कवी प्रा. वा. ना.आंधळे यांचा कवितेच्या शब्दांतून जीवन-मृत्यूचा भावार्थ.....!
कवी प्रा. वा. ना.आंधळे यांचा कवितेच्या शब्दांतून जीवन-मृत्यूचा भावार्थ.....!
कविता ही मानवी मनाची सर्वांत सच्ची, हळवी आणि समृद्ध अभिव्यक्ती आहे. केवळ शब्दांची रचना नव्हे, तर ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला दिशा, आधार आणि भावनांची नितांत साथ देते. अशीच कविता जेव्हा मृत्यूला ही सौंदर्याची किनार देते, तेव्हा ती केवळ कलाकृती न राहता, भावनांचा शाश्वत झरा बनते.
प्रकाश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाघोदा ता. रावेर या संस्थेच्या हिरक महोत्सवा निमित्त आयोजित व्याख्यान मालेतील दुसरे पुष्प प्रा. वा. ना. आंधळे यांच्या प्रभावी आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत गुंफले गेले. दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात "जगण्या इतकेच मरणाला ही सुंदर करते कविता" या विषयावर त्यांनी केलेले भाषण विद्यार्थ्यांच्या मनाला भावस्पर्श करून गेले.
प्रा. आंधळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, मानवी जीवन आणि मन कवितेमुळे अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या संत साहित्याचा तसेच खान्देशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ग्राम्य, परंतु गहिर्या कवितांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना त्यांनी साहित्याच्या गाभ्यात नेले.
आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की कविता ही माणसाच्या जन्मापासून मृत्यू पर्यंतची सोबती आहे. “जगणं कवितेने सुंदर केलं आहेच, पण मरणाला ही कविताच एका वेगळ्या भावनेने कवेत घेते,” असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील परंपरेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की बायका प्रेताभोवती गाण्यातून रडतात
हे केवळ शोक नाही, तर त्या व्यक्तीच्या जीवनाचे कविस्मरण असते. ही कल्पना विद्यार्थ्यांना नव्याने अंतर्मुख करणारी ठरली.
प्रा. आंधळे यांनी स्वतःच्या “पप्पा, माझ्या आईला बोलू नका” या कवितेचे सादरीकरण करताच सभागृहात एक स्तब्ध शांतता पसरली. त्या कवितेतील भावनिक ओलावा, शब्दांतून उमटणारी आर्तता आणि त्या मागील गूढ भावना इतक्या प्रभावी होत्या की अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ही कविता फक्त सादरीकरण नव्हे, तर एक भावनिक अनुभव ठरला.
या व्याख्यान समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. पी. टी. महाजन सर होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन दादासाहेब डी. के. महाजन, उपाध्यक्ष श्री. श्रावण सीताराम महाजन, सचिव श्री. किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव श्री. पी. एल. महाजन, मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक आर. पी. महाजन, तसेच श्री. राजेश बडगुजर सर आणि श्री. लक्ष्मीकांत घुगे सर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेश बडगुजर सर यांनी केले. वक्त्यांचा परिचय श्री. जे. आर. पाटील सर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुसूत्र संचालन श्री. यू. जी. महाजन सर यांनी नेटकेपणाने केले, तर आभार प्रदर्शन सौ. भावना पाटील मॅडम यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केले.
या व्याख्यानाने विद्यार्थ्यांच्या मनात कविते विषयी, जीवना विषयी आणि मृत्यू विषयी एक वेगळीच संवेदनशीलता निर्माण केली. कविता केवळ वाचण्यापुरती मर्यादित नसून ती एक अनुभव होऊ शकते, हे प्रा. वा. ना. आंधळे यांच्या प्रभावी सादरीकरणातून प्रकर्षाने जाणवले.
शब्दांच्या माध्यमातून जीवनाचे विविध पैलू उलगडण्याची, वेदनांना वाट मोकळी करून देण्याची आणि माणूसपणाच्या गाभ्याशी पोहोचण्याची एक अमूल्य संधी या व्याख्यानातून मिळाली.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा