घराच्या कोपऱ्यात हरवलेला बाप....!
घराच्या कोपऱ्यात हरवलेला बाप....!
जसजसं मूल मोठं होतं, तसतसं बापापासूनचं अंतर नकळत वाढत जातं.कधी त्याच्या बोटाला धरून चालायला शिकलेलं तेच लेकरू,आज त्याच्याकडे नजर मिळवायला ही वेळ काढू शकत नाही.बापाचं अस्तित्व, त्याचं महत्त्व, त्याचं कर्तृत्व हे सगळं मुलांच्या आयुष्यात कुठे तरी धूसर होत चाललेलं असतं.
बापाची आठवण आता केवळ तेव्हाच येते,जेव्हा काही गरज असते. काही मागायचं असतं,किंवा एखादं काम अडलेलं असतं.एक काळ होता, जेव्हा बापाशिवाय घर अपुरं वाटायचं;पण आज तोच बाप घरात असूनही एकटा पडतो.त्याच्या आजूबाजूला लोक असतात, पण त्याच्या गप्पा हरवतात,त्याचं हास्य विरून जातं, आणि त्याच्या अस्तित्वाभोवती शांततेची जाड भिंत उभी राहते.
मुलांच्या लग्नानंतर तर त्याचं स्थान घरात आणखीनच मागे सरकतं.कधी ज्याच्याभोवती सगळं घर फिरायचं,
तोच आता हळूहळू घराच्या गोंगाटापासून दूर ढकलला जातो.घरातले निर्णय त्याच्या अनुपस्थितीत घेतले जातात,त्याचं मत विचारणं आता कुणालाच आवश्यक वाटत नाही.ज्याच्या अनुभवावर आणि मार्गदर्शनावर हे कुटुंब उभं राहिलं,त्याचं मत “जुनं”, “असंबद्ध” म्हणून दुर्लक्षित केलं जातं.
तो ज्या घराच्या प्रत्येक विटेत स्वतःचा घाम, कष्ट आणि श्वास ओततो,तेच घर हळूहळू त्याच्यासाठी परकं होतं.
एकेकाळी ज्याच्याशिवाय त्या घरात काही ठरत नव्हतं,
आज त्याला विचारणारा, ऐकणारा, बोलणारा कोणीही नसतो.बाप आपलं संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी झिजवतो,
पण जेव्हा त्याला दोन शब्दांची माया, एक उबदार स्पर्श हवा असतो,तेव्हा त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं.
आईला नेहमीच मायेचा आणि जिव्हाळ्याचा सन्मान मिळतो.ती घराची ओल असते, तिच्या भोवती प्रेमाचं कवच असतं.पण बाप मात्र त्या मायेच्या सावलीत उभा राहतो.घराचा पाया असूनही, तो बहुधा दुर्लक्षितच राहतो.मुलं मोठी झाल्यावर ना त्याला मिठी मारतात,
ना त्याच्या मांडीवर डोकं ठेवून काही सांगतात.बापाच्या ओंजळीत एकेकाळी संपूर्ण जग होतं,आज त्या ओंजळीत फक्त शांतता उरली आहे.
परदेशात गेलेली मुलं फोनवर आईशी बोलतात,
तिच्या तब्येतीची विचारपूस करतात,पण “बाबा कसे आहेत?” हा साधा प्रश्न अनेकदा विसरतात.मुलांच्या कुशलतेचा समाचार बापाला मिळतो तो आईच्या एका साध्या वाक्यांतून “हो, तुमच लेकरू ठीक आहे रे!” आणि बाप त्या शब्दांवर हसतो...त्या हसण्यात आनंदापेक्षा समाधान असतं.की लेकरू सुखात आहे, हेवढंच त्याला पुरेसं वाटतं.
बापाचे शेवटचे दिवस अनेकदा एकांतात, शांततेत सरतात.त्याचं जग आता एका खोलीपुरतं मर्यादित झालेलं असतं.तो जुन्या आठवणींमध्ये रमतो ज्या काळात त्याचं घर म्हणजे त्याचं विश्व होतं,जिथे प्रत्येक क्षणात त्याचं अस्तित्व जाणवत होतं.आज मात्र त्याच्या बोलण्यात रस घेणारा कोणी नाही,त्याच्या शांततेत दडलेली वेदना कुणाला उमगत नाही.तो आतून घुसमटतो, छटपटतो,पण आवाज बाहेर येत नाही.
तो फक्त श्वास घेत राहतो.आयुष्यभर केलेल्या प्रेमाचं, त्यागाचं, कर्तृत्वाचं उत्तर शांततेत भोगत राहतो.
हे दृश्य केवळ घराघरात नाही,तर आजच्या समाजाचंही वास्तव आहे.ज्याने आपलं आयुष्य कुटुंबासाठी झिजवलं,ज्याने प्रत्येक स्वप्न आपल्या लेकरांच्या डोळ्यांत पाहिलं,तोच बाप शेवटी स्वतःच्या घरात परका बनतो.ज्याच्या हातांनी उभं राहिलेलं ते घर,त्याच्याच डोळ्यांसमोर त्याचं नसलेलं होतं.
म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही.बाबांच्या खांद्यावर एकदा हात ठेवा,त्यांच्या डोळ्यांत बघा, त्यांच्याशी दोन शब्द बोला.त्यांचं अस्तित्व जाणून घ्या, त्यांचा सन्मान करा.कारण बाप म्हणजे केवळ कर्ता नाही,तो घराचा आधारस्तंभ आहे, घराचा आत्मा आहे.तो नि:शब्द शक्ती आहे. जी कधी तक्रार करत नाही,पण आयुष्यभर सावलीसारखी साथ देत राहते.
बाप म्हणजे आकाशासारखा विशाल, स्थिर, नि:शब्द.
तो काही मागत नाही, पण सगळं देत राहतो.त्याच्या प्रेमाला शब्द नसतात, पण त्याचं मोल अमोल असतं.
त्याचं आयुष्य म्हणजे न बोलता दिलेलं प्रेम,न मोजता केलेला त्याग आणि न थांबता दिलेली साथ.
म्हणून, अजूनही वेळ आहे.आपल्या आयुष्यातल्या त्या नि:शब्द नायकाला थोडं प्रेम द्या, थोडं आपुलकीचं ऊन द्या,थोडं स्थान द्या त्याच्या आयुष्यात.कारण शेवटी घर टिकवणारं प्रेम असतं,आणि त्या प्रेमाचं सर्वात मजबूत, नि:शब्द रूप म्हणजे बाप.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा