वादळं येतात पण ती जातात ही....!


वादळं येतात पण ती जातात ही....!

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वादळं येतात. ही वादळं केवळ हवामानातील नसतात, तर ती मनातसुद्धा उठतात. नात्यांमधील दुरावे, अपयशांची घालमेल, अपेक्षांमधील गोंधळ, आणि कधी स्वतःच्याच अस्तित्त्वावर उठलेले प्रश्न. अशा काळात मन अस्वस्थ होतं, विचारांची गर्दी अधिकच प्रचंड वाटू लागते. मात्र एवढं लक्षात ठेवायला हवं कोणतेही वादळ कायमचं नसतं. ते येतं, आयुष्य हलवून टाकतं, पण शेवटी शांत होतं… आणि मागे ठेवून जातं काही अनुभव, काही शिकवण, आणि थोडंसं अधिक समजूतदार बनलेलं आपण.

वादळं जेव्हा मनात उठतात, तेव्हा सर्व काही विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. नाती तुटतात, विश्वास डळमळतो, आणि स्वतःच्याच निर्णयांवर शंका येते. पण अशा स्थितीतसुद्धा जर आपण संयमाने विचार केला, तर वाट नक्कीच सापडते. कारण वादळानंतरच खरी शांतता असते, आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने नव्याने सुरूवात करता येते. दुःखावर मात करणं, तुटलेल्या गोष्टी सांधणं, आणि आयुष्याकडे पुन्हा प्रेमाने पाहणं हेच खरं धैर्य.

मनात राग असतो, कुठे तरी अभिमान असतो, आणि झालेल्या वेदनांची जखम अजूनही ताजी असते. पण ह्या सगळ्या भावना मनात दाटून ठेवण्यात काहीही समाधान नाही. उलट त्या पुढच्या वाटचालीस अडथळा ठरतात. म्हणून काही गोष्टी सोडाव्याच लागतात स्वतःसाठी. क्षमा करणं, विसरणं, समजून घेणं हे दुसऱ्यांसाठी नसतं, ते स्वतःला मुक्त करण्यासाठी असतं. मनाला स्थैर्य देण्यासाठी, अंतःकरणातली शांतता टिकवण्यासाठी.

तोडणं हे सहज शक्य असतं. एका क्षणात एखादं नातं संपवता येतं. मात्र जेव्हा जोडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा त्यासाठी वेळ द्यावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदय देऊन जगावं लागतं. नाती, माणसं, स्वप्नं ही टिकवण्यासाठी असतात. जीवन म्हणजे एक प्रवास आहे, जो एकट्यानं चालता येत नाही. म्हणूनच आपल्या वाटचालीत साथ देणाऱ्या प्रत्येक माणसाला आपुलकीनं, समजून, प्रेमानं जपायला हवं.

आपण अनेकदा भूतकाळात अडकून जातो. काय झालं, कोण काय वागलं, काय हरवलं ह्याचा विचार करत बसतो. त्याचवेळी भविष्याची चिंता मनाला पोखरत राहते. पण या सगळ्याच्या दरम्यान आपण 'आजचा क्षण' गमावतो. तो क्षण, जो आपला आहे, जो आपल्या हातात आहे.

खरं तर आयुष्य याच क्षणात असतं. ‘आत्ता’चं महत्व ओळखायला हवं. या क्षणासाठीच देवाचे आभार मानावेत कारण आपण अजूनही इथे आहोत, श्वास घेत आहोत, शिकत आहोत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची संधी आपल्याकडे आहे.

हो, हे जगणं सोपं नाही, हे मान्य आहे. पण प्रत्येक नवा दिवस एक नवी संधी घेऊन येतो. ठरवलं, तर त्या संधीचं काही तरी सुंदर आपण घडवू शकतो. दुःख, मतभेद, ताणतणाव यांना मागे टाकून आयुष्याच्या नव्या पायवाटेकडे वळता येतं. आयुष्य पुन्हा जवळून, प्रेमानं, शांततेनं अनुभवता येतं.

म्हणून आज, याच क्षणी अंतःकरणापासून देवाचे आभार माना. जे मिळालं, त्यासाठी… जे गमावलं, त्यातून जे शिकलो, त्यासाठी… आणि जे अजून घडायचं आहे, त्या नवीन प्रवासासाठी…

पुन्हा एकदा, नव्या आशेनं, नव्या उमेदीनं आणि नव्या शांततेनं आयुष्याची सुरुवात करा.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !