प्रत्येक कृतीचा आरसा....!



 प्रत्येक कृतीचा आरसा....!

‘कर्म’ हा शब्द उच्चारायला जरी सोपा असला, तरी त्याचा अर्थ मात्र अतिशय खोल आहे. आपण दररोज असंख्य गोष्टी करतो. बोलतो, विचार करतो, कृती करतो... आणि त्या विसरूनही जातो. मात्र, कर्म काही विसरत नाही.

आपण केलेली प्रत्येक कृती ती चांगली असो वा वाईट  एका अदृश्य यंत्रात जमा होत जाते. आणि आयुष्यात एखादा क्षण असा येतो, जेव्हा आपण सगळं विसरून आपलं जीवन जगत असतो, तेव्हा हेच कर्म आपल्या समोर उभं राहतं. त्या क्षणी कर्माची जी थाप बसते, तिचा आवाज इतका स्पष्ट असतो की ती टाळताही येत नाही आणि दुर्लक्षही करता येत नाही.

आजच्या जगात हुशारी आणि चालकी हे गुण यशाचं मापदंड मानले जातात. पण जर ही हुशारी दुसऱ्याचा हक्क हिरावून घेत असेल, जर चालकी कोणाचं आयुष्य उध्वस्त करत असेल, तर ती यशाची नाही, तर अध:पतनाची सुरुवात असते. अनेकदा एखाद्या चतुर व्यक्तीचं आयुष्य अचानक कोसळतं, तेव्हा लोक आश्चर्याने विचारतात, "असं काय झालं?" पण त्यांचं कर्मच त्या प्रश्नाचं उत्तर देतं "हेच त्यांनी कधी काळी पेरलेलं होतं."

वाईट करावं, असं कोणी थांबवत नाही. कोणाच्या पाठीमागे वार करावेत, खोटं बोलावं, फसवणूक करावी हे सगळं करणं शक्य आहे. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी तुम्ही इतरांसाठी जे निर्माण करता, तेच उद्या तुमच्यासमोर उभं राहतं. कधी काळी केलेला एखाद्याचा अपमान, अनादर किंवा दुर्लक्ष, काही वर्षांनी अशाच स्वरूपात आपल्याच जीवनात परत येतो आणि त्या वेळी आपण अंतर्बाह्य हादरून जातो. मन विचारतं “अशी शिक्षा का?” पण ती शिक्षा नसते, ती असते कर्माची थाप.

कर्म ही केवळ शिक्षा देतं असं नाही, तर ते चांगल्या कृतीचं बक्षीसही देतं.ते ही दुप्पटीने. तुम्ही एखाद्याला मदत केली असेल, गरजूंना आधार दिला असेल, कोणाचं मन समजून घेतलं असेल, कुणाला सच्चं प्रेम दिलं असेल. तर या सगळ्याचं उत्तरही आयुष्य तुम्हाला देते. आणि ते मिळतं अनपेक्षित मदतीच्या रूपाने, शांततेच्या क्षणांत, अथवा अशक्य गोष्टी शक्य झालेल्या पाहण्यात.

कधी कधी काही प्रसंग असे येतात की अंत:करण हादरतं. अशा वेळी समोर कोणी शत्रूही नसतो, आणि दोष देण्यासारखंही काही नसतं, तरी मनात अस्वस्थता असते. वाटतं "हे असं का घडलं?" आणि त्या क्षणी एकच उत्तर उमजतं “ही आहे कर्माची थाप.”

या थापेने केवळ वेदना दिल्या असं नाही, तर त्या आपल्याला थांबायला भाग पाडतात. विचार करायला लावतात. पुढचं पाऊल अधिक जबाबदारीने टाकावं लागतं. दुसऱ्याच्या मनाला आपण दुखावू नये, कोणाचं आयुष्य आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे अंधारात जाऊ नये याची जाणीव होते.

कर्म हे नशिबाचं दुसरं नाव नाही. ते आपल्या कृतीचं प्रतिबिंब आहे. "नशिबातच असं लिहिलं होतं" असं म्हणणं सोपं असतं. पण खरं पाहिलं तर, आपलं नशिबही आपल्या कृतींवरच उभं असतं. आपण चांगलं बोललो, समजूतदारपणे वागलो, इतरांची काळजी घेतली, तर नशिबही आपल्याकडे झुकतं. आणि जर आपली वाट दुसऱ्याच्या अश्रूंमधून, फसवणुकीतून, किंवा दुखावलेल्या मनांतून गेली असेल, तर ते कर्म आपल्याला कधी ना कधी त्याचा परिणाम नक्कीच दाखवतं आणि ते ही द्विगुणित स्वरूपात.

शेवटी आयुष्य संपताना आपल्या जवळ काय उरतं? ना पैसा, ना प्रतिष्ठा, ना पद. उरतं ते केवळ आपलं स्वत:शी प्रामाणिक असणं, आपला अनुभव, आणि आपण दुसऱ्यांसाठी काय केलं प्रेम दिलं का? आधार दिला का? क्षमा केली का? हेच सगळं शेवटी आपल्याकडे परत येतं.

कर्माचा मार्ग सहज नाही. तो कठीण आहे. कारण तो तुम्हाला प्रत्येक क्षणी सजग राहायला लावतो. पण हाच मार्ग तुम्हाला जीवनात खऱ्या समाधानापर्यंत घेऊन जातो.म्हणूनच, जीवन जगताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचं प्रत्येक कर्म साठवलं जातंय. जे तुम्ही पेराल, तेच उगवेल. आणि ते उगवताना ते द्विगुणित होऊन तुमच्याच समोर उभं राहतं.

तेव्हा निवड तुमची आहे. प्रेम पेरा की वेदना.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !