हृदयापासून हृदयापर्यंत...!


हृदयापासून हृदयापर्यंत...!

आजच्या गतिमान, ताणतणावाच्या आणि स्वकेंद्रित जगात प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी, अनुभवांची व्याप्ती आणि स्वभावाची छटा वेगळी आहे. त्यामुळे मतभेद होणं हे स्वाभाविक आहे; उलट, तेच जीवनाचं सौंदर्य आहे. पण या मतभेदांतून जर मनभेद निर्माण झाले, तर नात्यांतील ऊब हरवते आणि हृदयातील आपुलकीचा ओलावा सुकतो.

मतभेद असावेत, ते विचारांना दिशा देतात, दृष्टिकोन विस्तारतात; पण भेदभाव असू नये कारण भेदभाव माणुसकीचा नाश करतो. वाद घालणं चुकीचं नाही, पण त्या वादाचा शेवट सुसंवादात व्हायला हवा. शब्दांनी मन दुखावणं सहज शक्य असतं, पण त्याच शब्दांनी कुणाचं मन जिंकणं हीच खरी कला आहे. वादातून अहं निर्माण होतो, पण सुसंवादातून माणुसकी वाढते.

या सर्व संघर्षाचं मूळ एका शब्दात दडलेलं आहे.
“अहंकार.”
अहंकार हा माणसाच्या अंतःकरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो माणसाला इतरांपासून नव्हे, तर स्वतःपासून दूर नेतो. अहंकार म्हणजे रिकाम्या भांड्याचा आवाज जो मोठा असतो, पण आत मात्र शून्य असतं. नम्रता हीच खरी सजावट आहे, कारण जिथे नम्रता असते तिथे सौंदर्य फुलतं; आणि जिथे माणुसकी असते, तिथे देव वास्तव्यास असतो. म्हणूनच विनाकारण अहंकार बाळगण्यात काहीच अर्थ नाही.

शेवटी, मृत्यू हा काही भयावह शेवट नाही; उलट तो सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे. मृत्यू आपल्याला आठवण करून देतो की, आयुष्य मर्यादित आहे. म्हणून गेलेले दिवस मोजण्यात वेळ घालवण्यापेक्षा, उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोगावा हेच जीवनाचं खऱ्या अर्थानं तत्त्वज्ञान आहे.

आपण किती सुखी आहोत, यापेक्षा आपल्यामुळे कितीजण सुखी आहेत हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण आनंद हा स्वतःपुरता ठेवायचा विषय नाही; तो वाटायचा, पसरवायचा आणि वाढवायचा असतो. ज्या क्षणी आपल्या उपस्थितीने कुणाच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, कुणाचं मन हलकं होतं किंवा कुणाच्या आयुष्यात थोडा प्रकाश पडतो. त्या क्षणी आपण खरं जगलो असं म्हणता येईल.

आपण या जगात “एक हृदय” घेऊन आलो आहोत; पण जर आपण जाताना “लाखो हृदयांत जागा निर्माण करून” गेलो, तरच हे आयुष्य सार्थ ठरेल. संपत्ती, पद, कीर्ती या सगळ्याचं अस्तित्व काळानं विसरलं जातं; पण आपल्या माणुसकीचा,प्रेमाचा आणि सद्भावनेचा ठसा तो काळही पुसू शकत नाही.

म्हणूनचवाद करा, पण वैर नको.भांडणं करा, पण भेद नको.अहंकार ठेवा, पण तो प्रेमापेक्षा मोठा होऊ देऊ नका.आणि सगळ्यात महत्त्वाचं “जगताना माणसांच्या मनात घर निर्माण करू या... कारण शेवटी, हृदयातली जागाच खरी अमर असते!” 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !