पित्याविना पालकत्वाचा आधार : त्रिवेदी दांपत्याची सामाजिक बांधिलकी...!


पित्याविना पालकत्वाचा आधार : त्रिवेदी दांपत्याची सामाजिक बांधिलकी...!


आयुष्य जेव्हा प्रत्येक वळणावर परीक्षा घेतं, तेव्हा काही जिद्दी माणसं त्या परीक्षांना हिमतीने सामोरं जातात. चिकाटी, मेहनत आणि स्वप्नांवर ठाम विश्वास ठेवत त्या ध्येयाच्या दिशेने सातत्यानं वाटचाल करत राहतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे एरंडोल येथील कुमारी तेजश्री किशोर बिराडे हिची वडिलांच्या निधनानंतर कठीण परिस्थितीशी सामना करत, आईच्या कष्टांची शिदोरी घेत NEET सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण करणारी ही मुलगी आता थेट मुंबईच्या ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घेणार आहे.

या यशामागे आहे संघर्ष, त्याग आणि शिक्षणावरील नितांत श्रद्धा. तेजश्रीची आई आशा किशोर बिराडे या एक धैर्यशील स्त्री आहेत. त्या दररोज आठ-दहा घरांमध्ये धुणी-भांडी, झाडू-पोछा व घरकाम करून आपल्या तीन अपत्यांचा सांभाळ करत आहेत. पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार एकहाती वाहताना, त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. आणि याच कष्टाचे फळ म्हणजे तेजश्रीचे हे यश!

मात्र या यशाला खरी दिशा मिळाली ती तेव्हा, जेव्हा एरंडोल व जळगाव जिल्ह्यातील प्रख्यात विधीज्ञ आणि सामाजिक भान असलेले अ‍ॅड. ओम त्रिवेदी व त्यांच्या पत्नी सौ. रेखा ओम त्रिवेदी यांनी पुढाकार घेतला. तेजश्रीच्या संपूर्ण MBBS शिक्षणाचा खर्च म्हणजेच कॉलेज फी, वसतिगृह, मेस, पुस्तके, कपडे इत्यादी सर्व जबाबदारी त्रिवेदी दांपत्याने उचलण्याचा निर्णय घेतला.

ही केवळ आर्थिक मदत नव्हे, तर ही आहे मानवतेची आणि संवेदनशीलतेची जाणीवपूर्वक कृती जी एका होतकरू विद्यार्थिनीला तिच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी पूरक ठरते. अ‍ॅड. ओम त्रिवेदी यांनी प्रत्यक्ष तेजश्रीला रुपये ५०,०००/- देऊन या उदात्त कार्याची सुरुवात केली. हे देणं केवळ आर्थिक मदतीपुरतं मर्यादित नाही, तर तिच्या भावी वाटचालीसाठी दिलेला आत्मविश्वासाचा दिलासा आहे.

या प्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महाराणा प्रताप सिंग शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. जगदीश पाटील, प्रा. राखी पाटील, तसेच एरंडोल येथील श्रीकृष्ण ऑइल मिलचे संचालक डॉ. राजेंद्र चौधरी उपस्थित होते. त्या वेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत समाधान, कृतज्ञता आणि आनंदाश्रू दाटून आले होते. कारण त्या क्षणी एक गरीब पण बुद्धिमान मुलीचं आयुष्य उजळत होतं.

तेजश्री, जी संपूर्ण आयुष्य आईच्या घामातून शिकली, आज जेव्हा या नव्या संधीकडे पाहते, तेव्हा तिच्या शब्दांमधून तिची मनोभूमिका स्पष्ट दिसून येते. ती म्हणते 
"माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आणि मी स्वावलंबी झाल्यावर, किमान पाच गरीब आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींची जबाबदारी मी स्वतः घेईन."

हे तिच्या मनातील कृतज्ञतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे बोल आहेत.जे भविष्यात तिच्यासारख्याच अनेक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरतील.

या घटनेतून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो.
तेजश्रीसारख्या विद्यार्थ्यांसाठी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी पुढे येणं, ही खरी सामाजिक बांधिलकी आहे. अ‍ॅड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचं हे कार्य केवळ दातृत्व नव्हे, तर संस्कारांचं बीजारोपण आहे. जे तेजश्रीच्या मनात खोलवर रुजेल आणि भविष्यात अनेक आयुष्यांना उजळवेल.

आज तेजश्रीच्या पाठीशी वडिलांचे छत्र नसले, तरी तिच्या पाठीशी ओम त्रिवेदी आणि रेखा त्रिवेदी यांच्यासारख्या पालकत्वाची भूमिका निभावणाऱ्या व्यक्तींचा आधार आहे. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे एक आयुष्य नव्याने उभं राहत आहे. आणि उद्या, कदाचित हीच तेजश्री दुसऱ्या तेजश्रीसाठी मदतीचा हात पुढे करेल!

"सामाजिक जाणिवा, शिक्षणाची जिद्द आणि मानवीतेचा विजय यांचा एकत्रित संगम म्हणजे तेजश्रीची ही यशोगाथा!"

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !