बाजारात नाही पत, आणि माझं नाव गणपत.....!
बाजारात नाही पत, आणि माझं नाव गणपत.....!
हे वाक्य प्रथम ऐकताना हसू येतं, पण त्या मागचं वास्तव आणि वेदना खोलवर जाऊन स्पर्शून जातात. आज आपल्या समाजात असे किती तरी ‘गणपत’ आहेत ज्यांची ना कुणी दखल घेतो, ना कुणी विचारतो, ना घरात स्थान, ना गावात मान.
असल्या व्यक्ती स्वतःला मोठं समजतात, आणि इतरांसमोरही तसंच भासवतात जणू काही त्यांच्या शिवाय जगाचं चाक फिरतच नाही.त्यांचा वावर पाहिला तर ते पहिल्यांदा प्रभावी वाटतात.छाती पुढे करून बोलणं, अंगभर राजकीय रंग चढवलेला, आणि नेहमी कोणाच्या तरी मोठ्या नावाचा आधार घेत स्वतःची ‘महत्त्वाची’ ओळख मिरवणं.
“माझी पोहोच आहे”, “माझे अधिकारी ओळखीचे आहेत”, “मी सांगितलं तर लगेच होतं”. हे संवाद त्यांच्यासाठी रोजचेच.या सर्व माध्यमांतून ते स्वतःभोवती एक खोट्या प्रतिष्ठेचं आभासी जग उभं करतात.
पण जेव्हा त्यांच्या मनाच्या गाभ्यात डोकावून पाहिलं, तेव्हा लक्षात येतं की, त्यांची ‘ओळख’ ही फक्त बाहेरून गोंडस आहे.आतून मात्र पूर्णपणे रिकामी.जे बोललं जातं, ते केवळ दाखवण्यासाठी; आणि जे दाखवलं जातं, ते स्वतःचं खरेपण लपवण्यासाठी.
खरं सांगायचं तर, अशा लोकांना कोणत्याही पक्षात स्थान नसतं. कोणत्याही नेत्याच्या विचारात त्यांचं नाव येत नाही.ते ना कुठे खऱ्या अर्थाने स्वीकारले जातात, ना कुणाच्या मनात आपली जागा निर्माण करू शकतात.
तरी ही, "मी मोठा आहे" हे नाटक सतत रंगतं.हे नाटक काही काळ रंगतंही, पण एकदा उलगडलं की लोक त्यांचं खोटेपण सहज ओळखतात.
खोटं बोलून, खोटं वागून, आणि खोटं दाखवून माणूस क्षणभर प्रसिद्ध होऊ शकतो.पण लोकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी खरी माणुसकी आणि प्रामाणिकपणा लागतो.
माणसाची खरी किंमत त्याच्या नावात, पदात किंवा ओळखीत नसते;ती असते त्याच्या मनातल्या खरेपणात,
स्वभावातल्या साधेपणात,आणि वागण्यातल्या माणुसकीत.
आपल्या गावात, समाजात अशीही काही माणसं असतात जी खूप काही बोलत नाहीत, ना कोणाच्या नावाचा आधार घेतात, ना कोणत्याही प्रतिष्ठेची ढाल घेऊन फिरतात.पण गरज पडली की तेच माणसं न बोलता धावून येतात.
त्यांना ना फोटो काढायची हौस असते, ना भाषणांची गरज.पण तरी ही, त्यांच्या माणुसकीची छाप प्रत्येकाच्या मनावर खोलवर कोरलेली असते.हीच खरी पोहोच असते. आणि हीच खरी किंमत.
आभासी जगणाऱ्या लोकांकडे काही काळ लोक आकर्षित होतात.त्यांचं वागणं, बोलणं आणि मिरवणं काही वेळ मनोरंजक वाटतं.पण नंतर लोक त्यांच्यापासून दूर होतात. कारण कोणालाही खोटेपणाची संगत नको असते.शेवटी लोकांना हवं असतं एक खरं, शांत, विश्वासार्ह माणूस जो फार न बोलता, पण जे बोलेल ते खरे बोलेल.
आभासी जगण्यात ना समाधान असतं, ना प्रतिष्ठा.
फक्त थोडा झगमगाट असतो. तो ही फक्त दिखाव्यापुरता.नंतर त्याचं रूपांतर होतं एकटेपणात, आणि त्या खोट्या प्रतिष्ठेच्या सावलीत तो माणूस केविलवाणा होतो.ना कोणी जवळ करतं, ना कोणी त्याला आठवतं.
म्हणून, माणसाचं मोठेपण हे त्याच्या खोट्या पोहोचेमुळे ठरत नाही,तर तो किती खरा आहे, त्याच्या बोलण्यात किती प्रेम आहे, कृतीत किती माणुसकी आहे,आणि त्याच्या अस्तित्वामुळे दुसऱ्यांना किती आधार वाटतो, यावर ठरतं.
"बाजारात नाही पत..." हे वाक्य ऐकताना सुरुवातीला हास्य येतं,पण जेव्हा मन लावून विचार करतो, तेव्हा जाणवतं.आज अनेकांची हीच दुर्दैवी ओळख बनली आहे...
स्वतःला मोठं समजणारे, पण जग त्यांना ओळखतही नाही.म्हणूनच,किंमत मिळवायची असेल, तर मोठं नाव, मोठं पद, मोठा आवाज नको;फक्त एक मोठं मन लागतो.
कारण,मनाच्या बाजारात जो खरं राहतो,तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो.बाकी सगळं केवळ आभास... आणि अपयशाचं मुखवटं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा