"गोमातेसाठी भक्तीचा यज्ञ — श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र उत्सव"


"गोमातेसाठी भक्तीचा यज्ञ — श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र उत्सव"



आज पिंप्री येथील कामधेनु गोशाळेमध्ये एक अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गो गायत्री यज्ञाने संपूर्ण परिसर दिव्यतेने भारलेला होता. धूप, दीप, मंत्रोच्चार आणि गोमातेसमोर अर्पण करण्यात आलेल्या श्रद्धेने वातावरण भारावून गेले होते.

गोमाता ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ती केवळ जनावर नाही, तर ती आपली जननी आहे, आपली पोशिंदी आहे. तिच्या प्रत्येक श्वासात आपलेच कल्याण सामावले आहे. आज गोशाळेतील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर तो एक सजीव प्रार्थना होता. गोमातेसाठी, तिच्या रक्षणासाठी आणि तिच्या माध्यमातून या पृथ्वीच्या कल्याणासाठी.

प्रार्थना करण्यात आली. देवाचे पाणी यावे, गाईंसाठी हिरवळ निर्माण व्हावी, आणि गोमातेचे जीवन आनंदमय व्हावे. त्या प्रार्थनेत केवळ शब्द नव्हते, तर होती ती एक असह्य व्यथा, एक आर्त पुकार, आणि त्या मागे होते एक निस्सीम प्रेम जिचे रुप म्हणजे ‘गोभक्ती’.

संचालक प्रमोदभाऊ चौधरी यांनी स्वत: होम करून संपूर्ण विधी संपन्न केला. त्यांच्या हातून जळणाऱ्या समिधा आणि त्यांच्या ओठांवरून निघणारे मंत्र हे त्या गोमातेच्या सेवेसाठी वाहिलेल्या जीवनाचे प्रतीक होते. त्यांनी यज्ञाच्या माध्यमातून दिलेले ते संदेश, त्या भावना, आणि गोमातेप्रती असलेली त्यांची निष्ठा प्रत्येक उपस्थितांच्या हृदयाला भिडणारी होती.

गोशाळेतील प्रत्येक गोमातेच्या डोळ्यात एक मौन संवाद होता. त्या मुक्या जीवांच्या नजरेतून जाणवणारी कृतज्ञता, प्रेम आणि आश्वासक नजरेने पाहणारी ती दृष्टी मनाला अंतर्बाह्य हलवणारी होती.

श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे धर्माचा विजय आणि अन्यायाविरुद्ध उभा राहणारी शक्ती. आजच्या या दिवशी गोमातेच्या रक्षणासाठी पुकारलेली ही प्रार्थना म्हणजेच गोपालाच्या चरणी अर्पण केलेली खरी भक्ती.

जय गो माता, जय गोपाल ही केवळ घोषवाक्ये नाहीत, तर ती आपली जबाबदारी आहेत. गोमातेला वाचवणे, तिचे रक्षण करणे आणि तिच्या सेवेत स्वतःला अर्पण करणे हेच खरे गोसेवेचे सार आहे. आणि पिंप्रीच्या या गोशाळेत आज तोच एक दिव्य अध्याय घडलेला होता प्रेम, सेवा आणि श्रद्धेचा.

गोमाता की जय! श्रीकृष्ण गोपाल की जय!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !