वाळू डम्पर अजून किती लोकांचा बळी घेणार.....?


वाळू डम्पर अजून किती लोकांचा बळी घेणार.....?

एक शांत खेडेगाव. सकाळचे आठ वाजत आलेले. एका चिमुकल्या मुलाने शाळेची पिशवी पाठीवर घेतली आहे. तोंडात पोळीचा शेवटचा घास आहे आणि आईच्या "जपून जा रे" या काळजीने ओथंबलेल्या शब्दांना तो डोळ्यांनीच उत्तर देतो. गावातील रस्ता ओळखीचा, माणसंही परिचयाचीच. पण या रस्त्यावरून अचानक धावून येतो एक भरधाव वाळू डम्पर — धूळ उडवत, भीषण आवाज करत, कोणत्याही वाहतूक नियमांना न जुमानता, जणू काही माणसांना चिरडणेच त्याचं उद्दिष्ट आहे.

क्षणात सगळं थांबून जातं.

एक मोठा आवाज, एक धक्का, आणि एका घराचे जगणेच संपते.आईच्या तोंडून निघालेला "जपून जा" हा वाक्यांश तिच्या आठवणींमध्ये अखेरचा ठरतो.आणि त्या मुलाचे पाय जे परत यायचेच होते. ते आता केवळ आठवणीतच उरतात.

हे चित्र आता नित्याचं झालं आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात, शहरात, रस्त्यावर, अशाच दुर्घटना घडतात. फरक असतो तो फक्त मृताच्या नावात. मृत्यू मात्र सारखाच असतो. वेदनादायी, निर्दयी आणि आयुष्यभराचं दुःख देणारा.

वाळू डम्परचं प्रकरण केवळ वाहतुकीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही.हा प्रश्न आहे. माणुसकीचा.हा प्रश्न आहे. समाजाच्या सजगतेचा, आणि त्या प्रत्येक बळीचा ज्यांचं जीवन विकासाच्या झूठ्या नावावर बळी दिलं जात आहे.

वाळू ही निसर्गदत्त संपत्ती आहे, तिचा योग्य वापर व्हायलाच हवा, पण त्या बदल्यात माणसांचे प्राण गेल्याशिवाय विकास होत नसला, तर त्या विकासाला कोणतंही नैतिक मूल्य उरत नाही.

आज गावातल्या रस्त्यांवरून धावणारे हे डम्पर कोणत्याही अडथळ्याला घाबरत नाहीत.त्यांना ना नियमांचं भय, ना कायद्याचं भान.त्यांच्या वेगाला, भाराला, आणि बेकायदेशीरतेला कोणतंच बंधन उरलेलं नाही.पाठीशी आहे राजकीय आश्रय, पैशाचं बळ आणि व्यवस्थेचं मौन.

जे गेले, त्यांच्यासाठी मेणबत्त्या लावल्या जातात, शोकसभा घेतल्या जातात, काही आंदोलने होतात.
मात्र काही दिवसांतच ते दुःख विसरलं जातं आणि पुन्हा सुरू होतो मृत्यूचा तोच खेळ.तेच रस्ते, तेच डम्पर, तोच वेग… आणि पुन्हा एक बळी.

कधी कधी असं वाटतं की आपण सारे मिळून एखाद्या अंधारल्या दरीच्या काठावर उभे आहोत,जिथून एकामागून एक माणसं खाली कोसळत आहेत,
आणि आपण फक्त हताशपणे पाहत आहोत.फार तर थोडं हळहळतो, एखादा मेसेज फॉरवर्ड करतो, आणि लगेच पुढच्या मनोरंजनाच्या व्हिडीओमध्ये हरवून जातो.

कधी तो बळी शाळकरी मुलगा असतो, कधी एखादा वृद्ध, कधी कुटुंबाचा एकमेव आधारवड, तर कधी आईच्या पाठीवरचं बाळ.मात्र त्या डम्परला काही फरक पडत नाही.त्याच्या चाकाखाली फक्त शरीरच नाही, तर एखाद्या कुटुंबाचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होतं.

कधी कुणाला तरी हिम्मत येईल का हे थांबवण्याची?
कधी कुणी प्रखर आवाजात म्हणेल का, "आता पुरे झाले बळी!"कधी हे डम्पर थांबतील? कधी हे रस्ते माणसांसाठी पुन्हा सुरक्षित होतील? या प्रश्नांचं उत्तर अजूनही अंधारात आहे.

परंतु, तो प्रश्न मात्र रोज आपल्या मागे लागत राहतो.
रस्त्यावरून चालताना, बातम्यांमध्ये एखादी दुर्घटना ऐकताना,किंवा एखादं निरागस हसू पाहताना…"वाळू डम्पर अजून किती बळी घेणार?"

तोपर्यंत, प्रत्येक घरात, प्रत्येक आईच्या काळजामध्ये,
आणि प्रत्येक पावलाच्या सावलीत हा एकच धसका शिल्लक राहतो."आपलंच काही हरवणार तर नाही ना...?"

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !