नशीबापेक्षा मोठी असते जिद्द...!
नशीबापेक्षा मोठी असते जिद्द...!
लहानशी एक मुंगी... स्वतःच्या पोटासाठी धान्याच्या शोधात निघते. ती भिंतीवर चढू लागते. एक पाऊल वर जाते, मग दुसरं, पण अचानक घसरते. पुन्हा खाली येते. परत चढते. पुन्हा घसरते. हे असं ती किती वेळा करते? शंभर वेळा? हजार वेळा? पण ती थांबत नाही. कारण तिच्या मनात विश्वास आहे.जिद्दीचा, प्रयत्नाचा, आणि यशाचा.
तिच्या अंगात माणसासारखं बल नाही. तिच्याकडे कोणी साथ देणारं नसतं. ती एकटीच असते. पण तिचं ध्येय स्पष्ट असतं.अन्न मिळवायचं, जगायचं. त्या उद्दिष्टासाठी ती दरवेळी प्रयत्न करते. कितीही वेळा ती अपयशी झाली, तरी ती कधीही हार मानत नाही.
आपल्याही आयुष्यात असे क्षण वारंवार येतात, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलंय. परीक्षेत नापास झाल्यावर, एखादं स्वप्न अपूर्ण राहिल्यावर, नात्यात तुटवडा आल्यावर किंवा अपयशानं आत्मविश्वास डळमळीत झाल्यावर मन सुन्न होतं. पण अशा वेळेसच आपली खरी कसोटी लागते.आपण मुंगीसारखे पुन्हा प्रयत्न करतो का, की हार मानून थांबतो?
खरं सांगायचं तर, हे जीवन म्हणजेच चढणं आणि घसरणं. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा आहे. जर आपण चिकाटी ठेवली, तर यश नक्की मिळतं. कारण मेहनत कधीही वाया जात नाही. तुमचा प्रत्येक घामाचा थेंब, प्रत्येक रात्र जागून केलेला अभ्यास, प्रत्येक वेदना सगळं सगळं एक दिवस तुमच्या पायांखाली विजयाचं पायघडं घालणारं असतं.
मनातील विश्वास आणि रक्तातलं धैर्य एकत्र आलं, तर कोणतीही भिंत उंच नाही आणि कोणतं ही स्वप्न अशक्य नाही.
आज तुमच्यासमोर कितीही अडचणी असोत, कितीही संकटं असोत एक लक्षात ठेवा, ती मुंगीही यशस्वी होते. कारण तिने हार मानली नाही. तिचं ध्येय लहान होतं, पण तिची जिद्द मोठी होती.
तुमचं ध्येय मोठं असेल, तर तुमचं प्रयत्नही त्याहून मोठं असायला हवं. शेवटी, तुमची मेहनतच तुमचं नशीब घडवते. कारण प्रयत्न करणाऱ्यांची हार कधीच होत नाही.
जिथे यश दूर वाटतं, तिथे एक पाऊल अजून पुढे टाका कारण कदाचित पुढचंच पाऊल तुमचं यश ठरू शकतं.
“प्रयत्न करा, घसरा, पुन्हा उभे राहा कारण शेवटी विजय तुमचाच असेल.”
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा