मनामधली जागा....!
मनामधली जागा....!
कोणाच्या मनामध्ये आपली जागा होणं, ही आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई असते. ही जागा ना कधी मागून मिळते, ना कधी आग्रहाने मिळते. ती हळूहळू, प्रत्येक क्षणामध्ये, छोट्याछोट्या गोष्टींतून तयार होत जाते. विश्वासाच्या पायावर उभं राहिलेलं हे नातं इतकं खोल असतं की ते सहजासहजी कोणी तोडू शकत नाही.
आजचं जग वेगानं बदलतंय. माणसं येतात, जातात, काही कायमचे राहतात, काही काळापुरते. पण काही माणसं अशी असतात, ज्यांची जागा एकदा का मनात झाली की, ती कोणत्या ही कारणाने भरून येत नाही. कारण ती जागा म्हणजे फक्त आठवणींचा संच नाही, तर तो एका विश्वासाचा गोफ असतो, जो अनुभवांच्या धाग्यांनी विणलेला असतो.
कधी कधी काही लोक, अगदी मन लावून प्रयत्न करतात. ते वाट बघतात, समजावण्याचा प्रयत्न करतात, मन जिंकायचा प्रयत्न करतात. पण तरी ही, त्यांना त्या जागे पर्यंत पोचता येत नाही. का? कारण मनामधली जागा ही मेहनतीने मिळते, पण ती केवळ प्रयत्नांनी नव्हे तर निस्सीम प्रेम आणि निर्व्याज विश्वासाने तयार होते.
कोणीतरी आयुष्यात येतं, मनात घर करतं, आणि मग त्या घरातल्या प्रत्येक भिंतीवर त्यांच्या आठवणींची चित्रं उमटलेली असतात. त्या आठवणींना पुसण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्या मनालाच ओरबाडण्यासारखं असतं. म्हणूनच, कितीही वेळ गेला, कितीही अंतर पडलं, तरी काही माणसं आपल्यात इतकी रुजून गेलेली असतात की त्यांना मनातून काढून टाकणं शक्यच नसतं.
खरं प्रेम, खरं नातं, ह्याला कसलेच अटी नसतात. फक्त एक गोष्ट असते. विश्वास. एकदा का त्या नात्यांमध्ये विश्वास निर्माण झाला की, वेळ, अंतर, परिस्थिती, गैरसमज काहीही असो, ती जागा कोणीही घेऊ शकत नाही. काही नात्यांना नाव नसतं, पण त्यांची खोली आणि त्यांचं अस्तित्व इतकं सशक्त असतं की ते सर्व प्रयत्नांना ही दुर्लक्षित करतं.
मन हे एक मंदिर असतं. आणि त्या मंदिरात जेव्हा कुणाचं स्थान एकदा निर्माण होतं, तेव्हा ते स्थान पवित्र होतं. त्याला हटवणं म्हणजे श्रद्धेला हात लावणं. म्हणूनच, कोणी कितीही प्रयत्न केला, तरी जो विश्वासाने, प्रेमाने, आणि सत्यतेने मनात उतरतो त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
कारण प्रेमाची जागा ही आठवणींनी भरलेली नसते, ती विश्वासाने टिकवलेली असते. आणि त्या जागेसाठी प्रयत्न नव्हे, तर मन समजून घेणं, त्याचं जपणं, आणि नात्यात निखळ प्रामाणिकपणा असणं आवश्यक असतं.
मनामधली जागा हे नात्याचं मंदिर असतं.जे एकदा उभं राहिलं, की कोणतीही वादळं त्याला ढासळवू शकत नाहीत.एवढ मात्र खर.....
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा