मिठाचा खडा… आणि मोडलेली नाती.....!
मिठाचा खडा… आणि मोडलेली नाती.....!
गाव म्हणजे माणुसकीचा गंध दरवळणारे एक गूढ पुस्तक असते. त्याच्या प्रत्येक पानावर एखादे हळवे हसू उमटलेले असते, तर कोपऱ्यात कुठे तरी एक दडपलेले अश्रू सांडलेले असतात. प्रत्येक वाक्यामागे एखादी हकिगत दडलेली असते, आणि एखाद्याच्या निःशब्दतेच्या आड एक असह्य आक्रोश दडलेला असतो.
असाच एक मुलगा असतो गावात साधा, सरळ, मेहनती आणि नम्र. त्याच्या चेहऱ्यावर निरागसतेचा गोडवा असतो, वागण्यात सौजन्य असते. त्याच्या स्वभावात कुठे ही बडेजावपणा नसतो. पण काळ जसजसा पुढे जातो, तसतसे त्याचे वय चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. आणि मग गावकऱ्यांच्या चर्चेत एक नेहमीचा प्रश्न ऐकू येतो.“काय रे, अजून तुझं लग्न झालं नाही का?”
गावातले काही लोक सहजपणे बोलून जातात.“काही तरी कारण असेलच… नाहीतर आता पर्यंत जमलं असतं त्याचं!” पण हे "काही तरी" कुठून येतं?ते येतं काही मोजक्या लोकांच्या कटु, विषारी आणि हेतुपूरस्सकर बोलण्यांतून.
प्रत्येक गावात असतोच ना एक मिठाचा खडा…
जो दुसऱ्याचं चांगलं पाहू शकत नाही.आणि त्याच्याच सोबतीला असते एखादी स्त्री जी नात्यांच्या नावावर, आणि समाजाच्या नकळत, विष कालवते.
कोणाचं तरी ठरलेलं लग्न मोडण्यासाठी हे दोघंच पुरेसे ठरतात.ते त्या मुलाबद्दल उलटसुलट बोलतात.
“तो मुलगा काहीसा विचित्र आहे… काही गडबड आहे त्याच्यात…” मुलीचा वडील हे ऐकतो.कधी तो समजूतदार असतो, बोलणाऱ्यांची नियत ओळखतो.
पण अनेक वेळा त्याचा विश्वास डळमळतो.आणि मग जे काही हळूहळू उभं राहत असतं, ते क्षणात कोसळून जातं.
तो मुलगा सुन्न होतो. त्याला समजत नाही,
“नेमकं मी काय चुकलो?”कारण त्यानं कोणाचं वाईट केलेलं नसतं.तो फक्त स्वतःचं आणि आपल्या आईवडिलांचं सुख साधायचा प्रयत्न करत असतो.
पण दुसऱ्याच्या तोंडावरच्या गरजेला,त्याच्या मनाच्या गाभाऱ्यातला शांत उजेड विझवायचा असतो.
गावात नाती फक्त लग्नानेच बनत नाहीत.ती बनतात बोलण्यातून, कानांवर पडलेल्या शब्दांतून,आणि त्या शब्दांमागच्या हेतूंनी.
अनेकदा तो मुलगा घरात शांत बसलेला असतो.
कुणी काही बोलत नाही, पण वातावरणात एक न बोललेलं ओझं भरलेलं असतं.आईच्या डोळ्यांत अपेक्षेचा एक थरथरता प्रकाश दिसतो,तर वडील रात्री उशाशी विचारांची जडगठ्ठ पिशवी घेऊन वळवळ करत पडलेले असतात.
काही मुलं या अशा परिस्थितीत मोडून जातात,
काही हरवून बसतात.पण काही जण या साऱ्या दुःखांना सामोरं जात,आपली माणुसकी जपतात.आपला चांगुलपणा, अफवांच्या काळोखात ही हातात धरून उभे राहतात.आणि तरी ही, समाज त्यांच्या स्वभावात "कमीपणा" शोधतो.
पण तो कमीपणा नसतो…तो असतो इतरांच्या डोळ्यांवर चढलेला मत्सराचा अंध पडदा.जेव्हा ज्या माणसाकडे डोळे उघडून बघायला हवेत,त्याच्याबद्दल डोळे झाकून गैरसमज पसरवले जातात.
ही कहाणी फक्त त्या एका मुलाची नाही.ही आहे त्या मानसिकतेची जी कोणाचं ही चांगलं उगवत असताना पाहू शकत नाही.ती सावली बनते, आणि एखाद्याच्या स्वप्नांवर चटकन पडते.
आज ही वेळ त्या एका मुलावर आहे.उद्या तीच वेळ तुमच्याच घरी येऊ शकते.तुमच्या मुलावर, तुमच्या प्रतिष्ठेवर, तुमच्या स्वप्नांवर.
म्हणून एकच नम्र विनंती कानावर पडलेलं प्रत्येकच सत्य नसतं.बोलणाऱ्याच्या हेतू पेक्षा, ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणाची खरी परीक्षा असते.
सत्य नेहमी डोळ्यांनी ओळखा, कानांनी नव्हे.कारण किती ही अफवा उठल्या,तरी आज ही हे जग माणुसकीवरच उभं आहे… अफवांवर नाही.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा