मोकळा खिसा ओळखींचा आरसा....!
मोकळा खिसा ओळखींचा आरसा....!
एकदा कधीतरी... हो, एकदाच नव्हे, तर आयुष्यात अनेकदा मोकळा खिसा घेऊन चारचौघात जाऊन पाहा. कोणती ही तक्रार नसताना, कोणती ही गोष्ट गमावलेली नसता नाही, आपल्यात काही तरी हरवलं असल्यासारखं वाटू लागतं. आणि अशा वेळी, एक वेगळीच जाणीव जागी होते. आपण खरंच कोण आहोत?
या मोकळ्या खिशात पैसा नसतो, प्रतिष्ठेचा बडेजाव नसतो, ना मोठेपणाचा अहंकार. उरतो तो फक्त एक साधा, प्रामाणिक "मी".
आणि जेव्हा हा "मी" कोणत्या ही झगमगाटा शिवाय, कोणत्या ही नावपत्त्या शिवाय लोकांसमोर उभा राहतो… तेव्हाच सुरू होते खरी ओळख उलगडण्याची वेळ.
आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं असतात. कोणी मैत्रीच्या नावाने, कोणी व्यवहाराच्या संबंधातून, तर कोणी रक्ताच्या नात्याने आपल्याशी जोडलेले असतात. पण या पलीकडचा एक क्षण असा असतो, जेव्हा तुमच्याकडे देण्यासाठी काहीच नसतं… आणि तेव्हाच कळतं की कोण तुमच्या सोबत खरंच उभं आहे.
जेव्हा खिशात पैसा असतो, तेव्हा अनेक चेहरे स्मितहास्याने तुमच्यासमोर येतात. सतत फोन खणखणत राहतो, चहा-कॉफीच्या गप्पा रंगतात, तुमचं नाव विशेष मानाने घेतलं जातं. पण एकदा खिशात काही नसताना त्या सगळ्यांच्या मध्ये उभं राहा… तेव्हा फोन शांत होतो, नजर टळतात, आणि तुमचं अस्तित्व हळूहळू झाकोळलं जातं.
मात्र अशा वेळेला, काही मोजकी माणसं तुमच्याशी गप्प बसून ही तुमच्या सोबत राहतात. ते ना काही विचारतात, ना तुमच्याकडून काही अपेक्षा करतात. त्यांची फक्त सोबतच पुरेशी वाटते. हीच माणसं खरी आपली असतात.
आपण अनेकदा माणसांची किंमत त्यांच्या कपड्यांवर, गाड्यांवर, हुद्द्यांवरून लावतो. पण ज्याचं मन मोठं असतं, त्याचं खिसं किती भरलेलं आहे हे पाहण्याची गरजच भासत नाही. आणि जो फक्त तुमच्या खिश्याकडे पाहून वागतो, त्याच्या नात्याला खरी उब नसते.
मोकळा खिसा हा कधी कधी आयुष्याचा सर्वात मोठा गुरू ठरतो. कारण तो जे शिकवतो, ते भरलेला खिसा कधीच शिकवू शकत नाही.
खरं पाहता, श्रीमंती म्हणजे फक्त संपत्ती नसते, तर ती असते अशा माणसांची सोबत, जी कोणत्या ही परिस्थितीत तुमच्या सोबत असते. पैसाअडका, वेळ, नशिब या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर असतात. पण आपलेपणाच्या त्या नाजूक, पण मजबूत गुंफलेल्या नात्याचं मोल अनमोल असतं.
तुमच्याकडे काहीच नसताना जो माणूस तुमच्याशी खांद्याला खांदा लावून उभा राहतो, त्याला कधीही विसरू नका. कारण तो माणूस तुमच्या संपत्तीमुळे नाही, तर तुमच्या अस्तित्वामुळे तुमचा आहे.
म्हणून एकदा तरी, मोकळा खिसा घेऊन लोकांत चालत निघा. ज्या नजरा तुमच्याकडे बघून वळतात, त्यांना विसरा. पण ज्या पावलांनी तुमच्यासाठी थांबावं, त्या पावलांच्या आवाजात आयुष्याचं खरं संगीत आहे.
कारण जर नाती खिशातल्या रकमेवर टिकत असतील, तर त्याला नातं म्हणावं की सौदा, हा विचार जरूर करा.
कधी कधी मोकळ्या खिशाने भरलेलं मन सापडतं. पण भरलेल्या खिशांनी झाकलेली कितीतरी ओळखीची माणसं, आतून किती रिकामी आहेत, हे लक्षातच येत नाही.
म्हणूनच… मोकळ्या खिशाची ही वेळ, हे क्षण – हेच ओळखीचं खरे आरसे ठरतात.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा