टोकरतलावची उजळलेली पहाट....!
टोकरतलावची उजळलेली पहाट....!
एक जिल्हाधिकारी... पद, सत्ता, जबाबदारी, आणि समाजाच्या सतत नजरा... या सगळ्या प्रतिष्ठेच्या आणि दडपणाच्या वर्तुळात वावरताना, एक आई आपल्या मुलांसाठी निर्णय घेते. तो ही असा निर्णय, जो केवळ तिच्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो.
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि त्यांचे पती डॉ. वैभव सबनिस यांनी आपल्या जुळ्या मुलांचा शुकर आणि सबर यांचा प्रवेश नंदुरबार शहरातील टोकरतलाव येथील एका सर्वसामान्य अंगणवाडीत करून समाजव्यवस्थेला एक नवा दृष्टिकोन दिला आहे.
हा निर्णय फक्त एक बातमी नाही, ही एका मूल्याधिष्ठित विचारसरणीची सुरुवात आहे. एक शांत पण ठाम चळवळ.
या चिमुकल्यांना हातात धरून जेव्हा डॉ. मिताली सेठी टोकरतलावच्या अंगणवाडीकडे वळल्या, तेव्हा त्या केवळ एक आई नव्हत्या त्या व्यवस्थेवर विश्वास असणाऱ्या एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी होत्या.
आज ज्या समाजात “सरकारी” या शब्दाकडे शंका, निराशा आणि हलकेपणाने पाहिलं जातं, त्या समाजात त्यांनी सरकारी यंत्रणेमध्ये आपल्या मुलांचं भविष्य शोधण्याचा धाडसी निर्णय घेतला.
आज अनेक पालकांचा शालेय निवडीचा निकष ठरतो. इंग्रजी माध्यम, वातानुकूलित वर्गखोल्या, झगमगीत युनिफॉर्म, महागडी फी, आणि गाड्यांमधून होणारा प्रवास. पण शिक्षणाचा गाभा यामध्ये आहे का?
खरं शिक्षण घडतं ते माणूस घडवणाऱ्या मूल्यांमधून जिथे मायेचा स्पर्श असतो, सच्च्या संवादाचं वातावरण असतं, आणि जिथं शिक्षक शिक्षण देतात, व्यवसाय नव्हे.
टोकरतलावची ही अंगणवाडी अशाच गुणवत्तेने भरलेली होती. स्वच्छ परिसर, समर्पित सेविका, आणि डॉ. सेठी यांचा पूर्ण विश्वास.
या निर्णयामध्ये कुठेही पदाचा गर्व नाही, उलट एक सहज नम्रता आहे. “मी जिल्हाधिकारी आहे, म्हणून माझ्या मुलांना वेगळं वागणूक मिळावी, असं नाही; ही व्यवस्था साऱ्यांसाठी आहे, मग आमच्यासाठी का नाही?”
हा विचार जितका साधा, तितकाच समाजमनाला स्पर्शून जाणारा आहे.
आपल्याकडे शासकीय रचना ही ‘गरिबांसाठीची व्यवस्था’ म्हणून हिणवली जाते. सरकारी शाळा, आरोग्य केंद्रं, अंगणवाड्या या गोष्टी वापरणं म्हणजे जणू काही कमीपणा असल्यासारखं वाटतं.पण जेव्हा एका जिल्हाधिकाऱ्यासारखा उच्चपदस्थ अधिकारी स्वतः पुढाकार घेऊन त्या व्यवस्थेचा भाग बनतो, तेव्हा तो केवळ उपयोग करत नाही, तर त्यावर विश्वास व्यक्त करतो. आणि हाच विश्वास समाजात परिवर्तन घडवण्याची खरी शक्ती ठरतो.
डॉ. मिताली सेठी यांच्या या निर्णयाने फक्त टोकरतलावची अंगणवाडी उजळली नाही, तर असंख्य पालकांच्या मनात नवा विचार रुजला आहे.
“जर त्या त्यांच्या मुलांना इथे घालू शकतात, तर आपण का नाही?”
हाच विचार जर समाजाने आत्मसात केला, तर लाखो अंगणवाड्यांना, जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या शाळांना एक नवा श्वास मिळू शकतो.
हा निर्णय समाजासाठी आरसा ठरावा. असा आरसा, ज्यात आपण स्वतःचं खरंखुरं प्रतिबिंब पाहू शकतो.
आज आपली शैक्षणिक स्वप्नं केवळ मोठ्या नावांमध्ये, झगमगाटात, आणि महागड्या सुविधा यांच्यात अडकून पडली आहेत. पण गुणवत्तेचं शिक्षण हे गरिबी किंवा श्रीमंतीवर अवलंबून नसतं, ते ठरतं शिक्षण देणाऱ्या व्यवस्थेवर, आणि त्या व्यवस्थेवर असणाऱ्या विश्वासावर.
टोकरतलावच्या अंगणवाडीत शुकर आणि सबर यांचा पहिला दिवस, शिक्षणाच्या एका नव्या दिशेचा प्रारंभ ठरतो. हा एक असा प्रारंभ आहे जो समाजाच्या दृष्टिकोनाला बदलू शकतो. जर आपण तो स्वीकारण्याचं धैर्य दाखवलं, तर.
डॉ. मिताली सेठी आणि डॉ. वैभव सबनिस यांना मनापासून सलाम. त्यांच्या या कृतीतून व्यक्त होणारा सामाजिक संदेश केवळ शाब्दिक नाही, तो कृतीशील आहे.बदल फक्त भाषणांतून होत नाहीत, तो घडतो अशा कृतीतून ज्या अंतःकरणातून येतात, आणि मनापासून केल्या जातात.
आज टोकरतलाव उजळलं आहे... उद्या संपूर्ण जिल्हा उजळेल... आणि मग एक दिवस संपूर्ण समाज.
कारण प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात एका छोट्याशा निर्णयापासूनच होते. आणि ती पहाट आज आपण पाहतो आहोत.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा