राजा तोच ज्याच्या राणीच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं...!
राजा तोच ज्याच्या राणीच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं...!
आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येक पुरुष स्वतःला यशस्वी, सक्षम आणि आदर्श मानतो. कुणी आपल्या व्यवसायावर अभिमान बाळगतो, कुणी आपल्या संपत्तीवर, तर कुणी आपल्या व्यक्तिमत्त्वावर गर्व करतो. परंतु खरं सांगायचं झालं, तर एखाद्या पुरुषाची खरी पात्रता, त्याचा खरा दर्जा त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यातच दिसतो.
बायको जर हसरी, आनंदी, खेळती आणि निर्धास्त असेल,तर हे निश्चित समजावं त्या घरात एक खरा राजा माणूस राहतो.
कारण स्त्रीच्या चेहऱ्यावरचं हास्य हे फक्त सौंदर्याचं प्रतीक नसतं,ते तिच्या मनःशांतीचं, विश्वासाचं, आणि आनंदाचं दर्शन असतं.आणि ते हास्य टिकून राहतं कारण तिच्या सोबत असतो एक समजूतदार नवरा जो तिला ऐकतो, समजतो आणि तिच्या अस्तित्वाचा सन्मान राखतो.
ज्या पुरुषाने आपल्या बायकोला राणीप्रमाणे वागवलं,
तिच्या भावना, तिची स्वप्नं आणि तिच्या मनातील छोट्या छोट्या इच्छा समजून घेतल्या,आणि तिला त्या पूर्ण करण्याचं धैर्य दिलं.तोच खरा राजा असतो.राजेपण हे पदावर, पैशावर किंवा प्रतिष्ठेवर नसतं,ते वागण्यात, शब्दांत आणि मनातील प्रेमात असतं.
आजच्या काळातील स्त्रीला सोनं-चांदी, महागडे दागिने किंवा वस्तूंचा ढिगारा नको असतो.तिला हवं असतं प्रेम, आपुलकी, आधार आणि सन्मान.ती जर घरात हसत खेळत, आनंदाने आणि निर्धास्तपणे राहत असेल,तर तिच्या नवऱ्याने तिला ती जागा दिलेली असते.जिथे ती स्वतःसारखी, निर्भय आणि मनमोकळेपणाने जगू शकते.
बायको राणीप्रमाणे जगते म्हणजे ती फक्त सजते-धजते म्हणून नव्हे,तर ती मनाने समाधानी आणि शांत असते म्हणून.ज्या पुरुषाने तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं आणि आनंदाचं हास्य उमटवलं,तोच खरा नायक, तोच खरा राजा माणूस असतो.
खरा पुरुष तो नाही जो बाहेरच्या जगात किती लोकांवर प्रभाव टाकतो,खरा पुरुष तो आहे जो आपल्या घरात एका स्त्रीच्या मनात प्रेम आणि सन्मानाचं राज्य निर्माण करतो.ती त्याच्याकडे पाहून अभिमानाने म्हणते “हा माझा माणूस आहे, ज्याच्यासोबत मी सुरक्षित, सुखी आणि समाधानी आहे.”
अशी बायको, जी रोज हसते, छोट्या गोष्टींवर आनंदी होते,तिच्या मागे असतो एक समजूतदार नवरा जो तिच्या अश्रूंना शब्दात न मोजता मनाने समजतो.तो तिला बांधून ठेवत नाही, तर मुक्तपणे जगू देतो. तो तिच्या मनाचा राजा बनतो, आणि म्हणूनच ती त्याची राणी होते.
म्हणूनच म्हणतात पुरुषाची खरी पात्रता त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यात दिसते.
ती जर हसरी, शांत, प्रेमळ आणि आनंदी असेल,
तर तो पुरुष नक्कीच “राजा माणूस” असतो.
त्याच्या वागण्यात नम्रता असते, नजरेत प्रेम असतं आणि हृदयात आपुलकी असते.तो आपल्या राणीला फुलासारखं जपतो, तिच्या मनाला सांभाळतो,
आणि म्हणूनच त्यांच्या संसाराचं बगिचं नेहमी फुलतं राहातं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा