पत्रकार म्हणजे कोण....?
पत्रकार म्हणजे कोण....?
पत्रकार म्हणजे केवळ बातम्या सांगणारा नाही, तो समाजाच्या जखमा ओळखणारा, त्यावर आवाज उठवणारा आणि सत्याची मशाल घेऊन अंधारात मार्ग दाखवणारा एक योद्धा असतो.
आजच्या धावपळीच्या, बाजारू जगात पत्रकारितेच्या नावाखाली अनेक गोष्टी घडत आहेत.काही जणांनी पत्रकारितेला खालच्या थरावर आणून ठेवलं आहे, हे खरे आहे. काही पत्रकार चापलूसी करतात, पैशासाठी, प्रसिद्धीसाठी सत्याशी तडजोड करतात.
पण म्हणून का आपण सगळ्यांनाच दोष देणार?
एका मळलेल्या फळामुळे संपूर्ण झाड वाईट ठरत नाही, तसंच एका पत्रकाराच्या चुकीमुळे संपूर्ण पत्रकारितेचा अपमान करणं हे अयोग्य आहे का ?
आजही असे अनेक पत्रकार आहेत जे पिढ्यान्पिढ्या कष्ट करून, प्रामाणिकपणे, जीव धोक्यात घालून, सत्य जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. कोणत्याही दबावाखाली न झुकता, कोणत्याही लालसेला थारा न देता, आपल्या तत्त्वांवर ठाम राहून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
दंगली असोत, पूर असो, दुष्काळ असो की युद्धजन्य परिस्थिती सामान्य नागरिक मागे हटतो, पण पत्रकार तिथे पोहोचतो. का? कारण त्याला फक्त ‘बातमी’ द्यायची नसते, तर समाजासमोर ‘सत्य’ मांडायचं असतं.
प्रश्न विचारणं, सत्य समोर मांडणं, आणि जनतेला जागृत ठेवणं हे पत्रकाराचं खरं काम आहे.
काही पत्रकार चुकत असतील, पण त्यामुळे संपूर्ण व्यावसायिकता नाकारणं, हे म्हणजे दिवा विझवून अंधाराची कुरबूर करणं होईल.
आपण एखाद्या व्यक्तीवर टीका करताना, त्याच्या मागे उभ्या असलेल्या हजारो प्रामाणिक पत्रकारांचा विचार करायला हवा. कारण हेच ते लोक आहेत जे अजूनही न डगमगता आपलं काम करत आहेत.म्हणूनच बोलताना, लिहिताना किंवा टीका करताना ही जाणीव असणं गरजेचं आहे की,सर्व लोक सारखे नसतात.
काहींच्या वागण्यामुळे सगळ्यांना एकाच मापात मोजणं ही अन्यायाची सुरुवात असते. आणि पत्रकारितेसारख्या पवित्र क्षेत्राचा अपमान, हा समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरू शकतो.आजही जे काही चांगलं शिल्लक आहे, जे सत्य जिवंत आहे, जे अन्यायावर आवाज उठतो आहे.ते या प्रामाणिक पत्रकारांमुळेच.
त्यामुळे लक्षात ठेवा,
"पत्रकार हा केवळ बातमीदार नाही, तो समाजाचा श्वास आहे.आणि जो पर्यंत प्रामाणिक पत्रकारितेचा श्वास चालू आहे, तो पर्यंत समाज जिवंत आहे." विसरून चालणार नाही.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा