समर्पणाची सावली मीराबाई वना कोळी....!
समर्पणाची सावली मीराबाई वना कोळी....!
जांभोरे हे गाव लहान असलं तरी तिथं एक मोठं मन धडधडतं ते म्हणजे मीराबाई वना कोळी यांचं. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाच्या संचालिका म्हणून त्या फक्त धान्य वाटत नाहीत, तर त्या गावात प्रामाणिकतेचा आणि सेवाभावाचा सुगंध पसरवत आहेत.
थम मशीन बंद पडलं, नेटवर्क गेलं, वीज गेली तरी मीराताईंच्या कामाचा जोम कधीच कमी होत नाही. लोकांना हक्काचं धान्य मिळावं, कुणी उपाशी राहू नये हीच त्यांची खरी पूजा आहे. म्हणूनच कधी कधी त्या रात्री ९ वाजेपर्यंत दुकानात उभ्या राहून धान्य वितरीत करत असतात. थकवा असतो, पण चेहऱ्यावर मात्र सदैव प्रसन्न हास्य आणि सेवाभावाचा तेज उजळलेला असतो.
मीराताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कधीच कुणाला अपशब्द बोलत नाहीत. रांगेत उभे असलेले गावकरीही म्हणतात “मीराताई म्हणजे आपुलकीची सावली.” त्या प्रत्येकाला आदराने, प्रेमाने, आणि हक्काने धान्य देतात. कोणाची अडचण आली तर त्या स्वतः मदत करतात, मशीन पुन्हा चालू करतात, कार्ड पुन्हा स्कॅन करतात.जो पर्यंत हक्काचं धान्य मिळत नाही तो पर्यंत थांबत नाहीत.
आणि ही सगळी सेवा त्या स्वतःच्या लहान नातवाबरोबर करतात. आजी काम करतेय, नातू धान्याचे पोते धरतो, मोजमाप बघतो. हे दृश्य पाहिलं की मन भरून येतं. जणू एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे “इमानदारी आणि सेवेचा वारसा” हस्तांतरित होत आहे.
मीराबाई वना कोळी म्हणजे ग्रामीण स्त्रीशक्तीचं एक जिवंत उदाहरण आहेत. त्या दाखवतात की सेवा ही केवळ नोकरी नाही, ती एक धर्म आहे. त्यांच्या डोळ्यांतून झळकणारा आत्मविश्वास आणि लोकांवरील प्रेम, हेच खरं त्यांच्या कामाचं पारितोषिक आहे.
आज जांभोरे गावात प्रत्येक घरात धान्य पोहोचतं, प्रत्येकाच्या पोटात अन्न जातं, आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना उमटते.मीराताई धन्यवाद
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा