राजीवदादा देशमुख जनसेवेचा अमोल नायक...!
राजीवदादा देशमुख जनसेवेचा अमोल नायक...!
आज चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, चाळीसगाव मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार, कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष आणि एक लोभस व्यक्तिमत्त्व असलेले राजीव दादा देशमुख आज आपल्यातून अखेरच्या प्रवासाला रवाना झाले.
दादांचा जीवनप्रवास संघर्ष, सेवा आणि समर्पणाने नटलेला होता. त्यांच्या वडिलांकडून स्वर्गवासी अनिल दादा देशमुख यांच्या कडून त्यांना मिळालेली मूल्यं, कार्यक्षमतेची शिकवण आणि जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ त्यांनी आयुष्यभर जपली.
राजकारण हे केवळ पदासाठी नसते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. नगराध्यक्ष पद असो वा आमदारकीची जबाबदारी, दादांनी प्रत्येक पदाचा आदर राखून ते समाजसेवेचे साधन मानले. गरीब, कष्टकरी, वंचित यांच्यासाठी नेहमीच त्यांचे दरवाजे खुले होते. कुणीही अडचणीत असो, राजीव दादांना भेटण्यासाठी कोणताही वेळी बंदिस्त नव्हता, कारण त्यांच्यासाठी माणूस आणि माणुसकी यांना सर्वोच्च स्थान होते.
कुस्ती हा त्यांचा जीव होता. जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या पारंपरिक खेळाला नवसंजीवनी दिली. नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन, सुविधा, स्पर्धा आणि मानसिक आधार देत त्यांनी ग्रामीण भागातील असंख्य खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्तीगिरी वाढली आणि आजही त्यांच्या आठवणी सर्वांच्या हृदयात जपल्या जातात.
दादा केवळ नेते नव्हते, तर मार्गदर्शक, स्नेही आणि आपलेपणाने वागणारे घरच सदस्य होते. त्यांची भाषा कधी कठोर वाटली तरी त्यामागे प्रामाणिक प्रेम आणि न्याय होता. माणुसकीच्या ओलाव्याने त्यांनी प्रत्येकाशी नाते जोडले.
आज ते आपल्या मध्ये नाहीत, ही कल्पना मनाला सुन्न करणारी आहे. पण त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही, तर एक युग संपले, एक विचारधारा शांत झाली, आणि अनेकांचा आधार हरवला.
दादांनी सुरू केलेल्या कार्याची ज्योत आपण प्रत्येकाने जपली पाहिजे. त्यांच्या विचारांचा, त्यागाचा आणि सेवाभावाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही खरी श्रद्धांजली ठरेल.स्वर्गीय राजीव दादा देशमुख यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा