माघार चांगुलपणाची किंमत...!
माघार चांगुलपणाची किंमत...!
काही गोष्टी आपल्या मनाला खोलवर भिडतात. अगदी अशा की, त्या शब्दांत मांडणंही अवघड वाटतं. सतत घेतलेली माघार आणि प्रत्येकवेळी दाखविलेला चांगुलपणा, हे जणू आपल्याला शिकवलेलं असतं. घरातून, संस्कारांतून, समाजाकडून. पण याच गोष्टी जेव्हा आपलाच घात करतात, तेव्हा ती चूक कुणाची?
आपल्याला सांगितलं जातं शांत राहा, समजून घ्या, क्षमा करा, रागावर प्रेमानं मात करा. आपण ते मनापासून करत राहतो. भांडणं टाळण्यासाठी आपण पहिल्यांदा माघार घेतो. कुणी कठोर बोललं, तरी आपण हसून दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला नातं टिकवायचं असतं, आपल्याला वातावरण शांत हवं असतं.
पण हळूहळू असं लक्षात येतं की, आपल्या चांगुलपणाची सवय होते लोकांना. आणि मग ते त्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला लागतात. जेव्हा चूक दुसऱ्याची असते, तेव्हा सुधारणं आपल्याकडून अपेक्षित असतं. जेव्हा दुसरा ओरडतो, तेव्हा आपण शांत का नाही राहिलो, यावर चर्चा होते. आपली माघार, आपली समजूत, आपला संयम हे सगळं एकतर्फी होत जातं.
मन थकतं, आत्मा दुखावतो. कारण जेव्हा आपल्याला एखाद्याच्या आधाराची गरज असते, तेव्हा आपलं "नेहमी मजबूत असलेलं" व्यक्तिमत्त्व त्यांच्या नजरेतून अश्रूंना पात्रच ठरत नाही. कुणालाच जाणवत नाही, की या सतत माघार घेणाऱ्या व्यक्तीलाही एक दिवस "थोडं समजून घ्या" हे ऐकायची आस असते.
कधी कधी वाटून जातं, की जर आपणही आवाज चढवला असता, थोडं कठोर झालो असतो, एखाद्या क्षणी स्वतःसाठी उभं राहिलो असतो. तर कदाचित एवढं एकटं वाटलं नसतं.
चांगुलपणा हा दोष नाही, पण जर तो स्वतःला नकारत ठेवतो, तर तो आपलाच घात ठरतो.
आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेणाऱ्या प्रत्येक क्षणी, आपण अधिकच एकटे पडत जातो. आपली माघार इतरांच्या विजयाची सवय बनते, आणि आपलं मौन त्यांच्या गर्वाचं कारण.
म्हणूनच, आता वेळ आहे स्वतःच्या भावनांचाही आदर करण्याची.माघार घ्या पण गरज असेल तेव्हाच.
चांगुलपणा ठेवा पण स्वतःवर अन्याय करून नाही.
प्रेम करा पण आत्मसन्मान गमावून नाही. शांत राहा पण आतून उध्वस्त होईपर्यंत नाही.शेवटी, स्वतःही ‘कोणीतरी’ आहात, आणि त्याचं भान ठेवलं पाहिजे.
© दीपक पवार संपादक खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा