वज्रमूठ जीवन यशस्वी करण्याचा मंत्र....!
वज्रमूठ जीवन यशस्वी करण्याचा मंत्र....!
माणसाचं जीवन हे अखंड चालणारा एक प्रवास आहे. या प्रवासात असंख्य वळणं, काही विश्रांतीचे क्षण, तर काही चढ-उतार असतात. या प्रवासात जो स्वतःला हरवू देत नाही, संकटांपुढे झुकत नाही, तोच खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो. आणि या यशाचा खरा मार्ग सापडतो तेव्हाच, जेव्हा आपल्या आयुष्यात पाच अनमोल गोष्टींचं अस्तित्व दृढ होतं. जशा पाच बोटं मिळून एक हात पूर्ण करतात, तशाच या पाच गोष्टी मिळून आयुष्याला दिशा देतात, बळ देतात आणि यशाच्या वाटेवर पुढं नेतात.
उत्तम मित्र म्हणजे केवळ हास्य-विनोदात रमणारा साथी नाही, तर असा आत्म्याचा सखा असतो जो तुमच्या दु:खालाही स्वतःच्या हृदयाशी कवटाळतो. सगळे पाठ फिरवतात, तेव्हा तोच पाठीशी उभा राहतो. तो शब्द न बोलता तुमचं दु:ख समजतो आणि तुमच्यात पुन्हा जगण्याची उमेद जागवतो. आयुष्यात एक जरी असा खरा मित्र लाभला, तरी ते आयुष्य समृद्ध मानावं लागेल.
योग्य मार्ग म्हणजे जीवनातला खरा प्रकाशदूत. जीवनाच्या काही वळणांवर वाट चुकते, अंधार दाटतो, पण जर आपण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला, तर दिशा हमखास सापडते. मार्ग कठीण असो की सोपा, तो योग्य असेल तर यश निश्चित असतं. अंधार कितीही गडद असला तरी त्यामागे एक नितळ पहाट लपलेलीच असते.
चांगले विचार हे मनाचं आरसाच असतात. विचार जर निर्मळ असतील, तर माणूस चुकतोच नाही. सकारात्मक विचार म्हणजे संकटांना सामोरं जाण्याचं बळ. अशा विचारांमुळे माणूस केवळ स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी ही आदर्श ठरतो. विचार हेच माणसाचं खऱ्या अर्थानं आयुष्य घडवतात.
उच्च ध्येय हे म्हणजे जागेपणी पाहिलेलं स्वप्न. ते मनामध्ये खोल रुजलेलं असतं आणि त्यासाठीच माणूस झटतो, लढतो, पडतो, पुन्हा उभा राहतो. ध्येयाशिवाय आयुष्य म्हणजे समुद्रात दिशा न ठरवता भटकणारी होडी. ते ध्येयच आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये अर्थ निर्माण करतं आणि यशाच्या वाटेवर चालण्याचं कारण बनतं.
या सर्व गोष्टींना जोडणारा धागा म्हणजे नम्रता. यश कितीही गाठलं, तरी जर नम्रता नसेल, तर माणूस आतून रिकामाच राहतो. झाड फळांनी भरलं की वाकतं, तसं यशस्वी माणसानेही नेहमी नम्र राहावं लागतं. नम्रतेतच खऱ्या माणुसकीचं तेज असतं. जे माणसाला मोठेपण देतं, पण गर्व शून्य ठेवतं.
या पाच ही गोष्टी जेव्हा मनामध्ये एकत्र रुजतात, तेव्हा तयार होते वज्रमूठ. ही वज्रमूठ केवळ शक्तीचं नव्हे, तर आत्मविश्वास, श्रद्धा, साधेपणा, सकारात्मकता आणि जिद्दीचं प्रतीक असते. हीच वज्रमूठ माणसाला संकटांशी दोन हात करायला शिकवते. हीच वज्रमूठ अंधारात ही आशेचा दीप दाखवते.
कारण, एकदा का ही वज्रमूठ बनली, की मग कोणती ही अडचण, कोणतंही संकट, कोणतंही अपयश फार काळ टिकू शकत नाही. यश मग हळूच येतं, पावलांशी लोळण घालतं आणि आपण स्वप्नांकडे वाटचाल करत राहतो. अधिक मजबूत, अधिक आत्मभान असलेले.
म्हणूनच, जर आयुष्य घडवायचं असेल, तर ही पाच गुणांची ‘वज्रमूठ’ आपल्या जीवनात तयार करा. कारण हीच वज्रमूठ अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करते, आणि यशस्वी जीवनाचं खऱ्या अर्थानं दार उघडते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा