भविष्याचा शिक्षक: तुटलेला विश्वास....!
भविष्याचा शिक्षक: तुटलेला विश्वास....!
कोणी आपल्या विश्वासाला तडा दिला, तर रागावण्याऐवजी त्यांचे ही आभार मानावेत. कारण ते आपल्याला शिकवून जातात.की विश्वास ठेवणं किती मौल्यवान आहे, आणि तो कुणावर, किती, आणि कधी ठेवायचा, हे फार विचारपूर्वक ठरवायला हवं.
आपण माणूस म्हणून समाजात जगतो, नातेसंबंधात गुंततो, आपलं मन उघडं करतो. कुणावर विश्वास ठेवतो हे एक नैसर्गिक व अपरिहार्य वर्तन आहे. पण जेव्हा हा विश्वास कुणी मोडतो, तेव्हा हृदयात खोल जखम होते. दुःख होतं, मन खचतं, आणि अनेकदा स्वतःवरच शंका यायला लागते.
परंतु त्या वेदनेमध्येही एक अमूल्य शिकवण असते.
कारण प्रत्येक तुटलेला विश्वास हे एक मोठं शिकवण देणारं अनुभवपुस्तक असतं. ते आपल्याला जगाचं वास्तव दाखवतं. हे शिकवतं की माणसं नेहमी आपली अपेक्षा पूर्ण करणार नाहीत. काही जण केवळ आपल्या फायद्यासाठी जवळ येतात. काही जण नकळत का होईना, पण आपलं मन दुखवतात.
परंतु याचा अर्थ असा नाही की आपण विश्वास ठेवणं सोडून द्यावं. विश्वास ठेवावा, पण डोळसपणे. मनापासून, पण मर्यादित आशा ठेवून.
जी माणसं आपला विश्वास मोडतात, ती खरं तर आपले जीवनगुरूच असतात. त्यांच्या वागणुकीमुळेच आपण अधिक समजूतदार होतो. नात्यांच्या गुंत्यात नेमकं काय स्वीकारायचं आणि काय टाळायचं, हे शिकतो. आपण अधिक समजूतदार, सजग आणि मजबूत होतो.
म्हणूनच...
कोणी तुमचा विश्वास तोडला असेल, तर रडून घ्या, वेदना स्वीकारा, पण त्यांचे आभार मानायला विसरू नका. कारण त्यांनी तुम्हाला शिकवलं.की मन द्यायचं, पण डोळे उघडे ठेवून.
आयुष्य हे अशा छोट्या छोट्या शिकवणींचं मोठं शाळा आहे. आणि प्रत्येक विश्वासभंग हा त्यातला एक पाठ आहे.कठीण, पण खूप उपयुक्त."विश्वास ठेवायला शिका, पण अंधविश्वास ठेवू नका. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक चांगला, अधिक शहाणा आणि अधिक खरा बनवतो."
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा