प्रत्येक दिवस एक शिकवण....!
प्रत्येक दिवस एक शिकवण....!
आयुष्य म्हणजे एक गूढ आणि अनुभवांनी भरलेला प्रवास आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काहीतरी वेगळं घेऊन आपल्या जीवनात प्रवेश करतो. काही दिवस इतके आनंददायी असतात की केवळ त्यांची आठवणसुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवते. काही दिवस मात्र मनाच्या खोल कप्प्यात जाऊन बसतात, आणि पुन्हा आठवले की डोळ्यांत नकळत अश्रू येतात.
परंतु या सर्व दिवसांमध्ये एक गोष्ट समान असते. प्रत्येक दिवस काही ना काही शिकवण देऊनच जातो.
कधी आपण म्हणतो, "हा दिवस फारच खराब गेला", "आज काहीच चांगलं वाटलं नाही", किंवा "हे असंच माझ्याच बाबतीत का घडलं?" पण जर थोडा वेळ थांबून शांतपणे विचार केला, तर लक्षात येतं की अशा कठीण दिवसांनीही आपल्याला काहीतरी शिकवलं असतं. कदाचित संयम, कधी आत्मनियंत्रण, तर कधी आत्मपरीक्षण.
जेव्हा आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखं घडतं, तेव्हा आपण त्या क्षणांचा मनमुराद आनंद घेतो. त्या वेळी वाटतं की हेच खरं जीवन आहे. मात्र, हे क्षण क्षणिक असतात. ते निघून जातात आणि मागे उरतात फक्त आठवणी प्रेमळ, आनंददायी, हास्याने भरलेल्या. हेच क्षण आणि आठवणी आपल्याला एकटेपणाच्या क्षणी आधार देतात.
काही दिवस विशेष घडामोडीशिवाय जातात, पण तरीही सुखद वाटतात. त्या दिवसांत फारसं काही घडत नाही, पण मन शांत, समाधानी असतं. असे क्षण नकळत आपल्याला समाधान देतात आणि आपलं अस्तित्व अधिक जाणीवपूर्वक जाणवायला लावतात.
मात्र, काही दिवस असेही येतात जेव्हा सगळं अपेक्षांच्या विरुद्ध घडतं. एखादं नातं फसवतं, काहीतरी दुखावणारं घडतं, आणि मन अस्वस्थ होतं. अशा वेळी आपण स्वतःला किंवा इतरांना दोष देतो. पण खरी गोष्ट अशी असते की हेच दिवस आपल्याला सखोल अनुभव देतात जे आपली दृष्टी बदलतात आणि आपल्याला अधिक परिपक्व करतात.
कधी कधी असा काळ येतो की आयुष्यच पूर्णपणे ढासळल्यासारखं वाटतं. त्या दिवसांमध्ये अंधार दाटलेला असतो आणि पुढे काही चांगलं होईल यावरही विश्वास राहत नाही. परंतु हेच दिवस आपल्याला सर्वात मोठा धडा शिकवतात. संयम, सहनशीलता आणि स्वतःवरील विश्वास यांचा. त्या दिवसांत आपण तुटतो की नाही, हे महत्त्वाचं नसतं; आपण तुटून पुन्हा कसे उभे राहतो, हेच खरे महत्त्वाचे असते.
म्हणूनच, कोणताही दिवस वाया जात नाही. तो सुंदर असो, साधा असो, कठीण असो किंवा वेदनादायक प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन रुजवतो. काही दिवस आपल्याला हसवतात, काही रडवतात, काही शिकवतात. पण प्रत्येक दिवस आपल्या जीवनात अधिक अर्थ भरतो.
जीवनाच्या या प्रवासात प्रत्येक दिवसाचं काही ना काही कारण असतं. कधी तो थांबायला सांगतो, कधी पुढे धावायला, तर कधी अंतर्मुख होऊन स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. म्हणूनच, दिवस कोणताही असो, त्याला दोष देण्याऐवजी त्यातून काय शिकता येईल, हे समजून घेणं हेच खरं शहाणपण आहे.
शेवटी, आयुष्य हे एक पुस्तक आहे. प्रत्येक दिवस त्यातील एक पान. काही पानं रंगीत, काही फिकट, तर काही अश्रूंनी ओलावलेली. पण या सर्व पानांनी मिळूनच आपली कहाणी तयार होते... आणि ही कहाणीच आपल्या अस्तित्वाची खरी ओळख ठरते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा