प्रयत्न, यश आणि शेजारी....!
प्रयत्न, यश आणि शेजारी....!
माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. अपूर्ण स्वप्नांचा, सततच्या धडपडीचा आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या न संपणाऱ्या प्रयत्नांचा. प्रत्येकालाच वाटतं की आयुष्यात काहीतरी मोठं करावं, आपलं असं काहीतरी विशेष घडवावं, जे घरच्यांना अभिमानानं सांगता येईल. या वाटचालीत कितीतरी अडथळे येतात, कधी परिस्थिती साथ देत नाही, तर कधी लोक. पण एक गोष्ट मात्र खरी जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात, तर कधी ना कधी यश तुमच्या पावलांशी नक्कीच येऊन जुळतं.
जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा घरात उत्सवाचा माहोल असतो. आई-वडिलांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू दिसतात, त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक त्यागाला उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. तुमच्या छोट्या छोट्या यशामागे त्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या की त्यांना वाटतं, त्यांचा संसार सफल झाला. त्या क्षणी घर ओसंडून वाहतं प्रेमाने, अभिमानाने, आणि तुमच्यावरील निखळ विश्वासाने.
पण सगळ्यांना असं यश लवकर मिळतंच असं नाही. काही वेळा प्रयत्न खूप असतो, मनापासून असतो, पण अपेक्षित यश मिळत नाही. आणि हाच तो क्षण असतो जिथे आपली खरी कसोटी लागते. अपयश आलं की घरच्यांचं हळूहळू मौनात रूपांतर होतं, प्रश्न न विचारता काळजी व्यक्त होते. पण शेजारी, नातेवाईक, समाज ते मात्र चुकूनही शांत बसत नाहीत. त्यांना तुमच्या अपयशातून काहीतरी विशेष समाधान मिळतं, जणू त्यांचं काहीतरी सिद्ध झालं आहे अशा आविर्भावात ते बोलू लागतात. "किती दिवस झाले, अजून काही जमलं नाही?", "काय उपयोग एवढ्या शिक्षणाचा?", किंवा "अहो, आम्ही तर आधीच म्हणालो होतो..." अशा वाक्यांनी तुमच्या प्रयत्नांचा अवमूल्यन केलं जातं. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू असतं. ते आनंदात नसतात, पण तुम्ही यशस्वी झालो नाहीत, याचं त्यांना अप्रूप वाटतं.
मात्र, इथेच एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. हे सगळं बाहेरचं आहे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी बाह्य परिस्थितींनी ठरत असल्या, तरी तुमचा आत्मविश्वास, तुमची चिकाटी, तुमचं स्वप्न या गोष्टी तुमचं खऱ्या अर्थाने आयुष्य ठरवत असतात. शेजाऱ्यांच्या हसण्यावर तुमचं भविष्य अवलंबून नाही, पण तुमच्या प्रयत्नांवर मात्र नक्कीच आहे. कारण एक दिवस येतोच, ज्या दिवशी तेच लोक ज्यांना तुमच्या अपयशाची करमणूक वाटत होती, तेच लोक तुमच्या यशाच्या मागचं कारण शोधत फिरतात.म्हणूनच, जे काही होईल ते होऊ द्या, पण प्रयत्न थांबवू नका. कारण यश तुम्हाला किती वेळाने मिळेल हे सांगता येत नाही, पण अपयशाच्या प्रत्येक क्षणात तुम्ही किती घडता, हे तुमच्याच हातात असतं. आणि ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल, त्या दिवशी घरचं समाधान आणि शेजाऱ्यांची शांतता दोन्ही तुमच्या नशिबात असतील.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा