जग जाळणाऱ्यांना किंमत नसते…...!


जग जाळणाऱ्यांना किंमत नसते…...!

आजचं जग प्रगतीच्या शिखरावर आहे. तंत्रज्ञानानं माणसाला चंद्रावर पोहोचवलं, तर पैशाच्या जोरावर आकाश गाठलं. पण या साऱ्याचं गडगडाट असताना माणुसकीची आणि नात्यांची किंमत हळूहळू कमी होत चालली आहे.

कधी काळी भावना समजून घेणाऱ्या नात्यांची आपण सन्मान केला करायचो. जीव ओवाळून एकमेकांसाठी उभे राहणारे लोक होते, ज्यांच्या नात्यांचा पाया प्रेम, आदर आणि समजूतदार पणावर उभा होता. पण आज? नातेसंबंध सुद्धा फायद्याच्या गणितात मोजले जात आहेत. उपयोगी असेल तर जवळचा, नसेल तर दूरचा. संवेदनाशीलता बाजूला ठेऊन फक्त व्यवहार उरला आहे.

या महागाईच्या बाजारात माणसाची किंमत मात्र फारच स्वस्त झाली आहे. प्रेम, संयम, सहनशीलता आणि क्षमा या गुणांची किंमत वाढली नाही, कारण लोक आता त्याकडे पाहतच नाहीत. आणि अशा सगळ्यात एक गोष्ट अजून ही अत्यंत स्वस्त आहे. माचिस. एक रुपयाला मिळणारी, पण संपूर्ण आयुष्य जाळून टाकणारी.

एका घरासाठी, एका नात्यासाठी, एका स्वप्नासाठी माणूस आयुष्यभर मेहनत करतो. रोज आपली भावना जपतो, राग आवरतो, मनातील अनेक खंत गिळतो  फक्त ते नातं टिकवण्यासाठी. पण या नाजूक नात्याला जाळण्यासाठी फार मोठं कारण लागत नाही. एक चुकीचं वाक्य, एक चुकीची वागणूक किंवा एखाद्या चुकीच्या समजुतीमुळे सर्व काही राख होऊ शकतं.

हे करण्यासाठी फार मोठं सामर्थ्य लागत नाही. उलटपक्षी, तोडणं, फोडणं, जाळणं हे सगळ्यात सोपं असतं. पण अशा लोकांची किंमत काय असते? अगदी माचिस इतकी एक रुपया. कारण त्यांनी काहीही निर्माण केलेलं नसतं. त्यांनी प्रेम जपलेलं नसतं. त्यांना संवेदना समजत नाहीत. त्यांच्या शब्दांत असलेलं तेज फक्त जाळण्यासाठी असतं, प्रकाश देण्यासाठी नव्हे.

म्हणून खरं सामर्थ्य असतं जपण्यात. नातं जपणं, विश्वास टिकवणं, चुकांवर माफीनामा देणं, आणि कोणीतरी आपलंच आहे याची जाण ठेवणं. हे सोपं नाही, पण हेच खरं आहे.

आपण कुठल्या वाटेवर चालायचं हे आपल्या हातात आहे. आपण एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा लावू किंवा त्याचं आयुष्य जाळू हे आपल्या कृतींवर ठरतं. आपले शब्द माणसाला उभं करतात, तेच शब्द त्याला खाली खेचतात.

आज माचिस घेऊन जाळणारे लोक भरपूर भेटतील. जिथे नाती तुटतात, मैत्री विखुरते, स्वप्न राख होतात. पण त्या राखेतून उभे राहणारे लोक फारच कमी असतात. आणि असे उभे करणारे, जपणारे, प्रेम करणारे लोकच खऱ्या अर्थाने "कीमती" असतात.

म्हणून ठरवा  तुम्ही कोण होणार? तोडणारे की जोडणारे? जाळणारे की उजळवणारे?

कारण दिवा लावणाऱ्यांची आठवण काळाच्या पटलावर राहते, पण माचिस घेऊन जाळणारे फक्त क्षणभरच चमकतात… आणि मग काळोखात हरवून जातात.
जग जाळणाऱ्यांना किंमत नसते… पण जग उभं करणाऱ्यांना इतिहास स्मरण ठेवतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !