आयुष्याची खरी संपत्ती आशीर्वादांची शिदोरी....!
आयुष्याची खरी संपत्ती आशीर्वादांची शिदोरी....!
जीवन ही एक अशी वाटचाल आहे, जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी साठवलं जातं. आठवणी, अनुभव, आनंद, दुःख, माणसं आणि त्यांचं आपल्या विषयीचं भावविश्व. काही साठवण हृदयात गोडसर गंधासारखी राहते, तर काही साठवण खोल कुठेतरी जखम करत राहते. म्हणूनच हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, की आयुष्यभर आपल्याला काय साठवायचं आहे.
आपण सगळेच आपल्या परीने काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत असतो. यश, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता… पण या सर्व गोष्टी शेवटी याच जगात राहून जाणार आहेत. माणूस जातो, आणि मागे राहतो त्याच्या आयुष्याचा सुगंध किंवा क्षोभ. तेव्हा खरा प्रश्न हा असतो, की आपण आपल्या आयुष्यात काय मागे ठेवून जात आहोत?
जर काही "जमा" करायचं असेल, तर ते माणसांचे आशीर्वाद असावेत. कुणाच्या डोळ्यांतून निघालेलं कृतज्ञतेचं पाणी, कुणाच्या मनातून उठलेली प्रार्थना, ज्यात आपलं नाव असतं. हीच खरी संपत्ती असते. कारण हृदयातून निघणाऱ्या आशीर्वादांची ताकद अमूल्य असते. ती आपल्या जीवनात अ-visible, पण अमोघ शुभ ऊर्जा बनून साथ देत राहते.
पण दुसरीकडे, जर कुणाच्या मनातून आपल्यासाठी तळतळाट निघाला असेल, तर तो आपल्या सुखाला गिळणारा असतो. अशा नकारात्मक ऊर्जेचं ओझं फार काळ झेपत नाही. जिथे कुणाचं मन दुखावलेलं असतं, तिथे आपला आनंद टिकत नाही.
आयुष्यात अशी वेळ अनेकदा येते, जेव्हा सगळं आपल्याच मनासारखं घडतं. तेव्हा वाटतं किती भाग्यवान आपण! ही ईश्वराची कृपा आहे. आणि ते खरंच असतं. पण खरी परीक्षा तेव्हा असते, जेव्हा सगळं आपल्याच्या विरुद्ध घडतं. मनाशी जपलेली स्वप्नं कोसळतात, अपेक्षा अपुरी राहतात, प्रयत्न अपयशी होतात. तेव्हा मन अस्वस्थ होतं, दुःखी होतं, निराश होतं.
पण त्या क्षणी जर हे ध्यानात ठेवलं, की "जे आपल्या मनाविरुद्ध घडलं, ते ही ईश्वराच्या इच्छेनेच," तर मनातली घालमेल शांत होऊ लागते. कारण देव नेहमी आपल्या भल्याचंच बघतो. आपल्याला जे हवं असतं, ते लगेच मिळेलच असं नाही. पण जे मिळेल, ते आपल्या वाढीसाठी आवश्यक असतं.
मनाप्रमाणे झालं, तर ती कृपा आहे.मनाविरुद्ध झालं, तर ती इच्छा आहे.आणि दोन्ही अवस्थांमध्ये जर आपण स्वीकार आणि श्रद्धा ठेवली,तर समाधान हा आपला हमखास भाग होतो.
समाधान ही अशी गोष्ट आहे, जिला ना बाजारात किंमत आहे, ना नशिबात हमी. ती मिळते फक्त त्यालाच, जो जीवनाला "जसं आहे तसं" स्वीकारतो. जो तक्रारी करत नाही, दोष देत नाही, फक्त मन शांत ठेवतो. कारण त्याला माहीत असतं."सगळं काही एका उच्च नियोजनात आहे."
म्हणूनच, या जीवनाच्या प्रवासात जर काही आपल्याला बरोबर न्यायचं असेल,तर ते कुणाच्या चेहऱ्यावर उमटलेला आपल्यामुळे आलेला हास्य असो,
कुणाच्या मनात आपल्यासाठी निर्माण झालेली सदिच्छा असो,कुणाच्या अश्रूतून वाहणारी नम्र कृतज्ञता असो…
तळतळाट नको. तो सुख मिळून ही खायला देत नाही.
पैसा असला, तरी अशांत मनाला शांती देत नाही.
म्हणून प्रेम द्या, माफी द्या, आपुलकी ठेवा.
ज्या दिवशी आयुष्य संपेल, त्या दिवशी फक्त दोनच गोष्टी मोजल्या जातील.किती माणसं आपल्यासाठी प्रार्थना करतील,आणि किती माणसांच्या मनात आपण अजून ही जिवंत असू.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा