नेतृत्व अहंकार नसलेली आघाडी...!
नेतृत्व अहंकार नसलेली आघाडी...!
"कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून,जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून,त्यांना सोबत घेऊन प्रगती साधणे होय."
या एका वाक्यात नेतृत्वाचे खरे स्वरूप सामावले आहे.
नेतृत्व म्हणजे केवळ सिंहासनावर बसून आदेश देणे नव्हे,तर लोकांच्या मनात स्थान मिळवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून,त्यांना प्रेरणा देत पुढे नेणे हेच खऱ्या अर्थाने नेतृत्व होय.
नेतृत्व हे अधिकारासाठी नव्हे, तर कर्तव्यासाठी असते.
ते एखाद्या पदासाठी नसून, जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता असते.नेतृत्व करताना एक नेता लोकांसोबत चालतो, त्यांच्या भावना समजून घेतो,आणि त्यांच्या बरोबर प्रगतीचा मार्ग शोधतो.
इतिहासात असंख्य नेते होऊन गेले,परंतु त्यांपैकी फार थोडेच लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करू शकले.कारण त्यांचे नेतृत्व भीतीवर नव्हे, तर प्रेमावर आधारित होते.ते लोकांवर हुकूमत चालवत नव्हते, तर त्यांच्या सोबत चालत होते.
खरे नेतृत्व करणारा नेता हा नेहमी मार्गदर्शक असतो.
तो अंधारात मार्ग दाखवतो, संकटांना सामोरे जातो,
आणि स्वतःच्या कृतीद्वारे इतरांसमोर आदर्श ठेवतो.
नेतृत्व हे फक्त दिशा दाखवणे नव्हे,तर त्या दिशेने स्वतः पाऊल टाकून इतरांना विश्वास देणे होय.
घरातील आई-वडील असोत, शाळेतील शिक्षक असोत,
किंवा संस्थेतील व्यवस्थापक प्रत्येक पातळीवर नेतृत्वाची जबाबदारी असते.त्या मागील मूलभूत तत्त्व एकच असते. "मी नव्हे, तर आपण".
खरा नेता कधीच ‘मी श्रेष्ठ आहे’ असं म्हणत नाही.
तो म्हणतो "आपण सर्व मिळून काहीतरी मोठं साध्य करू शकतो."तो यशाचे श्रेय इतरांना देतो, आणि अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारतो.यातूनच लोकांचा त्याच्यावरील विश्वास दृढ होतो.
नेतृत्व हे आवाजात नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते.
माणसं तुमच्यासोबत तेव्हाच उभी राहतात,जेव्हा त्यांना वाटतं की हा नेता माझ्यासाठी लढतोय,माझ्या भावना समजून घेतोय, आणि मला बरोबर घेऊन चालतोय.
आज प्रत्येक क्षेत्रात अशा नेतृत्वाची गरज आहे,
जे अभिमानाशिवाय, सेवाभावाने काम करेल,
लोकांशी मनापासून जोडलेले असेल,आणि प्रत्येक टप्प्यावर म्हणेल "मी नव्हे, तर आपण."कारण नेतृत्व म्हणजे एकट्यानं शिखर गाठणं नव्हे,तर सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा डोंगर सर करणं होय.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा