यांच्या बाबतीत राग न बाळगता, त्यांच्या मनाच्या दुखऱ्या बाजूची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. कारण अशा मनाला प्रेमाची, समजुतीची, आणि आधाराची सर्वाधिक गरज असते.
आपण मात्र आपलं चांगलं काम करत राहावं. प्रामाणिकपणे, श्रद्धेनं, नि:स्वार्थपणे. विघ्नसंतोषी माणसांना सावलीसारखं समजून घ्यावं. ती असतेच, पण ती आपला प्रकाश थांबवू शकत नाही.
शेवटी, गाव हे सर्व प्रकारच्या माणसांनी मिळूनच तयार झालेलं असतं. चांगुलपणाच्या प्रकाशाने आणि विघ्नसंतोषी सावल्यांनी ही. पण आपण कोण होणार, हे मात्र आपल्याच हाती आहे.दिवा की सावली?
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा