जखम शब्दांची....!
जखम शब्दांची....!
कधीकधी असं वाटतं की आपण काही वेळा खूप बोलून जातो. अनावश्यक राग व्यक्त करतो. अनाठायी अपेक्षा ठेवतो. आणि फारच लवकर मनाला लावून घेतो.
आजकाल नाती टिकवणं अवघड वाटायला लागलंय. पण खरंच नाती एवढी कठीण असतात का?की आपणच ती अवघड करून बसतो?
राग येणं हे मानवी स्वभावधर्म आहे. मात्र तो राग व्यक्त करताना आपण कोणत्या शब्दांत, कोणत्या पद्धतीने व्यक्त होतो, हे महत्त्वाचं असतं.कारण रागातून बोललेले शब्द कधी कधी इतके खोलवर जाऊन बसतात, की ते मनावर जखमा करून जातात.शरीरावरच्या जखमा भरून येतात, पण मनावर झालेल्या जखमा मात्र काळ ही विसरू शकत नाही.
भांडणात उच्चारलेले काही शब्द रात्री अपरात्री पुन्हा आठवून टोचतात. "आपण असं का बोललो?"आणि मग समजतं भांडण करणं सोपं असतं, पण शांत राहणं, हेच खरं सामर्थ्य आहे.
एखाद्याचा अपमान करणं फार सोपं आहे. दोन कठोर शब्द बोलायचे आणि समोरच्याला खाली दाखवायचं.
पण एखाद्याचा सन्मान करायचा, त्यातली चांगुलपणाची बाजू पाहायची यासाठी मन मोठं लागतो.
त्यासाठी आपल्याकडे मूल्यं, संस्कार, आणि सहृदयता असावी लागते.आणि हीच गोष्ट आजकाल दुर्मिळ होत चालली आहे.
आपल्या आयुष्याचंही तसंच आहे ना? क्षणभंगुर, क्षणाक्षणाला बदलणारं.झाडावरचं एखादं सुंदर फूल जेव्हा खाली पडतं, तेव्हा त्यावर माती लागते, लोकांच्या पायाखाली येतं.पण तरीही ते आपला सुगंध विसरत नाही.पायदळी गेल्यावर ही सुगंध देऊन जातं.
आपलं आयुष्यही असंच असावं.कितीही वाईट प्रसंग आले, तरी आपल्यामुळे कुणाच्या जीवनात काही क्षण गंधित झाले, असं काही मागे राहावं.
म्हणूनच‘आज’ आपल्याकडे आहे, पण ‘उद्या’ असेल याची खात्री नाही.मग गर्व कशाचा? पदाचा, संपत्तीचा, की अहंकाराचा? एक दिवस हे सगळं मागे पडणारच ना… पण आपल्या वागणुकीचे, आपल्या नात्यांचे, आपल्या शब्दांचे परिणाम हे कायम लक्षात राहतात.
कधी वेळ निघून जातो, क्षण हातातून निसटतात, आणि उशिरा जाणवतं."अरे, हे नातं तर सुटलंच की!"
त्याआधीच थांबायला शिका. थोडं हसून बघा. समजून घ्या. नातं जपून ठेवा.नातं तोडणं ही ताकद नाही. नातं टिकवणं, हेच खरं प्रेम आणि खरी माणुसकी आहे.
विश्वास असेल, तर नातं खोलवर रुजतं.प्रेमाचे शब्द मनाच्या गाभ्यात पोहोचतात.आणि तितकंच खरं कटू शब्दही मनात खोल झिरपतात, पण कायमच्या जखमा होऊन.आपल्या शब्दांत सामर्थ्य आहे.प्रेम देणं की वेदना हे ठरवणं आपल्याच हातात आहे.
शेवटी काय?
आयुष्य चालतं ते आठवणींवर आणि आठवणी बनतात आपल्या वागणुकीवरून. म्हणूनच…आज कुणाच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आलं,कुणाचं मन शांत झालं तुमच्या शब्दांनी तर समजा, तुमचं आयुष्य खरंच अर्थपूर्ण झालं आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा