समाज म्हणजे आपली ओळख....!
समाज म्हणजे आपली ओळख....!
प्रत्येक समाजात काही अशी लोकं असतात, ज्यांना स्वतःच्या आयुष्यात काही ध्येय नसतं, काही कामधंदा नसतो. त्यांच्या आयुष्यात विचारांचं आणि विवेकाचं अंधारच अधिक असतो, पण तरीही त्यांना दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे, याचीच अधिक चिंता असते.
स्वतःच्या जीवनात प्रकाश नसताना, हे लोक कायम इतरांच्या आयुष्यात डोकावून त्यात दोष शोधण्याचा उद्योग करत असतात. कोणाच्या घरी कोण आलं, कोणाची बायको कशी वागते, कोणाची मुलगी कुठे जाते, कोणाचा मुलगा काय करतो. या गोष्टींमध्ये त्यांना अनावश्यक उत्सुकता असते.
हे लोक कधीही समोरासमोर बोलण्याची हिंमत करत नाहीत. कारण त्यांच्या बोलण्याला समाजात किंमत नसते, आणि गावात ही त्यांना आदरानं पाहिलं जात नाही. म्हणूनच अशा व्यक्ती दुसऱ्या समाजाच्या लोकांमध्ये बसून आपल्या समाजाचीच टवाळी करत बसतात.
ते आपल्या समाजातील माणसांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलतात, त्यांची बदनामी करतात, आणि साऱ्या समाजाची प्रतिष्ठा धुळीत मिळवतात. यांचं वागणं केवळ अपमानास्पद नसून, समाजघातक ही आहे.
समाज म्हणजे एक कुटुंब असतं. प्रत्येक घरात चुका होतात, काही वाद होतात, पण त्यांना बाहेर नेऊन प्रदर्शन करणं म्हणजे आपल्या घराचीच अब्रू उघडं पाडणं होय. समाजाची प्रतिष्ठा जपणं ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे.
जेव्हा अशा टवाळखोर, नालायक वृत्तीच्या लोकांना वेळीच ओळखून थांबवलं जातं, तेव्हाच समाज उभा राहतो. समाजाची मान ही केवळ काही मंडळी, की पुढारी जपत नाहीत; ती प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या वागणुकीतून घडत असते.
ग्रामीण भागात समाजाच्या इज्जतीला फार मोठं महत्त्व असतं. समाज प्रतिष्ठित असेल, तर त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळतो. त्यामुळे आपला समाज एकसंघ ठेवणं, त्यातल्या दोषांना घरातच मार्गी लावणं, आणि बाहेर समाजाचा आदर राखणं, हे अत्यावश्यक आहे.
आजच्या काळात आपण एकमेकांच्या चुकांवर हसण्यापेक्षा, एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं जास्त महत्त्वाचं आहे. समाज म्हणून उभं राहायचं असेल, तर अशा अपप्रवृत्तीला रोखणं गरजेचं आहे.
समाज मोठा झाला की आपण सर्व मोठे होतो.
समाजाची मान राखली, की आपल्याही मोलात भर पडते. म्हणूनच आता वेळ आहे ठाम निर्णय घेण्याची.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा